आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाजिल आत्मविश्वास, अपुऱ्या पूर्वतयारीनंतरही बेसावध किंवा बेजबाबदार असलेला भारतीय संघ, संधी असतानाही सामना वाचवू शकला नाही. केवळ आयपीएल सामन्यांमधील सरावावर आधारलेला भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात उघडा पडला. योग्य नेतृत्वाअभावी, चुकीच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटचे वाटोळे झाले आहे. त्यांनी अनेक दर्जेदार खेळाडूंवर अन्याय करून त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळे भविष्यातील उत्तम भारतीय संघांची जडणघडण सशक्तपणे होऊ शकली नाही.
दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जी गोष्ट साध्य करता आली नाही किंबहुना नियतीने साध्य करू दिली नाही; ती गोष्ट न्यूझीलंडने २३ जूनला साध्य केली. ५० षटकांचे विश्वविजेतेपद त्यांच्या हातून दुर्दैवाने निसटले होते; मात्र यावेळी निसर्गाच्या, पावसाच्या आडकाठीनंतरही त्यांनी कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद पटकाविले प्रचंड मेहनत, स्वत:च्या क्षमतेवरचा विश्वास आणि चिकाटी यामुळे पावसामुळे संपूर्ण दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतरही त्यांनी हे यश मिळविले.
दुसरीकडे फाजिल आत्मविश्वास, अपुऱ्या पूर्वतयारीनंतरही बेसावध किंवा बेजबाबदार असलेला भारतीय संघ, संधी असतानाही सामना वाचवू शकला नाही. केवळ आयपीएल सामन्यांमधील सरावावर आधारलेला भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात उघडा पडला. भारतीय संघाच्या उणिवा एवढ्या स्पष्ट झाल्या की हा संघ अंतिम सामन्यात कसा पोहोचला असा प्रश्न पडावा. इतर संघांच्या चुकांमुळे आणि त्यांच्या अपयशावर बऱ्याच वेळा आपले यश आणि आगेकूच होत आली आहे. निर्विकारपणे जशी ऑस्ट्रेलिया पताका स्थानापर्यंत पोहोचते तसं आपल्याबाबतीत फारच कमी वेळा घडले आहे.
यावेळी, अंतिम फेरी गाठतानाही तसंच घडलं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना मागे सारून भारताला अंतिम फेरीतील दुसरे स्थान पटकाविता आले ते अगदी अखेरच्या क्षणी. भारतात ‘आखाडे’ खेळपट्ट्या बनवूनही आपण जेमतेम अंतिम फेरी गाठली होती.भारताच्या यशाचे दुसरे कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियन संघांने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दौऱ्यावर न जाण्याचा घेतलेला निर्णय. पर्यायाने त्यांना गुणांवर पाणी सोडावे लागले. भारताविरुद्ध स्वगृही मालिकेतही त्यांनी अनपेक्षित गुण गमाविले होते. त्यामुळेच भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला दुसरा संघ होता.
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी भारतीय संघांची सूत्रे स्वीकारल्यापासून आपल्याला आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत यश मिळालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याची दोघांची वृत्ती. विराट कोहली भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वामुळे आणि नवोदितांवर दाखविलेल्या विश्वासामुळे भारताने मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. मात्र क्रिकेट विश्वाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वगुणाचे त्यावेळी कौतुक केले होते. परंतु रवी शास्त्रीने मात्र त्यावेळी विराटच्या याआधीच्या डावपेचांमुळे व पूर्वतयारीमुळे जिंकल्याचे म्हटले होते. संधी मिळते तेव्हा मग विराट कोहलीही शास्त्रीच्या या उपकारांची परतफेड त्याचे कौतुक करून करतो. या दोघांच्या ‘मिलीभगत’ मुळ भारतीय क्रिकेटचे वाटोळे झाले आहे. त्यांनी अनेक दर्जेदार खेळाडूंवर अन्याय करून त्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळे भविष्यातील उत्तम भारतीय संघांची जडणघडण सशक्तपणे होऊ शकली नाही. कोहलीचे नेतृत्वगुण हा नेहमीच चर्चेचा विषय बनून राहीला आहे. संघातील खेळाडू आणि कोहली नेहमीच एकाच “वेव्हलेंथवर” नसतात. कप्तान कोहली आणि संघांतील खेळाडू यांच्यात नेहमीच सूर जुळतात असे नाही. त्यामुळे अनेकदा भारतीय संघांची मैफल बेसूरी झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोहलीचा भडक स्वभाव. खेळाडूंची ज्येष्ठता किंवा प्रसंग पाहता तो चुका दाखवून देत असतो. सर्वांसमोर अपमान झाल्यास खेळाडूंवर दडपण येते. धोनी यशस्वी कप्तान झाला. त्याचे कारण हेच होते. तो कोहलीपेक्षा जिव्हारी लागेल असे बोलायचा. पण त्या-त्या खेळाडूंना समजेल असे षटक संपले की दुसऱ्या टोकाला जाताना तो दोषी खेळाडूंचे कान उपटायचा. कोहलीला ते जमले नाही.
