आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:अनलॉक उदंड जाहले टॉमीपुराण!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुत्र्यावर किती प्रेम करावं, याला काही माप नसतं. परवा दिवशी एका नातेवाइकाच्या घरी गेलो होतो. लांबच्या नात्यातले एक वयोवृद्ध गृहस्थ आजारी होते. कधीही वाईट बातमी येण्याची शक्यता असल्यानं एकदा भेटून यावं म्हणून उभ्या उभ्या गेलो, तर दारातच एका अक्राळविक्राळ तोंडाच्या कुत्र्यानं खणखणीत आवाजात स्वागत केलं. आजारी गृहस्थाच्या सुनेनं लाडीगोडी करत कुत्र्याला शांत केलं आणि मला घरात घेतलं. बेडवर पडलेल्या व्यक्तीशी दोन शब्द बोललो तोच कुत्रा तिथं आला आणि माझ्या पायाचा वास घेऊ लागला. मी सुनबाईला म्हणालो, ‘चांगला सांभाळ करताय बरं का तुम्ही..’ तशी ती म्हणाली, ‘हो.. मग एकदम पोटच्या मुलासारखं जपतो आम्ही. कुणालाच कधी चावत नाही..’ मी नकारार्थी मान डुलवत म्हणालो, ‘नाही.. नाही.. मी आजोबांविषयी बोलत होतो.. चांगला सांभाळ करताय तुम्ही आजोबांचा, असं म्हणतोय मी..’ त्यावर माझ्या हातात चहाचा कप देत सुनबाई म्हणाली, ‘अच्छा अच्छा.. त्यांचं काय तेव्हा? ते निवांत झोपून असतात. दिवसभर कामानं नको नको होतं मला..’ मी तिला विचारलं, ‘खाण्यापिण्याचं कसं आहे?’ तसं शेजारच्या खुर्चीवर बसत ती म्हणाली, ‘हे बघा.. पहाटे पाच वाजता एक ग्लास दूध देते. त्यानंतर दहाला दूध-भाकरी देते छान चुरून.

मग चार वाजता दोन अंडी उकडून देते आणि मग रात्री चिकन किंवा फिश असतातच..’ मी आश्चर्यचकित होत त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडं पाहिलं आणि म्हणालो, ‘तात्या, एवढा चांगला आहार करता आणि तरीही ताकद कशी येत नाय तुमच्या अंगात?’ तात्यांनी हळुवार स्वत:च्या कपाळावर हात मारून घेतला आणि कुत्र्याकडं पाहिलं. तशी सुनबाई चहाचा घोट घेत म्हणाली, ‘अच्छा बाबांचं विचारताय होय तुम्ही? मी आमच्या टॉमीच्या आहाराचं सांगत होते. बाबांचं काय नसतं. कधी घोटभर चहा पितात.. नाय तर हे घरी येताना वडापाव घेऊन येतात. त्यात भागतं त्यांचं..’

मी चहाचा घोट घेत होकारार्थी मान डुलवली अन् तात्यांकडं पाहत म्हणालो, ‘अंघोळ वगैरे नसेल ना सांगितली डॉक्टरांनी?’ तशी सुनबाई माझ्याकडं पाहत म्हणाली, ‘बाबा महिन्यातून करतात एकदा, पण आमच्या टॉमीला दर आठवड्याला अंघोळ घालावीच लागते. त्याला नाही बाई असं जास्त दिवस पारुसं राहायला आवडत..’ बोलता बोलता सुनबाईंनी तात्यांना टोमणा मारला होता. हिच्या प्रत्येक उत्तरात टॉमी येत होता. उगीच चिडचिड होऊ लागली. तसं मी तात्यांकडं पाहत म्हणालो, ‘घरात तरी फिरता की नाही ? की नुसते झोपूनच असता?’ त्यावर त्यांनी फक्त हातांनी होकारार्थी इशारा केला, तशी सुनबाई म्हणाली, ‘फिरतात की.. बेडरूममध्ये फिरत असतात. टॉमी तर सारखा त्यांच्याकडं येतो अन् फिरायला चला म्हणतो. आमच्या टॉमीला खूप आवडतं फिरायला. म्हणून मी त्याला रोज दोन किलोमीटर फिरवून आणते. फिरून आला की त्याला खूप झोप येते. पण, फॅन नसेल तर त्याला नीट झोप लागत नाही. म्हणून मग मी फॅन लावते आणि तो झोपला की घरातलं कामं उरकते.’

मी उसनं अवसान आणत टॉमीकडं पाहिलं. तो माझ्याकडं संशयानंच बघत होता. मी तात्यांकडं पाहिलं अन् म्हणालो, ‘मला वाटलं तुम्ही याल आमच्या घरी. पण, तुम्ही तर झोपूनच आहात. लवकर बरे व्हा आणि या घरी..’ तात्यांनी स्मित केलं, तशी सुनबाई म्हणाली, ‘होय ना.. आम्हाला यायचयं तुमच्या घरी. मी फोटो पाहिलेत तुमच्या घराचे. तुमच्या घराभोवती शेती आहे ना? आमच्या टॉमीला तर शेतात फिरायला खूप आवडतं. मी आमच्या माहेरी जाताना टॉमीला नेते ना तर दिवसभर नुसता शेतात फिरत असतो. घरात यायलाच नको म्हणतो..’

