आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Updates: Vinod Jaitmahal Article On Mazi Shortfilms

माझी शॉर्टफिल्म:गाणं तुकडोजीबाबाचं... आष्टी चिमूरच्या लढ्याचं..!

एका वर्षापूर्वीलेखक: विनोद जैतमहाल
  • कॉपी लिंक

अनेक अडचणींवर मात करत ‘आष्टी १९४२ : एक वीरगाथा' हा लघुपट पूर्ण झाला. त्याचे पहिले प्रदर्शन आष्टी गावातच झाले. आजूबाजूच्या गावांमधले शेकडो लोक आले होते. दुसऱ्या दिवशी अमरावतीला परताना वाटेत एका चौकात थोडं थांबलो. रात्री दहाची वेळ. कारमध्ये शॉर्टफिल्ममधलं ‘ते’ गाणं वाजत होतं. एक आजोबा रस्त्याच्या पलीकडून धावत कारजवळ आले. वाकून गाणं ऐकू लागले. ते संपल्यावर म्हणाले, "हेच तं गाणं होय ना बाप्पा, तेच्यानं तुकड्या बाबाले जेल झाल्ती..’

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटना जशा अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या होत्या, तशा सुवर्णाक्षरात नोंद कराव्या अशाही होत्या. त्यापैकीच एका लढ्याचा इतिहास आज सांगणार आहे. ८ ऑगस्ट १९४२. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून गांधीजींनी मंत्र दिला ‘करो या मरो!' या मंत्राच्या मशालीने ९ ऑगस्टपासून गावागावांत स्वातंत्र्यासाठी आंदोलन पेटले. असेच एक गाव आहे आष्टी. वर्धा जिल्ह्यातलं. या गावाला ‘शहीद आष्टी' म्हणतात. डाॅ. गोविंदराव मालपे हे तेथील पहिले हुतात्मा. तो दिवस होता १६ ऑगस्ट १९४२. नागपंचमीचा सण. गोविंदराव घरी जेवत असताना सत्याग्रहाचा निरोप मिळाला आणि तसेच उठून ते पोलिस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेले. पांडुरंग सव्वालाखे, मोतीराम होले, रामभाऊ लोहे असे अनेक वीर या मोर्चात पुढे होते. पोलिसांनी बंदुका उचलल्या. तेव्हा पुढे होऊन छातीवर गोळ्या झेलणारे बहाद्दर होते डाॅ. गोविंदराव. अनेक वीर त्या दिवशी हुतात्मा झाले. नवाब रशीद खान, केशवराव ढोंगे, पंची गोंड, उदेभान कुबडे यांच्यासह हरिलाल मारवाडी या कोवळ्या मुलानेही पुढे सरसावत प्राणांची आहुती दिली...

अशा जाज्वल्य इतिहासाचा वारसा लाभलेले गोविंदरावांचे सुपुत्र डाॅ. अरविंद मालपे यांनी २०११ मध्ये या सत्याग्रहावर शॉर्टफिल्म अर्थात लघुपट करायचे ठरवले. त्यासाठी पटकथा आणि गाणी लिहायची आहेत, असा निरोप अमरावतीचे दिग्दर्शक कुलदीप मुंदे यांनी दिला. मी तातडीने जालन्यातून अमरावतीला पोचलो. तेथून मुंदे यांच्या गाडीने थेट आष्टीत डाॅ. मालपेंच्या घरी गेलो. सत्याग्रहावेळी ज्या पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता, तेथे आता शाळा आहे. तेथील ग्रंथालयातून काही पुस्तके मिळवली. गावातील जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. वीरपत्नी राधाबाई मालपे यांच्याशी बोललो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेला आष्टी चिमूरचा हा लढा प्रसिद्ध आहे. एका पुस्तकात तुकडोजी महाराजांचे एक गीत सापडले...

