आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:धोरण लॉक, व्यवस्था डाऊन

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ निघून गेल्यावर उपचार करून उपयोग नसतो अशा आशयाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ ही म्हण आपल्याकडे आहे. कोरोनाकाळात आपल्या देशात, राज्यात, शहरांत, गावागावात जे काही चालले आहे, त्या सगळ्यासाठी ती चपखल आहे. कोरोना आल्यापासून म्हणजे १६ महिन्यांपासूनच त्यासाठी आवश्यक धोरण, व्यवस्था, समन्वय, राजकीय प्रगल्भता, सामाजिक-आर्थिक भान यांची वानवा ठळकपणे जाणवते आहे. मग ते वर्षापूर्वीचे लॉकडाऊन, अनलॉक असो, लसीकरण, मदत पॅकेज असो की प्राणवायू, औषधी पुरवठा; सर्वच पातळ्यांवर कमालीचा गोंधळ दिसला. त्यातच निवडणुका, धार्मिक कार्यक्रमांची भर पडली. कोरोना आला तेव्हा केंद्राने सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवत लॉकडाऊन जाहीर केला. त्यातून मजुरांचे स्थलांतर, उद्योगांचे हाल, अर्थचक्राला खीळ अशा अनेक समस्या उद्भवल्या. हे ताकही फुंकून प्यायचे, अशा भूमिकेतून दुसऱ्या लाटेत सारी जबाबदारी राज्यांवर ढकलली. लसीकरणाच्या बाबतीतही असेच झाले.

सुपर स्प्रेडर ठरू शकणारा १८ ते ४५ वयोगट लसीकरणापासून दूर ठेवण्यात आला. मग दुसऱ्या लाटेचा आग्यावेताळ अंगावर येऊ लागताच एक मेपासून या वयोगटाला लस देण्याचा निर्णय झाला. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरोना रुग्णसंख्या घटली तेव्हा सर्व यंत्रणा गाफील राहिली. दुसरी लाट येणार हे जगातील सर्व तज्ज्ञ सांगत असताना, आपण पाच राज्यांतील निवडणुकांचा घाट घातला. तेथे कोरोनाच्या त्रिसूत्रीला हरताळ फासत निवडणूक ज्वराने पछाडल्यागत प्रचार सभा, रोड शोला हजारोंचा समुदाय जमवण्यात आला. आता तेथे कोरोनाचा ज्वर वाढू लागला आहे. मग पंतप्रधानांसह सर्वच पक्षांचे नेते तेथील प्रचाराचा कार्यक्रम रद्द करताहेत.

वाढत्या रुग्णांना लागणारा प्राणवायू, रेमडेसिविर यांचा तुटवडा जाणवू लागताच यंत्रणेची पळापळ सुरू झाली. त्यातच रुग्ण सुरक्षेचा फज्जा उडाला. नाशिक, विरारमध्ये रुग्णांना हकनाक प्राण गमावावे लागले. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर कदाचित अशा ‘लॉक’ झालेल्या धोरणात नाही, कारण व्यवस्थाही ‘डाऊन’ झाली आहे. कोरोना व्यवस्थापनाबाबत नेमके धोरण तयार करा, असे न्यायसंस्थेला सांगावे लागते, यातच सर्व काही आले.

बातम्या आणखी आहेत...