आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Article Ravi Amle | Marathi News | Computer | Computer Holidays: A New Kurukshetra

सायबरभान:संगणक अवकाश : एक नवं कुरुक्षेत्र

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या जगातील गुन्हेगारी नवी आणि युद्धाच्या पद्धतीही नव्या. सायबर अवकाश तर आता नवे कुरुक्षेत्र बनले आहे. त्यातूनच ‘हॅकिंग’ अनेकांच्या मोबाइलपर्यंत पोहोचले आहे. अशा काळात त्याची व्याप्ती आणि खोली समजून घेणे आवश्यक बनले आहे. असे सायबरभान असणे व्यक्तिगत सुरक्षेइतकेच राष्ट्रसुरक्षेसाठीही महत्त्वाचे ठरले आहे. सायबर विश्वातील गुन्हेगारी अन् हेरगिरीचा, त्यांच्या इतिहास नि वर्तमानाचा वेध घेणाऱ्या नव्या पाक्षिक सदराचा हा पहिला भाग.

हैदराबादमधील महेश सहकारी बँक. रविवारच्या सुटीचा दिवस. पण, त्या संध्याकाळी काही बँक अधिकाऱ्यांचे काम सुरूच होते. व्यवहारांची अंतर्गत तपासणी करीत होते ते. एका अधिकाऱ्याने बँकेची राखीव रोकड किती आहे हे तपासण्यासाठी संगणकाला आज्ञा दिली. आणि पुढच्याच क्षणी त्याला जोरदार धक्का बसला! त्याची विनंती नाकारण्यात आली होती. कारण - राखीव रोकड शिल्लकच नव्हती. घामच फुटला त्याला. संगणक आता सांगू लागला होता की, बँकेच्या खात्यातील १३ कोटी ९० लाख रुपये गायब आहेत. बँकेत चोरी झाली आहे. एक कुलूपही तुटलेले नाही. जमिनीखालून भुयार खणलेले नाही. पिस्तुलाचा धाक दाखवलेला नाही की रक्ताचा थेंबही सांडलेला नाही. पण, त्या दरोडेखोरांनी बँक लुटली आहे...

सायबर दरोडा होता तो. सायबर गुन्हे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. त्यांनी तपास सुरू केला आणि मग एकेक बाब ध्यानात येऊ लागली. लक्षात आले, की बँकेच्या संगणकाच्या सर्व्हरमध्ये घुसून ही चोरी करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी चोरीसाठी शनिवारची रात्र ते रविवारची संध्याकाळ अशी वेळ निवडली होता. त्यांनी बँकेच्या तीन खातेदारांची खाती आधी हॅक करून ठेवली होती. त्यांच्या नेटबँकिंगची मर्यादा त्यांनी ५० कोटींवर नेऊन ठेवली. मग बँकेच्या मुख्य सर्व्हरमध्ये घुसखोरी केली. तेथून १२ कोटी ९० लाखांची रक्कम उडवली आणि ती या तीन खात्यांवर टाकली.

या खातेदारांना पत्ताही नव्हता की आपण आता कोट्यधीश झालो आहोत. कारण या शर्विलकांनी बँकेची मोबाइल संदेश सेवाही हॅक करून ठेवली होती. काही क्षणांसाठी करोडपती झालेल्या त्या खातेदारांच्या खात्यावरून पुढच्या काही मिनिटांत ते पैसे गायब झाले. या शर्विलकांनी ते दिल्ली, झारखंड, बिहार, आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील वेगवेगळ्या बँकांतील तीन खात्यांवर वळवले आणि तेथून ते तातडीने काढून घेतले. हैदराबाद पोलिसांनी त्या बँकांना या चोरीची माहिती दिली. पण, तोवर फार उशीर झाला होता. त्या सुमारे तेरा कोटींतील केवळ तीन कोटीच ते वाचवू शकले.

फार जुनी नाही ही घटना. गेल्या २३ जानेवारीला घडली ती. याच महिन्याच्या प्रारंभी दिल्ली पोलिसांनी संगणकचाच्यांची सहा जणांची एक टोळी पकडली. त्यातले तिघे मुंबईतले होते. जीमॅट परीक्षेत हेराफेरी केली होती त्यांनी. व्यवस्थापन अभ्यासक्रमातील प्रवेशासाठीची ही परीक्षा. चार-पाच लाख रुपये घेऊन ते या परीक्षेत अधिक गुण मिळवून देत असत या ऑनलाइन परीक्षेला कोणी डमी उमेदवार बसू नये, त्याने त्या वेळी इंटरनेटचा गैरवापर करू नये वगैरे भरपूर काळजी घेतलेली असते. पण, हे ठक अल्ट्राव्ह्यूअर नावाचे एक सॉफ्टवेअर त्या संगणकात अपलोड करून त्याद्वारे त्याचा दुरून ताबा मिळवायचे. आणि तो संगणक प्रश्नपत्रिका सोडवणाऱ्या भलत्याच व्यक्तीशी जोडत.

