आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक- समकाल:जावे तिच्या वंशा...

महेंद्र कदम18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • Divya Marathi Rasik Special Supplement Mahendra Kadam SAMKAL Supplement

जागतिक पातळीवर संस्कृतीच्या उद्गात्या स्त्रिया असल्याने, संस्कृतीच्या विचारात तिला दुर्लक्षून चालत नाही. संस्कृतीच्या संवर्धन-विस्तारात तिचा मोठा सहभाग राहिला आहे. भारतीय संस्कृती ही मूळची कृषी संस्कृती असल्याने तिथूनच आपल्याला विचार करावा लागतो. शेतीचा शोध स्त्रीने लावला असे मानले जाते. शेतीला क्षेत्र-क्षत्र असे म्हणत. क्षत्रचा मूळ अर्थ होतो स्त्री. ‘क्षत्र’वरून क्षत्रिय संज्ञा तयार झाली. म्हणजे स्त्री ही शेती करणारी या अर्थाने क्षत्रिय आहे. गौतम बुद्ध क्षत्रियला खत्तिय (“खेत्तानं अधिपति ति खो खत्तियो’: अंग्गसुत्त) असे म्हणतात. खत्तियचा (खत्ति- खेती- शेती) अर्थ आहे शेतीचा प्रमुख. त्यामुळे क्षत्रियचा मूळ अर्थ शेती करणारी ती क्षत्रिय स्त्री असा होता. नंतर पुरुष सत्ता आल्या आणि पुरुष क्षत्रिय बनला.

शेतीच्या शोधाचे गणित साधे नाही. खाण्यालायक धान्य शोधून काढताना, ते खाऊन बघावे लागते, म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचा प्रवासच. हा प्रवास पुरुषाने नाही, स्त्रीने केला, कारण ती माता होती. प्राचीन कुटुंबात पुरुषाला स्थान नव्हते. तो आगंतुक होता. संस्कृतमध्ये ‘मा’चा अर्थ ‘वाटप’ असा होतो. यावरून वाटप करणारी ती ‘माता’ अशी संज्ञा रूढ झाली, तर ‘दोहन’ म्हणजे दूध काढणे, यावरून मुलीला दुहिता असे संबोधले. यावरून मूळ भारतीय संस्कृती ही कृषी-मातृसत्ताक आहे, हे लक्षात येते. केरळमध्ये मौर्य काळातही मातृसत्ता असल्याची नोंद शरद पाटलांनी केली आहे. प्राचीन स्त्रियांनी शेतीचे तंत्र विकसित केले. सणांमधून, विधितंत्रातून ते टिकवून ठेवले. धार्मिक पौरोहित्यही केले. आजचा पुरुष पुरोहित कासोटा घालून विधी करतो, ते स्त्रीच्या पुरोहित वेशभूषेचे प्रतीक आहे.

ऋग्वेदात ज्या निर्ऋतीचा मृत्यूची देवता म्हणून उल्लेख येतो, त्यातील ‘ऋत’चा अर्थ ‘पाणी’ असा होतो. यावरून ती जलदेवता, अप्सरा, आसरा ठरते. म्हणून साती आसरांचे निवासस्थान नद्या असतात. नदीचे जसे शेतीच्या पिकाशी आणि सृजनाशी नाते आहे, तसे स्त्रीचे मातृत्वाशी आहे. यावरून नदी आणि स्त्रीचा अतूट धागा जोडला आहे. तो उलगडताना नेणिवेचा विचार करावा लागतो. निर्ऋती ही अशी नेणिवेत गेलेली स्त्रीराज्ञी आहे. निर्ऋती, सीता, जिजाऊ, राणी येशूबाई, हिरकणी ते आजची आधुनिक माता असा मोठा प्रवास स्त्रीने केला आहे. मूळ स्त्री-मातृसत्ताक पद्धतीत समता होती. तिचेच नेणिवेतील रूप बुद्धाने आपल्या जाणिवेत आणून धम्माच्या रूपाने जातिभेद नष्ट करून समता प्रस्थापित केली होती.

मात्र, कालांतराने गरोदरपणाच्या, मूल संगोपनाच्या काळात पुरुषाने तिला घरात ठेवून शेती ताब्यात घेतली. मातृत्वामधून तिची सुटका होऊ दिली नाही. त्यातून स्त्री-मातृसत्ता संपल्या. पितृसत्ता आल्या. शेतीचा मालक पुरुष झाला. तोच क्षत्रिय बनला. शेती, लढाई करू लागला. हळूहळू पुरुषाने तिला बांधून टाकले. तिच्या गुलामीचे कायदे झाले. ती गुलामी आजही संपली नाही. तरीही तिने आपल्या मातृत्वाला कमीपणा येऊ दिला नाही. आज कुटुंबव्यवस्था मोडकळीस येत असताना तिचं गौरवीकरण करण्याचा हेतू नाही. स्त्रीवादी महिला मातृत्वाच्या नावाखाली, त्यांना पुरुषांनी गुलाम करू नये म्हणून स्वातंत्र्याची भाषा बोलतील. परंतु, मातृत्व ही नवसृजनाची, नवनिर्माणाची, पुनर्जन्माची कथा आहे. त्यातून ती तावून-सुलाखून निघते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यामागे बायकोने आत्महत्या केल्याचे उदाहरण सापडत नाही. तिच्यातली आई तिला जगण्याचे बळ देते. नवऱ्यामागे ती खंबीरपणे उभी राहते. अशा सक्षमपणे उभ्या राहिलेल्या हजारो शेतकरी-कामकरी स्त्रीमाता सभोवती दिसतात. व्यसनी नवऱ्याचा संसार सुरळीत चालवतात. खरं तर, आपल्या परंपरेत स्त्रीच्या प्रगतीत नवरा अडथळा ठरतो, याचाही नव्याने विचार व्हायला हरकत नाही.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं आपण म्हणतो. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर या दोन्हींची मिळून बनते ती ‘आई’! मात्र, सगळे पुरुषी अपशब्द आईवरूनच उच्चारले जातात, हे कटुसत्य आहे. महिलांना संधी देऊन अथवा केवळ तिच्यातल्या आईला सन्मानित करून चालणार नाही. बायको, बहीण, नणंद, भावजय, नोकरी- राजकारण- धर्मकारण करणारी स्त्री अशा तिच्या सर्व प्रतिमांचा सन्मान करायला हवा. ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं..’ या फ. मुं. शिंदे यांच्या ओळी किती समर्पक आहेत. आई नावाचं हे ‘गाव’ कायम गजबजलेलं ठेवायचं असेल, तर त्याच्या अंतरंगाशी प्रत्येकानं समरस व्हायला हवं.

समकाल महेंद्र कदम mahendrakadam27 @gmail.com संपर्क : ९०११२०७०१४