झाड झडुले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगी सेना। पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेंगी किनारे।।

यातील दोन ओळी तशाच ठेवून त्यावर नवे गाणे रचले. पटकथा, गाणी पूर्ण करून मी जालन्यात आलो. शूटिंगची तयारी सुरू झाली. सत्याग्रह झाला होता, तेथेच शूटिंग करायचे ठरले. कलावंत जमवले. यात महिना उलटला. शूटिंग सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सारी कामे आटोपून अमरावतीकडे निघालो. रात्री अकोल्यापर्यंत पोहोचलो, तर पुढे अमरावतीसाठी बस दोन तासांनी होती. म्हणून एका मारुती व्हॅनमध्ये बसलो. त्याने मूर्तिजापूरला रस्त्यावर सोडले. त्याच व्हॅनमधून एक तरुण सैनिक उतरला. रात्रीचे अकरा वाजलेले. एकही वाहन तेथे थांबत नव्हते. त्यात पाऊस सुरू झाला. मग आम्ही दोघे चालत बस स्टँडवर गेलो. तेथे फक्त एक कुत्रे झोपलेले होते. आता तुफान पावसाचे तांडव सुरू झाले होते. बाहेर एक रिक्षा उभी होती. आम्ही त्याला चारशे रुपयात तयार केले. धुवांधार पावसात अमरावतीकडे प्रवास सुरू झाला. वायपरला दाद न देणाऱ्या धारा काचेवर आदळत होत्या. मंद हेडलाइटच्या भरवशावर ताशी वीस किलोमीटरच्या वेगाने आम्ही कूच करीत होतो. मध्येच त्या सैनिकाचे गाव लागले. दोन किलोमीटर आत, चिखलाचा निसरडा रस्ता पार करत रिक्षाने त्याला गावात सोडले. पुन्हा त्याच मंदगतीने अमरावतीकडे निघालो. रात्री दोन वाजता बडनेरा स्टाॅपवर दिग्दर्शक कुलदीप मुंदे थांबलेले होते. त्यांच्यासोबत घरी गेलो. दोन तास झोपलो. पहाटे पाचला आमची गाडी आष्टीच्या दिशेने निघाली... अशा अनेक अडचणींवर मात करत काही दिवसांनी ‘आष्टी १९४२ : एक वीरगाथा' हा लघुपट पूर्ण झाला. त्याचे पहिले प्रदर्शन आष्टी गावातच झाले. आजूबाजूच्या गावांमधले शेकडो लोक आले होते. शो संपल्यानंतर आमचा सत्कार गावकऱ्यांनी केला. दुसऱ्या दिवशी आम्ही अमरावतीला परतलो. वाटेत एका चौकात थोडेसे थांबलो. रात्री दहाची वेळ. कारमध्ये शॉर्टफिल्ममधील ते गाणं वाजत होतं. एक आजोबा रस्त्याच्या पलीकडून धावत कारजवळ आले. वाकून गाणं ऐकू लागले. ते संपल्यावर म्हणाले, "हेच तं गाणं होय ना बाप्पा, तेच्यानं तुकड्या बाबाले जेल झाल्ती..’ याच गाण्यामुळे इंग्रजांनी तुकडोजी महाराजांना तुरुंगात डांबले होते. काल त्याच गाण्यासाठी माझा सत्कार झाला होता. गुलामी आणि स्वातंत्र्यात हाच तर फरक असतो...

(इन्फो)

पत्थर सारे बॉम्ब बने थे... तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या गीतांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल तेवत ठेवली. झाड झडुले शस्त्र बनेंगे.. या त्यांच्या गीताने आष्टी चिमूरचा लढा आधी कागदावर अन् मग फिल्मवर उतरवण्याला बळ मिळाले. या गीताच्या दोन ओळी घेऊन मी हे नवे गाणे लिहिले... आष्टी गाँव की सुनो हक़ीक़त। इन्कलाब की जान थी क़ीमत।। ज़ुल्मो सितम वो सहते कैसे। बढ़ने लगी थी उनकी हिम्मत।। तख्त पलटना वाजिब था जो मुश्किल कर दे जीना। पत्थर सारे बाॅम्ब बने थे भक्त बनी थी सेना।। ‘आष्टी १९४२ : एक वीरगाथा' या शॉर्टफिल्मला या गाण्याने वेगळी उंची लाभली.

विनोद जैतमहाल (लेखक, अभिनेता)
संपर्क : ९८२३०२८३३२

बातम्या आणखी आहेत...