आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मिरवणार अन् जिरवणारही..?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २२ वर्षांचा झाला. त्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सविस्तर बोलले. आपल्या भाषणात त्यांनी अनेक संकेतही दिले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, विधानसभा, लाेकसभा आघाडी एकत्र लढेल, शिवसेना विश्वासू पक्ष आहे, असे सांगत सत्ता सामान्यांच्या हाती जावी, अशी मांडणी त्यांनी केली. या भाषणातून एक स्पष्ट झाले, ते म्हणजे अंतर्गत मतभेदाने आघाडी सरकार पडणार नाही. ते पडण्याची आस लावून बसलेल्यांची पवारांच्या भाषणाने निराशा केली.

आघाडी सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त याआधीही चुकले आहेत. आता नवा मुहूर्त सांगितला जातो, तो मुंबई महापालिका निवडणुकीचा. पुढच्या वर्षी राज्यातील १० महापालिका आणि २७ जिल्हा परिषदांची निवडणूक आहे. आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अडीच वर्षांनी होणारी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच असेल. त्या दृष्टीने आघाडीचे ठरले आहे. मुंबई, डोंबिवली, ठाणे पट्ट्यात शिवसेना, नवी मुंबई, पुण्यात राष्ट्रवादी आणि सोलापूर, अमरावतीत काँग्रेसला मोकळीक मिळेल. ठरल्याप्रमाणे घडले, तर महाविकास आघाडीत बिनसण्याचा नवा मुहूर्त विरोधकांना शोधावा लागेल.

वर्धापनदिनाचा मोका साधत मुरब्बी पवारांनी आघाडीतील अस्थैर्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्राचा हा प्रयोग देश स्वीकारतो की नाही, ते लवकरच कळेल. भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीच्या बांधणीत काँग्रेसची भूमिका कळीची असणार आहे. घडवायचे की बिघडवायचे, हे काँग्रेस नेतृत्वावर अवलंबून असेल. त्याची झलक पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी दिसेल. ऐंशीच्या दशकात प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय ऐक्यास मारक असल्याचे म्हटले जायचे. आज त्याच प्रादेशिक पक्षांकडे लोक आशेने पाहात आहेत. म्हणून आघाडी सरकारला जबाबदारीने वागणे भाग आहे. तोच पवारांच्या भाषणाचा मथितार्थ होता.

बातम्या आणखी आहेत...