कप्तानाचा “क्रिकेट सेन्स” हा त्यानंतरचा भाग. अजिंक्य रहाणेमध्ये तो कोहलीपेक्षा अधिक दिसला. त्यामुळे जेव्हा जेव्हा कोहलीच्या अनुपस्थितीत संधी मिळाली, तेव्हा तेव्हा रहाणेच्या त्या गुणांची प्रचिती आली.नेतृत्वगुणाप्रमाणेच संघनिवडीच्या बाबतीतही कोहली -शास्त्री जोडगोळी कमी पडते. खरं तर संघव्यवस्थापन हा निर्णय घेते. पण संघनिवडीच्या बाबतीत कोहली, हाच सर्वेसर्वा असतो. रवी शास्त्री फक्त त्याच्या निर्णयांनंतर मम् म्हणत असतो.
त्यामुळेच साऊदॅम्प्टनला भरपूर पाऊस असतानाही दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याची चूक कोहलीने केली आणि ती चूक भारतीय संघाला अखेरपर्यंत नडली. वातावरणातील दमटपणा, २० डिग्री तपमान असताना खेळपट्टी फिरकी पेक्षा स्वींग गोलंदाजीला सहाय्य करणार हे कोहली-शास्त्री जोडीला ठाऊक नसावे याचेच आश्चर्य वाटते. महंमद सिराज हा उत्तम वेगवान व स्वींग गोलंदाज आहे. अनफिट बुमरा आणि निवृत्तीकडे झुकलेला इशांत शर्मा यांना सिराजची लाभलेली साथ त्या दोघांच्या उणिवा झाकणारी ठरली असती. चुकीच्या निर्णयाचे विराट कोहलीने केलेले समर्थन मात्र अनाकलनीय आहे. कोहली म्हणतो वेगवान किंवा मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंची उणिव भासली.
खरं तर भारताच्या अंतिम पाच खेळाडूंचे फलंदाजीतील योगदान हा चेष्टेेचा विषय आहे. अश्विन वगळता इतरांनी फलंदाजीनी आपल्या योगदानाचा कधीच गांभिर्याने विचार केला नाही. अंतिम सामन्यातील दोन्ही डावातील भारताच्या तळाच्या खेळाडूंचे एकूण योगदान आहे अवघ्या १२ धावांचे. याउलट न्यूझीलंडला पहिल्या डावात मिळालेली छोटीशी परंतु निर्णायक आघाडी तळाच्या खेळाडूंनीच मिळवून दिली होती. त्यांचे योगदान होते ८७ धावांचे. ६ बाद १६२ वरून तळाच्या ४ खेळाडूंनी न्यूझीलंडला २४९ पर्यंत नेले. हा फरक देखील निर्णायक ठरला.
भारताच्या तळाच्या फलंदाजीच्या शोकांतिकेमुळे शेपूट मोठे झाले आहे. शामी, ईशांत शर्मा, बुमरा सणासुदीला कधी तरी खेळपट्टीवर उभे राहतात. त्याचे कारण सराव नेट्सध्ये सरावाचा केवळ सोपस्कार त्यांच्याकडून उरकला जातो. स्थानिक गोलंदाज त्यांना गोलंदाजी करतात. भारतीय प्रशिक्षकांची ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत असेच पुढेही चालू राहणार.
