आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील श्रावण

एका वर्षापूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

श्रावण प्रत्येकालाच मनभावन असतो. श्रावणाच्या सरी चिंब भिजवणाऱ्या असतात. गझलकारांनीही श्रावणाची अनेकविध वेधक रूपं त्यांच्या गझलेतून रेखाटलीय. उद्यापासून श्रावणमासास प्रारंभ होताहे त्यानिमित्तानं...

श्रावण म्हणजे झुळझुळण्याचे, सळसळण्याचे दिवस. फुलण्याचे, बहरण्याचे, मोहरण्याचे दिवस. श्रावणात वारे उनाड होतात. सताड होतात. त्यांना हुलकावणी देत निळ्या नभातील काळे-जांभळे ढग अनावर होतात. आसुसलेल्या मातीच्या कणाकणांना मनसोक्त न्हाऊ घालतात. थेंबाथेंबात नाद भरलेला असतो. ढग आभाळाचे रंग फुलाफुलांवर उधळतात. फुलं रंगीबेरंगी होऊन जातात. त्यांचा तजेला वाढतो. ही श्रावणफुलं मनाला प्रसन्न करतात. श्रावणात रिमझिमणारा पाऊस जरा जास्तच हळवा होतो. तो तिच्या पायाचा तळवा होतो. पावसाचे मोत्यागत टपोरे थेंब तिच्या गजऱ्याच्या पाकळ्यावरून बटातून ओघळतात. पाऊस मोहगंध होऊन जातो. श्रावणीरंगात भिजून जातो. भवताल भावगंध होतो. ओला मधुर गंध दरवळतो.

श्रावण सुगंधी सोबतीचा आधार होतो. 'आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीनं प्यावा वर्षाऋतू तरी' अशीच काहीशी मनाची अवस्था होते. पण रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारात तिची साथच नसेल तर रात उदासवाणी वाटते, नकोशी जिंदगानी वाटते. 'कुरवाळीत येतील मजला, श्रावणातील जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतील सजल इशारा' हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकतो. रिमझिम बरसत आला श्रावण, साजन नाही आला. तिकडं तिचीही सैरभैर अवस्था होते. भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून त्याला श्रावण असं संबोधण्यात आलयं. श्रावण महिन्याला सर्व व्रताचा, सणांचा राजाही म्हटलं गेलयं. कारण या महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची परंपरा आहे.

गझलकारांनीही श्रावणाची अनेकविध वेधक रूपं त्यांच्या गझलेतून रेखाटलीयत. तृषेला बोलता येऊ नये. कंठातली तहान सांगता येऊ नये. ही सजा मोठीच असते. सागराच्या सान्निध्यात राहूनही तहानलेल्या अवस्थेत जन्म कंठावा लागणं असं एखाद्याचं प्राक्तन आसतं. वास्तविक श्रावण प्रत्येकालाच मनभावन असतो. श्रावणाच्या सरी चिंब भिजवणाऱ्या असतात. परंतु एखाद्याच्या वाट्याला एखादीच श्रावणाची सर यावी अन् तीही घाईघाईत निघून जावी. ती श्रावण सर त्याची तहान शमवू नाही शकत. त्याची तृषा मुकी असते. तिला बोलता नाही येत. मागता नाही येत. त्या श्रावणसरीलाही त्याच्या तहानलेल्या कंठाविषयी फारशी आपुलकी नसते. ती एकमेव श्रावणसर आल्या पावली निघूनही जाते. मुकी बिचारी तृषा बोलणार तरी काय? ही तहानल्या जन्माची शोकांतिका सुरेश भटांनी त्यांच्या शेरातून प्रकट केलीय्.

सर एक श्रावणाची आली... निघून गेली… माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले! आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज नाही लाभत. कष्ट घ्यावं लागतं. जीवापाड वेदना सोसावी लागते. कष्टाशिवाय फळ नाही मिळत. जे कष्टाविना मिळतं ते शाश्वत नसतं. त्याचं मोलही नसतं. श्रावणाचे ओले गीत गाण्यासाठी आधी आसवांच्या पावसात मन भिजावं लागते. त्यासाठी मनात परिस्थितीचं ऊन घेऊन आसवांचा पाऊस ओंजळीत झेलावा लागतो. आसवांचा पाऊस झेलत राहणं हे मोठं जिकिरीचं असतं. हे धैर्य ज्याच्या ठायी असतं तोच श्रावणाचं ओलं गीत छेडू शकतो. श्रावण हा आनंदाचा प्रतीक आहे. हा आनंद लुटायचा तर आसवांची साथ करावीच लागते. ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर म्हणतात.

