आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:टुरिंग टॉकीज-शोध हरवलेल्या दिवसांचा...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी बागेत गेल्यावर दोन क्षण आपलं मूल डोळ्यासमोरून नाहीसं झालं तर पोटात गोळा येतो, पण हेच मूल नेहमीसाठी अचानक नाहीसं झालं तर..? भारतात अशी अनेक मुलं आई-वडिलांपासून दुरावतात. बदललेल्या तंत्रज्ञानामुळं आता मूल नाहीसं झालं तर लगेच त्याची माहिती प्रसारित होते, लोक जागरूक होतात, बऱ्याचदा ते परत मिळतेसुद्धा. पण, समजा तुमचं लेकरू परत आलंच नाही तर? आई-बापाच्या मनात मूल लहान असताना ही भीती हमखास असते. ती केवळ भीती न राहता ज्याची सत्यकथा बनली, त्या सरूची गोष्ट ‘लायन’ या चित्रपटात सांगितली आहे. सरू ब्रायरली याने लिहिलेल्या आत्मकथनावर हा चित्रपट आधारित आहे.

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या एका बाईचा लहान मुलगा सरू आपल्या घरापासून दुरावतो. पुढे दत्तक म्हणून परदेशी जातो. एका चांगल्या, प्रेमळ कुटुंबात राहू लागतो. पण, नकळत्या वयात ज्या घरात आपण राहत होतो, त्या घराची ओढ त्या मुलाला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या भावाचा आणि आईचा शोध घेताना सरू वेडापिसा होतो. लहानपण तुकड्या-तुकड्यात आठवते आहे, घराचा पत्ता जाऊ देत; गावाचे नावही आठवत नाही, भूतकाळाची कोणतीही खूण जवळ नाही, अशा परिस्थितीत सरू आपल्या पाऊलखुणा शोधत राहतो. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी सरूची गोष्ट घडते.

गोष्ट समजायला खूप सोपी. मध्य प्रदेशमधील खंडव्यातल्या एका छोट्या खेड्यात दोन भाऊ- सरू आणि गुड्डू राहत असतात. दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या बाईची ही दोघं मुलं. गुड्डू चौदा-पंधरा वर्षांचा, तर सरू पाच वर्षांचा. ट्रेनमधले कोळसे चोरून ते एका दुकानदाराला द्यायचे आणि मग त्या बदल्यात पेलाभर दूध मिळवायचं, असा उद्योग गुड्डू करत असतो. ‘आता मी पण खूप ‘मोठ्ठा’ झालोय, आता मी पण दादाला मदत करणार’ हे लहानगा सरू ठरवतो. एका रात्री गुड्डू घराबाहेर पडत असताना त्याच्या विरोधाला न जुमानता सरू दादाबरोबर रेल्वे स्टेशनवर येतो. लहानग्या सरूच्या डोळ्यात रात्रीची अनावर झोप असते. त्याला तिथंच ‘झोपून राहा, इकडं तिकडं जाऊ नकोस’, असं बजावून गुड्डू कामाला जातो. रात्री अचानक जाग आल्यावर सरू घाबरतो आणि भावाच्या शोधात एका ट्रेनमध्ये चढतो. ही ट्रेन त्याला सोळाशे मैल दूर कोलकत्याला घेऊन येते.

आई, भावापासून दुरावलेलं हे लहान लेकरू वणवण फिरतं, पण आईकडं, गुड्डूकडं परत जाण्याची आस सोडत नाही.. ही आस त्याच्यात कायम असते. पुढे ऑस्ट्रेलियात दत्तक म्हणून गेल्यावर.. तब्बल पंचवीस वर्षांनंतरही!