परीक्षा पद्धतीतील ‘प्रॉक्टोरियल स्क्रूटिनी’चा हे लोक बाजाच वाजवत होते. बरे, केवळ जीमॅटच नव्हे, तर नौसेना, वायुदल, रेल्वेच्या भरती परीक्षांतही त्यांनी अशी चालबाजी करून बऱ्याच जणांना ‘गुणवान’ बनवले होते. हे दिल्ली पोलिसांना समजले ते केवळ एका खबऱ्यामुळे. मग त्यांनी त्या लोकांकडे एक डमी विद्यार्थी पाठवला आणि त्याद्वारे त्यांच्या गुन्ह्याचे पितळ उघडे पाडले. हॅकिंगद्वारे केलेल्या सायबर गुन्ह्यांच्या या दोन ताज्या घटना. खरे तर यात आता तसे काही नावीन्यही नाही राहिले. कारण अशा अनेक छोट्या-मोठ्या घटना अगदी आपल्या आसपासही घडत आहेत. कुणाचा ‘ओटीपी’ चोरून बँक खाते रिकामे करण्यात येत आहे, कुणाच्या संगणकातील वा मोबाइलमधील माहिती पळवून ब्लॅकमेल करण्यात येत आहे, एखाद्या कंपनी वा संस्थेच्या संकेतस्थळावर ताबा मिळवून तेथे नासधूस करण्यात येत आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच ट्विटर खाते या संगणकशर्विलकांनी काही काळासाठी ताब्यात घेतले आणि भारताने बिटकॉइन व्यवहार कायदेशीर केल्याची माहिती त्यावरून पसरवली होती. आणि आता देशात सुरू आहे ‘पेगासस’वरून गदारोळ. तेव्हा हॅकिंग हा शब्द आणि हे असे गुन्हे नवे राहिलेले नाहीत. जसजसे संगणकावरील आपले अवलंबित्व वाढते आहे तसतसे ते आपल्याला अधिकाधिक भिडू लागले आहेत. केवळ व्यक्तिगतच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेचेही प्रश्न यातून उभे राहिले आहेत. सायबर अवकाश हे नवे कुरुक्षेत्र बनू लागले आहे.

भारतातील सायबर विश्वावर नजर ठेवते ‘सर्ट-इन’ - ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम - इंडिया’ ही सरकारी संस्था. तिच्याकडील नोंदीनुसार, २०२१ मध्ये देशात सायबर हल्ल्यांचे साडेअकरा लाखांहून अधिक प्रकार घडले आहेत. हॅकिंगद्वारे खंडणीखोरीच्या गुन्ह्यात १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वीज, तेल, गॅस, दूरसंचार, बँकिंग या क्षेत्रांतील कंपन्यांवरही मोठ्या प्रमाणावर हॅकिंग हल्ले होत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी अख्ख्या मुंबईची वीज गेली होती. दोन तास सारे व्यवहार बंद पडले होते. हे आठवतच असेल अनेकांना. तोसुद्धा सायबर हल्ला होता. केंद्र सरकारने अर्थातच इन्कार केला त्याचा, पण सायबरतज्ज्ञांच्या मते, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा त्यामध्ये हात होता. त्याचा चीननेही इन्कार केला. पण, महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाने मार्च २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालात तो सायबर हल्लाच होता, याची पुष्टी केली आहे.

हे सर्व पाहिले म्हणजे हॅकिंगची व्याप्ती आणि त्याचे दुष्परिणाम यांचे गांभीर्य आणि भयावहता लक्षात येईल. आणि त्यातून हेही ध्यानात येईल की, गुन्हेगारीचा हा प्रकार सर्वांनीच अगदी मुळापासून समजून घेतला पाहिजे. याचे कारण तो आता आपल्या राष्ट्राच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या सायबर अवकाशात एखाद्या विषाणूसारखा शिरला आहे.

या पाक्षिक सदरातून पुढील वर्षभर आपण हॅकिंग आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सायबरयुद्ध, पाळतशाही यांसारख्या विविध विषयांची माहिती घेणार आहोत. ते आले कुठून आणि जाणार कुठे, हे पाहणार आहोत. इतिहास म्हणजे इति ह आस म्हणजेच ‘असे निश्चितपणे होते’. ते काय होते हे नीट समजून घेतले की वर्तमानाची ओळख पटणे आणि भविष्याचा वेध घेणे सोपे होते. हॅकिंगचा, सायबर गुन्हेगारीचा, युद्धाचा इतिहास, त्याचा प्रवाह समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.… आजच्या काळात हे सायबरभान अत्यावश्यकच बनले आहे.

रवि आमले
ravi.amale@gmail.com
{संपर्क : 9987084663

बातम्या आणखी आहेत...