रोहित शर्मा, पुजारी, कोहली, रहाणे ही आपली फलंदाजीची फळी. भारतच्या संथ खेळपट्टीवर यांच्यापैकी दोघे उभे राहीले तरीही आपले भागते. मात्र परदेशात चेंडू स्वींग व्हायला लागला किंवा अधिक उसळायला लागला की समस्या निर्माण व्हायला लागतात. आऊटस्वींगवर कोहली इंग्लंडमध्ये यापूर्वीही ‘बकरा’ बनला होता. त्याच्या त्या कच्च्या दुव्याचा न्यूझीलंडने दोन्ही डावात फायदा उचलला. पुजाराही बाहेरचा स्वींग खेळू शकलो नाही. अजिंक्य राहणे प्रचंड मेहनत करून एकाग्रता दाखवून खेळपट्टीवर उभा राहतो. पण ४० धावांनंतर त्याची एकाग्रता अचानक ढळते आणि मोठा डाव खेळण्याच्या क्षमतेपर्यंत येऊन तो अचानक बाद होतो. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे खेळाडू ‘टाईमिंग’वर खेळणारे आहेत. त्यांना चेंडू बॅटवर वेगात आलेला आवडतो. पण संथ खेळपट्टीवर त्यांचे फटके चुकायला लागतात. भारताची सलामी व मधली फळी एकाच वेळी अपयशी ठरली आणि न्यूझीलंडपुढे आपण आव्हान उभे करू शकलो नाही. भारतीय संघाचे दौरे किंवा भारतातील मालिकांचे आयोजन करताना. बीसीसीआय क्रिकेटचा किंवा आपल्या संघांचा विचार करीत नाही. केवळ आर्थिक बाबीवरच त्यांचे लक्ष केंद्रित असते. त्यामुळे अनेकदा अधिक सराव सामन्यांऐवजी थेट कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात येते. सरावाशिवाय भारतीय संघ कसोटीत उतरतो, आणि सलामीलाच पराभूत होतो, असं अनेकदा घडलंय. यावेळी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. मात्र विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या सामन्यात भारतीय संघ थेट उतरला. भारतीय संघाला संघातील फार खेळाडूंनी ना चाचपणी करता आली किंवा ज्येष्ठ खेळाडूंना ना सरावाची संधी मिळाली.
याउलट न्यूझीलंड संघाची इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची खडतर मालिका झाली. न्यूझीलंडच्या फलंदाज व गोलंदाजांना इंग्लंडच्या दर्जेदार खेळाडूंसमोर खेळण्याच्या उत्तम सराव मिळाला. तो सरावच त्यांना विजेतेपद देऊन गेला.फक्त दौऱ्याचे अयोग्य आयोजनच नव्हे तर कसोटी संघांची निवडदेखील आयपीएल स्पर्धेच्या कामगिरीवरून केली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटची कामगिरी कसोटी क्रिकेटसाठी किती पुरक आहे? फसव्या आकडेवारीच्या आधारावर झालेली संघनिवड भारताला कायम अडचणीत आणणारीच ठरली आहे.
आयपीएल या सोन्याची अंडी देणाऱ्या स्पर्धेचे बीसीसीआयच्या दृष्टीन एवढे महत्त्व आहे की विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा आयपीएल स्पर्धा कशी पार पडेल हे निश्चित करण्याएवढे अबू धाबीमध्ये डेरा टाकून बसले होते.क्रिकेटच्या प्रति जर माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीलाच एवढा रस असेल तर भारतीय संघाने अंतिम सामना फारसा गांभिर्याने न घेतल्यास आश्चर्य ते काय?
पाच दिवसांच्या क्रिकेटकडून आता आपण पुन्हा एकदिवसीय किंवा मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळत आहोत. विराट म्हणत होता आता आमच्या संघांची ताकद वाढवावी लागेल. म्हणजे काय? त्यासाठी त्याला संघांत बदल करावे लागतील. स्वत:ला, स्वत:च्या नेतृत्त्वशैलीला बदलावे लागेल. सहकाऱ्यांशी मैदानावर बोलावे लागेल. चर्चा करावी लागेल. त्यासाठी त्याला त्याचा ‘इगो’ बाजूला ठेवावा. याच संघातील काही खेळाडू रहाणेच्या नेतृत्त्वाखाली उत्तम खेळले. त्यापाठची कारणे जाणून घ्यावी लागतील. सिराज व शार्दुल ठाकूर यांच्यासारख्या नवोदित गोलंदाजांसोबत सल्लामसलत करताना अजिंक्य रहाणे अनेकदा दिसायचा. त्यामुळेच नवोदितांनीही राहणेसाठी, संघासाठी बाजी लावली. विराटसाठी सर्वच खेळाडू तसे करताना दिसतील, त्यावेळी भारतीय संघ पराभूत होताना फारसा दिसणार नाही. ऑस्ट्रेलियात फलंदाजीमध्ये जेव्हा, अश्विन किंवा शार्दुल ठाकूर हे किल्ला लढवित होते, त्यावेळी ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि त्यांच्या धैर्याने कामगिरीचे जेव्हा कप्तान राहणेने जाहीर कौतुक केले तेव्हा इतरही नवोदितांना स्फूर्ती मिळत गेली. कोहलीला ते जमेल काय? रहाणेने ‘ड्रेसिंग रूम’मध्ये जेव्हा सहजपणा आणला असं अश्विनने जाहीरपणे सांगितले होते. ती सहजता संघातील सहकाऱ्यांसोबत जपण्याचे कौशल्य कोहलीला विकसित करता येईल का?
कोहलीला विकसित करता येईल का? कोहली बदलला का? ते लवकरच दिसेल… घोडा मैदान फारसे दूर नाही!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.