आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:धुळवर्तुळ-आसपास असणारा वावरही आता भूतकाळ झालाय

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला संबंध नसेलही, पण तरी माहिती असलेल्या व्यक्तीचा आसपास असणारा वावरही आता भूतकाळ झालाय, असं लक्षात आल्यावर सगळं किती मिथ्या आहे, हे लक्षात येतं. काही काही उरत नाही मागं. जवळची माणसं धाय मोकलून आठवणी काढतात. ओळखीची लोकं मनापासून किंवा तोंडदेखलं हळहळतात. काळानं त्यांना इतकं कन्व्हिन्स केलेलं असतं, की तेही त्याच्यासारखे निर्दयी होतात आणि कितीही बोलावलं तरी परतत नाहीत. मरणाची भीती जगण्याच्या अपरिहार्यतेत असते. जगणं मोकळं असेल, तर मरणभय शिवत नसावं. आपल्या सगळ्यांना जायचं असतंच; पण माणसं वळून न पाहता, निरोप न ठेवता, घोर लावून निघून जातात. हे अधिक वाईट...

ज्या दिवशी करायला काहीच नसतं, खरं तर त्याच दिवशी करायला भरपूर असू शकतं. खिडकीत चार पाण्याच्या बाटल्या भरून ठेवाव्यात. खिडकीतून बाहेर बघत बसावं. खिडकीत उभं राहिल्यावर समोर एक बसकं घर दिसतं. आज तिथं गर्दी होती. नेहमीपेक्षा जास्तच. मग जाणवलं, नेहमी अॅम्ब्युलन्सचा आवाज दुरून येऊन दूर जातो. तो या वेळी दूर न जाता अचानक बंद झाला, तेव्हाच आपल्याला कळायला हवं होतं. समोर गर्दी झाली होती. काही कळत नव्हतं. पण, बहुतांश सुज्ञ लोकांना जसं वाटलं असतं तसं मलाही वाटलं. हेच की, खाली जावं तर आधीच तिथे इतका बाजार आहे, मग आपण जाऊन कशाला गोंधळात भर टाका.. असंच मलाही वाटलं? की सकाळचा कंटाळा? की पाहुण्या ठिकाणी पाहुणं बनून राहावं? अॅम्ब्युलन्स निघून गेली, पण आवाज न करता. तिच्या जाण्यात लगबग नव्हती. ती गेली आणि घराच्या अंगणात हंबरडा फुटला. मला लक्षात आलं, की अॅम्ब्युलन्सचं मागचं दार उघडणं, मग घाईघाईनं दोघा-तिघांनी स्ट्रेचवरून चढवणं, मग तिच्या मागं एक-दोन मोटारसायकलींनी निघणं.. हे सगळं झालंच नाही...

त्या घराच्या अंगणात खिडकीला लागून एक म्हातारा बसलेला असायचा. सदैव खिडकीच्या चौकटीतून बाहेर काहीतरी पाहत असायचा. त्याला कधी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही. घरातले सगळ्यांचे आवाज वेगवेगळ्या निमित्तानं ऐकले होते. ‘पापा, जाऊ छू..’ म्हणत त्याचा पोरगा रोज सायकलवर टांग टाकायचा. त्याची सून ‘ध्यान राख जो’ म्हणत खांद्याला पिशवी लावून बाजारहाटाला जायची. ‘दादा, हवे जोवो हा के’ असं म्हणत नातू हवेत चेंडू उडवायचा आणि कॅच करायचा. कॅच करता येणं म्हणजे एक मोठा माइलस्टोन झाला होता त्याच्यासाठी. कधी म्हातारा ऊन आलं, की खिडकीला त्याचं धोतर बांधायचा. बाहेरून. ते पोरगं त्या धोतराचे मोकळे दोन कोपरे गळ्याभोवती बांधून सुपरमॅन होऊन उडायचा. स्वत:च्या मुलगा आणि सुनेला थंड प्रतिसाद देणारा म्हातारा नातवाच्या चेंडू खेळाला किंचित हसायचा. खिडकीशी आणखी सरकून बसायचा. खिडकीच्या सळया मोठमोठ्या होत्या. म्हाताऱ्याचं डोकं पण त्यातून निघायचं. त्याचा नातू रस्त्यावर गेला, की डोकं बाहेर काढून त्याला हाका मारायचा. अंगणात पारिजातकाचं झाड होतं. रात्री पाऊस झाला की सकाळी ते हलवायचं. आपला पाऊस आपणच बनवायला त्या पोराला त्या म्हाताऱ्यानंच पहिल्यांदा शिकवल्याचा मी साक्षीदार होतो.