‘लायन’ बघताना पहिल्याच दृश्यातून काळजात पहिली कळ उठते... गुड्डू आणि सरू दोघं एका ट्रेनवर चढून कोळसे चोरतात, हा तो प्रसंग. कुठेही घरातल्या अठराविश्व दारिद्र्याचं रडगाणं नाही. दिसतं ते भावाभावामधलं सुंदर नातं. पिशवीभर दुधासाठी दोघं जीव धोक्यात घालून कोळसा चोरतात, पण कामगिरी फत्ते झाल्यावर गुड्डूला सरूचं किती कौतुक! ‘तू खूप मोठा झालास रे!’ असं कौतुक गुड्डूने केल्यावर सरूची छाती इंचभर फुलते. कोळसा मिठाईवाल्याला दिल्यानंतर त्यांना मिळतं पावशेर दूध. पण, सरूची नजर तिथं कढईत तळल्या जाणाऱ्या गरमागरम जिलब्यांवर जाते. तो गुड्डूला विनवतो, ‘एकदा मला तू जिलब्या खायला देशील ना रे?’ गुड्डू त्याला ‘हो’ म्हणत असताना, आपल्याला त्याच्या डोळ्यांतला निग्रह दिसतो. एक दिवस हा भावाला जिलबी खायला नक्की घालणार!

पुढं भावाशी ताटातूट झाल्यावर लहानगा सरू अचानक प्रौढ होतो. जग किती वाईट आहे, याचा अनुभव येत असतानाच आई आणि भावाचा शोध तो थांबवत नाही. खंडव्याहून ट्रेनने कोलकत्याला पोचलेल्या सरूला बंगाली कळत नाही, तो काय बोलतो आहे हे इतरांना कळत नाही. अनेक टक्केटोणपे खाल्ल्यावर सरूचं नशीब पालटतं. ऑस्ट्रेलियातील एक जोडपं त्याला दत्तक घेतं. त्याची नवी आई सू ब्रायरली (निकोल किडमन) त्याच्यात पूर्णपणे गुंतली आहे. तिचं सरूवर निरतिशय प्रेम आहे. नवे आई-बाबा मिळाल्यावर सरूच्या लहानपणीच्या आठवणी मागे पडतात. सरूचे नवे आई-बाबा आणखी एक भारतीय मुलगा दत्तक घेतात. त्याचा हा भाऊ अनेक मानसिक समस्यांना सामोरा जात असतो. मोठ्या सरूने (देव पटेल) नव्या आयुष्याशी जुळवून घेतले आहे. पण, अचानक त्याच्या आठवणी जाग्या होतात. एका भारतीय मित्राकडे दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत तो जिलबी खातो. जिलबीचा तो वास त्याला लहानपणाकडं, त्याच्या भावाकडं- गुड्डूकडं खेचून नेतो. इतका की, रात्रंदिवस त्याचा पिच्छा सोडत नाही...

सगळं काही आलबेल असताना, ऑस्ट्रेलियातल्या सरूला आसपास गुड्डू आणि अम्मी आसपास भटकताना दिसू लागतात. ‘ते अजून मला शोधताहेत, मला त्यांच्याकडं परत जायचंय’ या विचारानं तो जवळपास वेडा होतो. जणू तो पुन्हा पाच वर्षांचा सरू होतो, गुड्डूकडं हट्ट करणारा, भावावर भारावून जाऊन प्रेम करणारा, आईच्या मायेला पारखा झालेला.. आपल्या गावाचं नाव त्याला पुसटसं आठवत असतं. आता त्याला ध्यास लागतो, गुगल मॅपवर नकाशे बघत राहायचे आणि त्यात आपला भूतकाळ शोधायचा. एक दिवस त्याला त्याचे गाव नकाशावर दिसते. हे दृश्य पाहताना सरूबरोबर आपल्याही डोळ्यात पाणी तरळतं. सरू गावी परततो. इतकंच नाही तर आपल्या आईलाही भेटतो. गुड्डूबद्दल एक भयंकर सत्य समजल्यावरही सरू सावरतो. कारण त्याला त्याचा भूतकाळ सापडला आहे. जन्मदात्री आई भेटली आहे, त्याची ठसठस संपली आहे.

