आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:अराजकाकडे..?

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दुसरी लाट आता देशाच्या अन्य अ-बाधित राज्यांनाही विळख्यात घेऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह दहा राज्यांत असलेला संसर्ग इतर राज्यांमध्येही पसरू लागला आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात हरिद्वारच्या कुंभमेळ्यातून संसर्ग वाढत चालला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर आखाडे कुंभमेळा आटोपण्याच्या निर्णयापर्यंत आले. तिकडे सत्तेच्या शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी प्रचाराच्या आखाड्यात उतरलेल्यांच्या मेळ्यांमुळे बंगाल, आसाम, केरळसह निवडणुका होत असलेली राज्ये नवे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत. या राज्यांबरोबरच दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्येही आता कडक निर्बंध लावले जात आहेत.

गुरुवारी चोवीस तासांत देशामध्ये तब्बल दोन लाख १६ हजारांवर कोरोनाबाधित आढळले. ही संख्या जगात या दिवशी सापडलेल्या रुग्णांच्या २७ टक्के इतकी आहे. म्हणजे जगाच्या एकचतुर्थांशहून अधिक लोक एकट्या भारतात दररोज बाधित होत आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी प्रत्येक दिवस युद्धाचा बनला आहे. महाराष्ट्रासाठी तर प्रत्येक तास, प्रत्येक क्षण निर्णायक लढाईचा झाला आहे. पण, युद्धासारखे निकराने लढण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकार रणभेरी फुंकण्यात धन्यता मानत आहेत. ‘हाफकिन’ला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची केंद्राने दिलेली परवानगी, हीच काय ती आजच्या घडीची दिलासा देणारी गोष्ट. बाकी आरोप-प्रत्यरोप व कोंडी - कुरघोडीचे छुपे खेळ या स्थितीतही सुरूच आहेत. दोन्ही सरकारांमध्ये कुठे ताळमेळ, एकसूत्रता दिसत नाही. परिणामी राज्य या लाटेत अक्षरशः होरपळते आहेत.

रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स आणि वेटिंग या शब्दांनी लोकांच्या जगण्या - मरण्याभोवती फेर धरला आहे. त्यातच कोरोनाचे म्युटेशन बदलल्याने तज्ज्ञांनाही लक्षणांचा अंदाज लागेनासा झाला आहे. अचानक चक्कर येऊन लोकांचे जीव जात आहेत. बेड, उपचारांअभावी लोक रुग्णालयांच्या दारोदारी भटकत आहेत. दुसरीकडे, मृत्यूनंतर होणारी अवहेलना रोज नवा नीचांक गाठते आहे. अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची घटना माणुसकीलाही लाज वाटावी अशी आहे. एकूणच महामारीच्या गंभीर, अतिगंभीर स्थितीकडून भयावह अवस्थेकडे आपण जात असल्याची ही चिन्हे आहेत. राज्यकर्ते आणि जनतेने आत्ताच डोळे उघडले नाहीत, तर यापुढचे प्रत्येक पाऊल भविष्यातील अराजकाकडे पडत जाईल.

बातम्या आणखी आहेत...