आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:...अन् शाळांमध्ये ‘ऑनेस्टी बॉक्स’ सुरू झाला!

एका महिन्यापूर्वीलेखक: डॉ. प्रदीप अवचार (लेखक, दिग्दर्शक)
  • कॉपी लिंक

आवडते मज मनापासुनी शाळा... कोरोनामुळे घरात कोंडलेल्या प्रत्येक मुलाचे मन जणू शाळेभोवती असेच भिरभिरत असेल. शाळेतले खेळ, तिथली गंमत या सगळ्या अनुभवापासून मुले वंचित आहेत. याचा परिणाम त्यांच्या भावविश्वावर होतो आहे. शाळेच्या वयात मुलांच्या कोवळ्या मनाला जपावे लागते. या विचारातूनच आधी मनात, मग फिल्मवर आणि नंतर शाळाशाळांमध्ये साकारला ‘ऑनेस्टी बॉक्स’..!

“प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, सगळीच सत्यनिष्ठ नसतात, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र, त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.’ शाळा म्हटली की, अब्राहम लिंकन यांचे हे वसंत बापटांनी अनुवादित केलेले नितांतसुंदर पत्र आपल्या डोळ्यांसमोर येते. शक्यतो मुख्याध्यापकांच्या पाठीमागच्या भिंतीवर अथवा कार्यालयात ते लावलेले असायचे.

सध्या कोरोनामुळे साऱ्या शाळा ऑनलाइन सुरू आहेत. शाळेत प्रत्यक्ष होणारे वर्ग, घंटेच्या ठोक्यावर पुढे सरकणारा अभ्यास, प्रार्थना, कवायती, खेळ अन् गमतीजमती, वह्या-पेन नि अन्य वस्तू हरवणे अशा कितीतरी नवीन काही शिकवणाऱ्या गोष्टींपासून, अनुभवापासून मुले वंचित आहेत. मात्र, आपल्या सर्वांच्या मनात शाळा अजूनही कुठंतरी अशीच रुतून बसली आहे. शाळेतील अशाच अनुभवांवर शॉर्टफिल्म बनवायचा मी विचार करत होतो आणि अचानक एक जादुची पेटी हाती लागली... ‘ऑनेस्टी बॉक्स’ तिचं नाव!

गेल्या १२ वर्षांपासून मी मुलांचे समुपदेशन आणि बालहक्कांसाठी काम करतोय. त्यानिमित्त शाळांमध्ये गेल्यावर विविध विषय हाताळताना एक गोष्ट लक्षात आली. बऱ्याच वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी आणलेले पेन, पेन्सिल, खोडरबर, पाण्याची बाटली अशा वस्तू गायब होतात. मग शाळांमध्ये पालकांचे सारखे फोन येणे सुरू होते. याबाबत आम्ही थोडा शोध घेतला तेव्हा असे लक्षात आले की, काही वस्तू हरवतात, काही मुलांकडे राहतात. मात्र, काही मुले भीतीपोटी त्या वस्तू परत देण्यास घाबरतात. कधी कधी सापडलेल्या वस्तू कोणाला द्याव्यात, हेच सुचत नाही. त्यांना वाटते, आपण वस्तू परत केली, तर आपल्यावरच चोरीचा आळ येईल...

अशा गोष्टींमुळे मुलांच्या बालमनावर चोरीचा छाप उमटू नये. हातून चूक घडल्याची सल त्याला बोचू नये आणि हरवलेली वस्तू योग्य ठिकाणी यावी या विचारातून ‘ऑनेस्टी बॉक्स’चा जन्म झाला. या शॉर्टफिल्मची कथा लिहिताना सर्वात महत्त्वाचे होते, ते म्हणजे मुलाकडे वस्तू कशी येते, यावर जास्त भर न देता या समस्येच्या मुळाशी हात घालणे. त्यावर तोडगा काय असेल, यावरच आम्हाला भर द्यायचा होता. मूल पूर्णपणे समजूतदार होण्यापूर्वी त्याला कोणत्या तरी साचात बांधणे, हा मुलगा वाईट असा ठपका ठेवणे वाईट असते. त्यामुळेच ही कथा लिहिताना मुलांना तसे दाखवलेच नाही. लघुपटाचे चित्रीकरण करताना आधी लोकेशन कोणते निवडावे, याबाबत चर्चा झाली. अखेरीस मूर्तिजापूर येथील अवधूत ढेरे सरांच्या व्यंकटेश बालाजी शाळेची निवड करण्यात आली. तब्बल पाचशे मुलांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या. त्यातून पात्राला न्याय देऊ शकणारे कलाकार निवडले. या शॉर्टफिल्मचा परिणाम इतका चांगला झाला, की राज्यातील अनेक शाळांमध्ये आता ‘ऑनेस्टी बॉक्स’ सुरू झाले आहेत. शाळांमध्ये वस्तू गहाळ होण्यामुळे शिक्षक आणि पालकांची होणारी अडचण सुटली आहे. आमच्या कामाची सर्वात मोठी पावती हीच. कुठल्याही मुलावर त्याच्या कोवळ्या वयात कशाचाही ठपका लागू नये. मुलांना त्यांच्या आई-वडिलांनी जपावेच. मात्र, शिक्षकांनीही अधिक पुढाकार घ्यावा. पायाला घाण लागू नये म्हणून आपण जपतो, तसे विद्यार्थ्यांच्या मनाला ती लागू म्हणूनही जपावे.

प्रामाणिकतेचा अनोखा ‘पुरस्कार’
शाळेची योग्य साथ आणि रोहित गाडगे आणि टीम टच वूडच्या माध्यमातून संपूर्ण लघुपट चित्रीकरणासह दहा दिवसांत तयार झाला. रोहन इंगळे यांनी आफ्टर इफेक्टचे काम पाहिले, तर विशाल रंभापुरे यांनी डीओपी म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. सचिन दलाल यांचे सहाय्यक दिग्दर्शन महत्त्वपूर्ण ठरले. या चित्रपटाने आम्हाला खूप काही दिले. ‘दिव्य मराठी’च्या रसिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट शॉर्टफिल्म म्हणून निवड झाली. शासनानेही आमचा गौरव केला. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त घेतलेल्या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये आमच्या लघुपटाने तिसरा क्रमांक पटकावला.

संपर्क : ८३७९९५२२६१

बातम्या आणखी आहेत...