ते लहानगं होतंच इब्लिस. गाडीचे आरसे फोडून तो घराघरात उजेडाचे तुकडे मारायचा. माझ्या चेहऱ्यावर कितीदा मारले होते. म्हातारा कधी खिडकीत दिसला नाही आणि हे इब्लिस कार्टं रस्त्यावर जायला लागलं, तर मी माझ्या खिडकीतून ओरडायचो. हळूहळू असं व्हायला लागलं, की त्या खिडकीतून तो आणि माझ्या खिडकीतून मी असे दोन दोन दूरस्थ पालक त्याला मिळाले होते. कधी झाडाची पडलेली फांदी घेऊन तो स्वत:भोवतीच एक धुळवर्तुळ काढायचा आणि म्हाताऱ्याला म्हणायचा.. ‘बचाव, दादा बचाव..’ मग म्हातारा खिडकीत ठेवलेल्या तांब्यातून एक गुळणी भरायचा आणि वर्तुळावर पिचकारी मारायचा. मग ती ओल सुकली की वर्तुळ तुटायचं आणि हे पोरगं त्यातून बाहेर यायचं.

एकदा तर पोरानं म्हाताऱ्याला बाहेर मान काढायला लावली. वाळत घातलेल्या बेडशीटला भगदाड पाडलं. ते बेडशीट म्हाताऱ्याच्या गळ्यात घातलं. म्हाताऱ्याची मान खिडकीबाहेर. मग पोरानं आरशावर चिकटणारे बाण म्हाताऱ्याच्या चकोटावर चिकटवायचा कार्यक्रम सुरू केला. पोरगं काय खिदळतंय असं म्हातारं खिदळत होतं. आईनं घरी आल्यावर पोराला गल्लीभर पळवून मारलं होतं, ते वेगळं. त्यावर दारात म्हातारा पहिल्यांदा संपूर्ण पाहिला होता. पोरगा त्याच्या मागेच लपला शेवटी...

मला वाटलं संपलं एक आयुष्य. खिडकीतल्या चौकटीतून असं काय काय पाहिलं असेल त्यानं..? त्याच्या अँगलने मनातून जाऊन पाहिलं तर चौक दिसला, रस्ता दिसला, अंगण दिसलं, समोरचा मी राहतो ते घर. माझ्या खिडकीत कितीदा पाहिलं असेल त्यानं. माझा मोबाइल चार्जिंगला तिथेच ठेवायचो. त्याला काय वाटत असेल माझ्याबद्दल. मला काय वाटत होतं त्याच्याबद्दल. त्या पोराची आजी कधी दिसली नाही. वाटलं इतक्या वर्षांनंतर त्या म्हाताऱ्याला जीव सोडताना त्रास झाला असेल की नसेल? त्रास झाला असेल तरी आनंद पण असेल का तिला भेटणार असल्याचा? तिची भेट होणार तरी असेल का? मरणानंतर काय होतं नेमकं याची जी कल्पना आपण आयुष्यभर बांधलेली असते, त्याच्या विपरीत पलीकडे नसेल तर निराशा येत असेल का? पण, शरीर सोडणं म्हणजे सगळे विकार सोडणं असेल तर निराशा कसली..? की नसेलच तसलं काही?

संपलं की संपलं.. हे पलीकडं, वरती-खाली हे सगळं थोतांड आहे. जगण्यापलीकडं काहीतरी आहे, हे स्वप्नच नसेल तर जगण्यातला उत्साह मावळेल म्हणून केलेली सोय आहे का? की इब्सेन म्हणतो तसं, आपण मरणातून जागे होऊ तेव्हा कळेल आपण कधी जगलोच नाही. हेच खरं... मग असं वाटतं हा आयुष्य नावाचा पसाराच मुळात पसारा वगैरे काही नसून फक्त कर्पूरभास आहेत. काळ अत्यंत थंड निरोप्या आहे. त्याच्याकडे दया नाही. नाहीतर अशी जगण्यानं फसफसणारी माणसं इतक्या सहजासहजी नाहीशी झाली नसती. आपला संबंध नसेलही, पण तरी माहिती असलेल्या त्या व्यक्तीचा आसपास असणारा वावरही आता भूतकाळ झालाय, असं लक्षात आल्यावर सगळं सगळं किती मिथ्या आहे, हे लक्षात येतं. ही भावना कदाचित स्मशानवैराग्याची असेल.