देव पटेल लोकप्रिय झाला तो ‘स्लमडॅाग मिलिनिअर’मुळे. अशा रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्यांना हे स्टारपद टिकवणे कठीण असते. पण, देव पटेल आपल्या भूमिकांबद्दल चोखंदळ आहे. या चित्रपटातही तो मोठ्या सरूच्या भूमिकेत फिट बसतो. काहीतरी हरवल्याची हूरहूर, स्वतःचा भूतकाळ शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, त्यासाठी हातात आहे ते गमावण्याची वेळ आली तरी मागे न हटता आपल्या पुसलेल्या वाटांना शोधत राहणारा सरू देवने अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. पण, लायनचा खरा हिरो आहे सनी पवार. सनीने लहानपणीचा सरू साकारला आहे. आपल्या मोठ्या भावाच्या, गुड्डूच्या प्रभावाखाली बिनधास्त वावरणारा सरू, आईपासून दुरावल्यावर भिरभिरल्या डोळ्यांनी तिला शोधणारा, आपल्या गरीब पण सुरक्षित घरापासून दुरावल्यावर टक्केटोणपे खाणारा, गुन्हेगारी जग अनुभवणारा आणि नंतर आपला देश सोडून नव्या जगाला सामोरे जाणारा सरू... या सरूच्या गोष्टीतल्या सगळ्या छटा सनी इतक्या हुबेहूब साकारतो की सरूची गोष्ट आपली गोष्ट होते. गुड्डूपासून दुरावलेला सरू बघून आपल्या जिवात कालवाकालव होते.

दरवर्षी भारतात ऐंशी हजार मुलं हरवतात. आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांचं काय होत असेल, याची थोडीफार कल्पना सरूचा प्रवास बघताना येते. सिनेमाची कथा माहीत असतानाही, ‘नको रे बाबा, नको झोपूस आता, नाही तर दुरावशील तू गुड्डूपासून..’ असं मी मनातल्या मनात त्याला विनवत होते. ‘लायन’मधील सरू हरवल्यानंतर पंचवीस वर्षांनी का होईना, त्याच्या गोष्टीचा शेवट सुखाचा होतो. पण, भारतात दरवर्षी हरवणाऱ्या सुमारे ऐंशी हजार मुलांचं आणि त्यांच्या आई-बाबांचं काय? एकीकडे अशा आई-वडिलांचं काय होत असेल, याची कल्पनाही करवत नाही, तर दुसरीकडे त्या मुलांचं काय होत असेल, या विचाराने थरकाप उडतो.

आई-बापाचा चेहरा नीट आठवत नाही, पत्ता माहीत नाही, घरी कसं पोचायचं कळत नाही, बरोबर कुणी काळजी घेणारं नाही आणि अशा या जगात ही मुलं अनिश्चिततेच्या चक्रात अडकतात. घराच्या चार भिंतीत आणि आईच्या उबदार कुशीत जगणारी मुलं अचानक उघड्यावर पडतात. अशा वेळी त्यांना आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर वाटू लागतो. सरूला सू ब्रायरली मिळाली, इतरांनाही तशी कुणी तरी मिळायला हवी, असं मनात येत राहतं.

‘लायन’मधील हरवलेल्या सरूच्या गोष्टीचा शेवट पंचवीस वर्षांनी का होईना, पण सुखाचा होतो. परंतु, भारतात दरवर्षी हरवणाऱ्या सुमारे ऐंशी हजार मुलांचं आणि त्यांच्या आई-बाबांचं काय? एकीकडे अशा आई-वडिलांचं काय होत असेल, याची कल्पनाही करवत नाही, तर दुसरीकडे त्या मुलांचं काय होत असेल, या विचाराने थरकाप उडतो. आई-बापाचा चेहरा नीट आठवत नाही, पत्ता माहीत नाही, घरी कसं पोचायचं कळत नाही, बरोबर कुणी काळजी घेणारं नाही आणि अशा या जगात ही मुलं अनिश्चिततेच्या चक्रात अडकतात. घराच्या चार भिंतीत आणि आईच्या उबदार कुशीत जगणारी मुलं अचानक उघड्यावर पडतात...

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

बातम्या आणखी आहेत...