आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:भयकारी मुंबापुरी

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई अलीकडे भीतिदायक शहर बनते आहे. देशाची आर्थिक राजधानी भयग्रस्त असावी, हे शोभादायक नाही. धारावीच्या साकीनाकामध्ये परवा जे निर्भयाकांड झाले, त्याने मुंबापुरीतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर सात महिन्यांत मुंबापुरीत बलात्काराचे ५५०, तर विनयभंगाचे ११०० गुन्हे नोंदले आहेत. त्यातील ४४५ आरोपींना अटकही झाली. यंदा महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. आश्चर्य म्हणजे, या आधुनिक शहरात यंदा हुंडाबळीच्या आठ घटना घडल्या आहेत. ३९७ महिलांनी हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

साकीनाका अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक आहे. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. ऐन गणेशोत्सवात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले. पीडितेच्या अल्पवयीन मुलींना शासकीय मदत देण्यात येणार आहे. खंत याची आहे की, या निर्भया प्रकरणातही राजकारण झालेच. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची दखल लक्षणीय आहे. या राष्ट्रीय संस्थांनी अशीच दखल भाजपशासित राज्यात घेतल्यास तिथल्या पीडितांनाही न्याय मिळू शकेल.

साकीनाका प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. या शहरात ३९ टक्के मतदार हिंदी भाषक आहेत. शिवसेनेने या गुन्ह्याला जौनपूर पॅटर्न संबोधले आहे, तर भाजपने उत्तर भारतीयांची बाजू घेत सेनेचा निषेध केला आहे. या घटनेने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. दोन वर्षे झाले तरी हे सरकार महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकले नाही. वर्ष लोटले तरी शक्ती कायद्याला मूर्त स्वरूप देता आले नाही. म्हणून विरोधकांची टीका सार्थ आहे. मुंबईचा भयकारक चेहरा बदलण्यासाठी आता सरकारला ठोस पावले उचलावीच लागतील.

बातम्या आणखी आहेत...