आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:धगधगता अफगाणिस्तान, भारतासमोर चिंता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची पाठ वळताच अफगाणिस्तान पुन्हा तालिबानी दहशतवाद्यांच्या कब्जात गेला आहे. ९-११ चा गुन्हेगार, अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतर तसाही अमेरिकेला अफगाणिस्तानात फारसा रस राहिला नव्हता. अफगाणिस्तानात फौजा ठेवण्यासाठी होणारा अब्जावधी डॉलरचा खर्च आणि देशांतर्गत दबावामुळे अमेरिकेने तिथून काढता पाय घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तेथे भारताच्या दृष्टीने अत्यंत नाजूक आणि धोकायदायक स्थिती आता बनली आहे.

अफगाणिस्तानमधील भारताचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या झारांज शहरापर्यंत तालिबानी पोहोचले आहेत. त्यामुळे अफगाणमार्गे इराणमधील चाबहार बंदराशी जोडून तेल आयात आणि इतर व्यापार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना हा मोठा धक्का आहे. तालिबानी अर्थातच पाकिस्तानच्या तालावरच काम करीत आहेत आणि ते भारताच्या दृष्टीने अधिक चिंताजनक आहे. तालिबानी दहशतवादी एकेका प्रांतावर कब्जा करीत सुटले आहेत. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष अब्दुल गनी यांनी वली महंमद अहमदजाई यांची लष्करप्रमुख पदावरून हकालपट्टी केली, तर अर्थमंत्री खालिद पायेंदा अफगाणमधून परागंदा झाले अाहेत.

निर्नायकी माजली असल्याने भारतानेही आपल्या नागरिकांना विशेषत: दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. अफगाणमधील हिंदू-शीखच नव्हे तर मुस्लिमांचेही भवितव्य अंधकारमय आहे. तेथे शिक्षण, कला - साहित्य, संगीत हळूहळू बहरत होते. महिला-मुली घराबाहेर पडून विविध क्षेत्रांत झेप घेण्याची स्वप्ने पाहत होती. पण, आता सिरिया, इराकपाठोपाठ अफगाणिस्तानही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानी दहशतवादी आणि तालिबानी एकत्र आल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...