आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:अफगाणिस्तान पुन्हा अंधारवाटेवर...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपेक्षेप्रमाणे तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला आहे. साधारण १५ ते २० दिवसांच्या आतच अफगाणी सैन्याचा पाडाव झाला. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी लाखो अफगाणी नागरिकांना शब्दश: वाऱ्यावर सोडून देशातून परागंदा झाले आहेत. आता मुल्ला अब्दुल गनी बरादर या तालिबानी प्रमुखालाच राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पॅलेस ताब्यात घेतल्यावर तालिबान्यांनी तिथे जंगी ‘दावत’ केली. ही दावत यादवी आणि तालिबानच्या माथेफिरू राजवटीच्या या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे. २० वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीची दहशत, धुमाकूळ अनेकांच्या स्मरणात असेल. अगदी तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे.

फरक एवढाच की, अमेरिका-रशियाचे यापूर्वीच हात पोळले आहेत. त्यामुळे या वेळी अमेरिकेेऐवजी चीन केंद्रस्थानी आला आहे. १९९६ च्या तालिबानी राजवटीला पाकिस्तानसह केवळ तीन देशांनी मान्यता दिली होती. आता तालिबान्यांनी सत्तास्थापनेची घोषणा करताच चीनने मैत्रीचा हात पुढे केला आहे. सुमारे दहा लाख अफगाणी नागरिकांनी आश्रयासाठी पाकिस्तानकडे धाव घेतली आहे. अनेकांनी इराणमार्गे तुर्कीकडे पलायन केले आहे. निर्वासितांचे हे लोंढे भारताकडेही येऊ शकतात. तालिबानप्रमुख बरादर याने अफगाणिस्तानात शांतता असेल असे सांगितले आहे. अर्थात, पुन्हा अंधारवाटेवर निघालेल्या अफगाणिस्तानसाठी ही शांततासुद्धा भयाण ठरू शकते.

अफगाणी नागरिकांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. यावरून पाकिस्तानचे मनसुबे लक्षात येतात. चीन या स्थितीचा फायदा उठवत असल्याने भारताला लक्ष घालावे लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्याचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे भारताला स्वत:सोबतच दक्षिण आशियाच्या व जगाच्या भवितव्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...