आता तात्याजवळ थांबू का जाऊ, तेच मला कळत नव्हतं. काहीही विचारलं तरी त्यांची सून टॉमीपुराण सांगत होती. शेवटी मी तिलाच म्हणालो, ‘खूपच भारी आहे तुमचा टॉमी. तुमच्या नवऱ्याला एक-दोन वेळा भेटलो होतो मी. पण, त्यांनी नव्हतं सांगितलं एवढं टॉमीविषयी.’ तशी तोंड वाकडं करत ती म्हणाली, ‘त्यांना कसलं ते कौतुकच नाही टॉमीचं. मागच्या वेळी मी फक्त म्हणाले की आपण टॉमीला कपडे आणू, तर म्हणाले, टॉमीला कपडे घेण्यापेक्षा बाबांना कपडे घेऊ.. आता मला सांगा, नवीन कपडे घालून बाबा कुठं जाणार आहेत मिरवायला? नवे कपडे घालून बेडवरच पडून राहणार ना? झालं! त्यावरून दोन दिवस माझ्याशी बोलले पण नाहीत. तुम्हाला सांगू? ते दोन दिवस ना मला जेवण गेलं ना टॉमीला. टॉमी रोज दोन भाकरी खातो, त्या दिवशी त्याने फक्त दीड भाकरी खाल्ली. पण, मिस्टरांना त्याचं काही नाही. स्वत: पोटभर जेवण करत होते. त्यांना ना माझी काळजी, ना माझ्या टॉमीची..’

मी होकारार्थी मान डुलवत टॉमीकडं पाहिलं तर तो तात्यांच्या अंगावरचं पांघरूण ओढत होता. तात्या थंडीनं कुडकुडत होते म्हणून त्यांच्या अंगावर चादर टाकली होती, तर टॉमीला ती खेळायला पाहिजे होते. असं वाटतं होतं की त्या टॉमीच्या पेकाटात काठी घालावी अन् ती चादर तात्याच्या अंगावर टाकावी. तेवढ्यात सुनबाई हसत म्हणाली, ‘त्याला रोज यांच्याशी खेळायला आवडतं. त्याला वाटतं ते माझ्याशी खेळतील. मला बाहेर फिरायला नेतील. पण, तात्यांना त्यांच्या आजारपणाचं पडलंय. नुसतं झोपून राहायचं अन् टीव्ही बघायचा. आता मला सांगा, ते टॉमीला बाहेर फिरायला घेऊन गेले तर त्यांचाही व्यायाम नाही का होणार? पण, कुणाला म्हणजे कुणालाच टॉमीची काळजी नाही.’ असं म्हणत त्या बाईंनी डोळ्याला पदर लावला, तोच काकांचा व्हिडिओ कॉल आला. मी उचलला तर पलीकडून काका म्हणाले, ‘नितीन, कशी तब्येत आहे रे तात्यांची..?’ मी समोरचा कॅमेरा चालू केला, तर त्यात रडणारी सुनबाई दिसली. तसे काका काकूला म्हणू लागले.. ‘बघ कशी लेकीवानी सून मिळाली तात्यांना.. सासरा आजारीय तर बिचारी मुसमुसत रडतीय..’ काकांच्या या वाक्यावर काकू बोलू लागल्या, ‘ये पोरी.. अगं म्हातारं माणूस आहे, नको एवढी काळजी करू. होतील बरे ते. रडून काय होणार आहे तेव्हा? तू त्यांचं करतीय तेवढं पुरेसं आहे. गप बरं.. शांत हो. पूस तुझे डोळे..’

आता ती नेमकी का रडत होती, हे आम्हा तिघांनाच माहीत होतं. तसे त्या सुनबाईने डोळे पुसले आणि मोबाइल हातात घेत म्हणाली, ‘काकू तुम्ही बी या लवकर भेटायला. खूप दिवस झाले तुम्ही आला नाही..’ काकूने ‘होय होय’ म्हणत फोन ठेवला, तसे पदराने डोळे पुसत सुनबाई म्हणाली, ‘मागच्या वेळी काका-काकू आले होते, तेव्हा तर टॉमी सारखा त्यांच्या मागंच पळत होता. अर्ध्या तासात टॉमी अन् काका-काकूंची छान मैत्री झाली होती..’ ती बाई असं म्हणाली आणि मी उभं राहून हात जोडले. पुढं काही बोलायची आणि टॉमीपुराण ऐकायची इच्छाच झाली नाही. तात्यांना ‘काळजी घ्या’ म्हणत नमस्कार केला . सुनबाईलाही नमस्कार केला आणि ‘काळजी घ्या’ म्हणालो. तशी सुनबाई माझ्याकडं बघत म्हणाली, ‘टॉमीलाही काळजी घ्या म्हणा. नाही तर रुसेल बरं का तुमच्यावर तो..’

खरं तर त्या कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालायची इच्छा होत होती, पण मन मारत ‘काळजी घे रे टॉमी..’ असं म्हणालो आणि घराबाहेर पडलो. तेव्हापासून दोन दिवस झाले, पण ते टॉमीपुराण काही डोक्यातून जाईना...

माणसानं कुत्र्यांवर प्रेम केलं पाहिजे, त्यात दुमत नाही. पण, तुम्ही माणसापेक्षा कुत्र्याला जास्त किंमत देऊ लागला, तर इतरांकडून तुम्हाला कुत्र्यासारखीच किंमत मिळते, हे विसरून चालत नाही. अलीकडंच एका नातेवाइकाकडं गेलो होतो. आपल्या कुत्र्याचं इतकं कौतुक त्यांनी ऐकवलं की दोन दिवस झाले, तरी मला ते कुत्रंच आठवतंय. त्या घरातली माणसं एकवेळ आठवेनात, पण कुत्रं मात्र डोळ्यासमोरून अन् डोक्यातूनही जाता जाईना...

नितीन थोरात
nitin.thrt@gmail.com

बातम्या आणखी आहेत...