श्रावणाचे गीत ओले यावया ओठांवरी आसवांच्या पावसाने मन भिजावे लागते तिच्या सहवासातच श्रावणाचं अधिक मोलं असतं. ती असली की श्रावण सुंदर वाटतो. ती सोबतीला नसली ही रिमझिमणारा श्रावणही भकास वाटायला लागतो. तिच्या सोबतीशिवाय श्रावणाची कल्पना करणंही मुश्कील होऊन जातं. पावलं जडशीळ होतात. जवळचा प्रवास दूरचा वाटू लागतो. तिच्याविना श्रावणही एकाकी होतो. तेव्हा श्रावण झरत नाही तर झुरत राहतो. तिची आठवण सोबत घेऊन निघणं जीवावर येतं. आठवण जीवघेणी असली तरी सुंदर असते. शेवटी माणसाला आठवणीचाच आधार असतो. सोबत्याला धीर देताना रुपेश देशमुख असा शेर लिहितात.

रिमझिमणारा उदास श्रावण सोबत घे निघालास तर तिची आठवण सोबत घे श्रावण दरवर्षीच येतो अन् जातो. पण भिजायचंच राहून जातं श्रावणात भिजणं हा एक आनंददायी सोहळा असतो. तिच्याबरोबर श्रावणात भिजण्याची मजा तर औरच! तिच्या सहवासातच श्रावणाला आनंदाची ओली फुलं येतात. प्रेमाची ही सुगंधी अनुभूती असते. एक डहाळी एका झुल्यावर एकच झोका घ्यायची संधी मिळाली तर... श्रावणाचे सूर तनामनात झंकारू लागतात. पण असं सहजासहजी नाही घडत. नक्की काय करायचं ते एकदाचं ठरवावं लागतं. पक्का बेत आखावा लागतो. नाही तर श्रावणात भिजण्याचं वय निघून जायचं याची काळजी प्रसाद कुलकर्णी यांच्या मनास लागून राहिलीय. ते प्रियेला उद्देशून म्हणतात.

एक डहाळी, एक झुल्यावर एकच झोका घेऊ आपण श्रावणात त्या भिजावयाचे एवढे तरी नक्की ठरवू एखाद्याजवळ आभाळाइतकं मोठं मन असतं. हृदय असतं. तेव्हा आपलीच नाती आपल्यापासून दुरावतात. नाती दुरावली की अशा मनाला आभाळच जवळचं वाटू लागतं. आभाळ कितीही लुटलं तरी ओंजळ लहान पडते. पुढं मागं कधी मनाचा मोर होईल हे सांगता नाही येत. अन् चुकून मनाचा मोर झाला तर तुझ्या डोळ्यातला श्रावण मी कुठे शोधू? तू तेव्हा कुठं असशील याचाही काही भरवसा नाही देता येत. श्रावण बरसल्याशिवाय मोर थुईथुई नाचत नाही, पिसारा फुलवत नाही. कारण श्रावणाच्या रिमझिमण्याचा अर्थ मोराला चांगला कळतो. माणसापेक्षा अगोदर कळतो. मोर जेव्हा नृत्य करत असतो तेव्हा त्याच्या पावलांतून आभाळाचंच दुःख स्त्रवत असतं. सतीश दराडे यांच्या शेरातून हाच भाव प्रकट होत जातो.

पुढेमागे कधी माझ्या मनाचा मोर झाला तर तुझ्या डोळ्यांमध्ये होता तसा श्रावण कुठे शोधू… श्रावण अन् झुला याचं पूर्वापार सख्य आहे. 'चार दिवसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा' असा निरोप सासरच्या मंडळीकडून माहेरकडं यायचा. भाऊ बहिणीला आणायला गावी जायचा. सासुरवाशिणीलाही माहेरी यायच्या त्या डोळ्यात उंच झुल्याचं स्वप्न घेऊनच. झाडांना उंच उंच झुले बांधले जात. झोके घेताना सासुरवाशिणीला गगन ठेंगणं वाटायचं. श्रावणाचा आनंद झोक्यासरशी वाढत जायचा. श्रावणातले झोके म्हणजे झाडांचाही उत्सव असायचा. आजकालच्या वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची खुलेआम कत्तल होऊ लागली. भावनाशून्यता वाढत गेली. जगण्यातली संवेदनशीलता लयास गेली. झोके बांधायला झाड दिसेनासे झाले. श्रावणातल्या पंचमीचे झोके दिवसेंदिवस कमी कमी होत गेले. याची खंत दासू पाटील यांनी त्यांच्या शेरातून व्यक्त केलीय.

श्रावणा बघ उदासल्या पोरी झाड नाही इथे झुला नाही श्रावण म्हणजे नक्की काय असतं. त्याची रूपं कशी असतात. काही सुखावणारी असतात काही दुखावणारीही असतात. ज्याच्या वाट्याला जसा श्रावण येतो तसाच त्याचा श्रावण असतो. हेच तर गझलकारांनी त्यांच्या शेरातून सांगितलंय्.

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...