आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:नजरेत साठव हिरवी सृष्टी अन् पक्ष्यांची उंच भरारी..!

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील बंद्रे (लेखक, दिग्दर्शक)
  • कॉपी लिंक

अलीकडे सारेच मोबाइलचा गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसतात. काही जण गाडी चालवताना, काही पायी चालताना मोबाइलवर बोलत असतात. यामुळे अपघात होऊन अनेकांनी हकनाक जीव गमावले. आता तर या मोबाइलनं झोपमोड करण्यापासून ते आपली मानसिक शांती हिरावण्यापर्यंत मजल मारलीय... अशा सगळ्या गोष्टी डोक्यात घोळत होत्या. लोकांनी आभासी जगापायी आपल्या सुंदर भोवतालातला वर्तमान गमावू नये, असं वाटत होतं. त्यातूनच एका शॉर्टफिल्मची कल्पना मनात रुजली. तिचं नावही पटकन् सुचलं.. ‘द ब्लाइंड’...

माझा पहिला लघुपट ‘चोरी’. त्याला भरघोस यश मिळालं. त्यानंतर दुसऱ्या लघुपटासाठी कथेच्या शोधात होतो. या वेळी बजेट कमी होतं. त्यामुळं निर्मिती, लेखन, दिग्दर्शनाचं शिवधनुष्य स्वतःचं उचलायचं ठरवलं. परिस्थिती संधी निर्माण करून देते म्हणतात, ते खोटं नाही. असो. मी रोज सकाळी फिरायला जायचो. आजही जातो. तिथं सतरा-अठरा वयोगटातली मुलं खेळायला येत. त्यांच्याबरोबर क्रिकेट, फुटबॉलचं साहित्य असायचं. मात्र, ना ते क्रिकेट खेळायचे, ना फुटबॉल. सगळेच मोबाइलवर गेम खेळत बसायचे. मी रोज हे पाहायचो. शेवटी न राहून एक-दोघांना विचारलंही. पण, त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं आणि ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मोबाइलनं आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. वेळ, पैशाची बचत झाली. इंटरनेमुळं माहितीत भर पडली. अनेक जण त्याचा उपयोग ज्ञानासाठीही करून घेत आहेत. पण, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायकच असतो. आज सारेच मोबाइलचा गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसतात. काही जण गाडी चालवताना, काही रस्त्यावर पायी चालताना मोबाइलवर बोलत असतात. अनेक बहाद्दर गेम खेळतात. यामुळे अपघात होऊन अनेकांनी हकनाक जीव गमावले. हे सगळं डोक्यात घोळत होतंच. म्हटलं, चला तर मग यावरच शॉर्टफिल्म बनवू. त्यामुळं एक चांगला संदेश देता येईल आणि झालाच तर थोडाफार समाजही जागृत होईल. त्यानुसार कथा लिहिली. तिला एकच नाव पटकन् सुचलं... ‘द ब्लाइंड’. कथेप्रमाणं पात्रांची आणि चित्रीकरण स्थळाची निवड केली. कॅमेऱ्यासमोर उभा राहायला सज्ज असलेला आमचा सहकारी मित्र क्षितिज विसपुते लगेच तयार झाला. मोबाइलवर गेम खेळत रस्त्यावरून चालणारं पात्र त्याला साकारायचं होतं. पण, एक अडचण होती. आम्हाला गटारीचे, नाल्याचे मॅनहोल हवे होते. असे मॅनहोल मुख्य रस्त्याला असतात. दोन-अडीच महिने उलटले, तरी मला हवे तसे मॅनहोल मिळत नव्हते. खूप शोधाशोध केली, तेव्हा एक मिळाले, पण ते उघडायचे कसे आणि चित्रीकरणासाठी परवानगी मिळवायची कशी? ही नवी समस्या उभी होते. मला पटकथेत कसलाही बदल नको होता. त्यात काही दिवस गेले. मला एके दिवशी महापालिकेचे काही कर्मचारी तो मॅनहोल उघडून सफाई करत असल्याचे दिसले. मला इतका आनंद झाला की सांगताही येणार नाही. चित्रीकरणासाठी एक आशेचा किरण दिसू लागला होता. मी त्या कर्मचाऱ्यांना भेटलो. मनसोक्त गप्पा मारल्या. शॉर्टफिल्मच्या निर्मितीची कल्पना सांगितली. त्यांना ते सारं आवडलं. त्यांनी मदतीसाठी होकार दिला. विशेष म्हणजे, त्यांच्यातील संदीप बोराडे यांनी अंध पात्राची भूमिका साकारायची इच्छा व्यक्त केली. मलाही वाटलं, देऊयात एक संधी. त्यामुळं ते सुद्धा खूप आनंदी झाले. चित्रीकरणाच्या दिवशी त्यांनी ठरल्याप्रमाणं येऊन नाल्याचे मॅनहोल उघडले. आमचे कॅमेरामन चंद्रकिरण सोनवणे तयारच होते. त्यांनी पटापट ठरलेले शॉटस् घेऊन चित्रीकरण पूर्ण केलं. सर्वांचं काम मनासारखं झालं होतं. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोल, गटाराची साफसफाई सुरू केली. अभिनयाचा काहीही अनुभव नसताना संदीप यांनी एका टेकमध्ये अंध व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रीकरण पूर्ण झालं. एक कर्मचारी म्हणाला, मुंबईत पावसाच्या पाण्यामुळं मॅनहोल न कळल्यानं एका जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांचा वाहत जाऊन मृत्यू झाला. त्यांच्या वाक्यानं अंगावर सर्रकन् काटा आला. माझ्यासोबत असलेल्या मोबाइलमध्ये गुंतलेल्या मित्राच्या कानी हे वाक्य पडलं. त्यानं लगेच मोबाइल बंद केला. खिशात ठेऊन दिला. हे पाहून खूप समाधान मिळालं. वाटलं, आपल्या लघुपटानं काही जण डोळस झाले, तरीही या श्रमाचे पांग फिटले. कारण, मोबाइलनं झोपमोड करण्यापासून ते आपली मानसिक शांती हिरावण्यापर्यंत मजल मारलीय. लोकांनी आभासी जगापायी आपल्या सुंदर भोवतालातला वर्तमान गमावू नये. खेळायला म्हणून घराबाहेर पडणाऱ्या मुलांनी हिरव्या सृष्टीचं सौंदर्य अनुभवावं, पक्ष्यांची गगनभरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं पाहावीत.. त्यानं जगणं आणखी सुंदर होईल...

आभासी विश्वाचा घातक अतिरेक ‘द ब्लाइंड’ लघुपटाला अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठीवर पडलेली कौतुकाची थाप ही त्यातला पहिला पुरस्कार. ‘दिव्य मराठी’च्या रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमधील निवडीने आणखी हुरूप वाढला. पुरस्कार मिळाल्यावर आनंद वाटतोच. पण, हा लघुपट फक्त मोबाइलच्या वेडापासून जनजागृती करावी, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून निर्माण केला आहे. तो उद्देश थोडाही साध्य झाला, तरी भरपूर मिळवलं.

बातम्या आणखी आहेत...