घडलेल्या घटनेच्या केंद्रापासून जसजसं आपण दूर जाऊ तसं हे कमी होईलही कदाचित. लगेच एक भावना उचल खाते की आपलेच चार गुंते वाढवण्यापेक्षा इतरांची चार दुखणी कमी करावी. किमान ती वाढवू तर नयेच नये. काही काही काही उरत नाही मागं... जवळची माणसं धाय मोकलून आठवणी काढतात. ओळखीची लोकं मनापासून किंवा तोंडदेखलं हळहळतात. काळानं त्यांना इतकं कन्व्हिन्स केलेलं असतं, की तेही त्याच्यासारखे निर्दयी होतात आणि कितीही बोलावलं तरी परतत नाहीत. मरणाची भीती जगण्याच्या अपरिहार्यतेत असते. जगणं मोकळं असेल, तर मरणभय शिवत नसावं. आपल्याला जायचं असतंच सगळ्यांना. पण, माणसं वळून न पाहता, निरोप न ठेवता, घोर लावून निघून जातात. हे अधिक वाईट...

आता जेव्हा घरातली सून आणि मुलगा बाहेर जात असतील तेव्हा त्यांना खिडकी रिकामी भासेल. मी मोबाइल चार्जिंगला खिडकीजवळ गेलो, की अनाहूतपणे माझं लक्ष खिडकीत जाईल. हे सगळं ठीकच; पण तो लहान मुलगा.. त्याच्या पोटातला खड्डा कसा भरावा. त्याला कसं समजवणार?

बाहेर सामानाची बांधाबांध सुरू होती. ढिम्म गर्दीला एक हालचाल लाभली. आतून लोक बाहेर येऊ लागले. गर्दीबरोबरच त्या घराची सून, तिचा नवरा दोघं आले. आणि दोनेक जणांच्या आधारानं म्हातारा पण शून्य नजरेनं चालत आला. त्याला बाहेरच्या खुर्चीवर बसवलं. मला नेमकं काय चालूय हेच कळेना. समोर घडत असलेल्या गोष्टींचं गणित सोडवता सोडवता एका शक्यतेने चर्रss झालं. समोर तयारी चालू असलेल्या बांधाबांधीकडे लक्ष गेलं. तिरडी नेहमीपेक्षा छोट्या लांबीची होती. माझ्याच श्वासांची लय बिघडली. कुणीतरी कुशीत उचलून एक झाकलेला निष्प्राण देह आणला. मी म्हाताऱ्याकडं पाहिलं. तो शून्य झाला होता. आई हमसून रडत कोपऱ्यात पडून होती. घरातून धावत आलेल्या बापाच्या हंबरड्याने रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांचाही वेग मंदावला. मी झपकन् खिडकी बंद केली. बापाचे हंबरडे ऐकवत नाहीत. खरं तर हंबरडे कुणाचेच ऐकवत नाहीत. मी खाली जायचं ठरवलं. झपाझप पायऱ्या उतरून खाली गेलो. गर्दीचा भाग झालो. आजूबाजूच्या गोष्टी बघू लागलो. आजारीच होता म्हणे, म्हणून घरी घरी असायचा.. उपचार चालू होते.. शेवटी शेवटी तब्येत खालावली.. मी आठवून पाहिलं. बरोबर गेला महिनाभर दिसला नव्हता. एकेक घटनांचा मेळ बसू लागला...

काय काय विचार करून झाले आपले. आपण जवळपास सगळं कबूल करत आलोच होतो. कारण मरणारा वृद्ध होता. आता काय बदललं? आता मनाला फार वाईट का वाटत होतं, जे आधी नव्हतं? पुन्हा गर्दीला चाल आली. निघानीघ व्हायची तयारी झाली. माझा पुढं जायचा धीर होत नव्हता. तिरडी उचलली गेली. गर्दी दूर जाऊ लागली. लहान तिरड्या जास्त जड असाव्यात. मी जड पावलानं परतलो. खिडकीतून एक उजेडाचा तुकडा माझ्या खोलीत चमकून गेला. मी अपेक्षेने खिडकीशी गेलो. रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्याशा मोटारसायकलच्या आरशानं तो चमकवला होता. कारण नंतर आणखी दोन बाइक गेल्या तेव्हा तसंच घडलं. आता गल्ली निष्प्राण झाली होती. अंगणातला म्हातारा जड पावलानं घरात गेला आणि खिडकीत आला. म्हाताऱ्यानं गुळणी केली आणि अंगणात पिचकारी मारली. आमची नजरानजर झाली. म्हातारा स्फुंदून रडू लागला. मीही शेजारीच ठेवलेल्या बाटलीतलं पाणी घटाघटा पिऊ लागलो. कितीतरी वेळ.

प्राजक्त देशमुख
deshmukh.praj@ gmail.com

बातम्या आणखी आहेत...