आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:चिंता वाढली, पण सावध संयमाची गरज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेला अपेक्षित नव्हते त्यापेक्षाही झपाट्याने तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. रक्तपात न होता त्यांना हा कब्जा मिळाला, हे विशेष. अफगाणिस्तानातील गोंधळाच्या बदलाने भारतासमोर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. तालिबान्यांनी युद्ध संपल्याचे जाहीर करायच्या अगोदरच पाकिस्तानने त्यांना समर्थन दिले. त्या पाठोपाठ चीननेही तालिबान्यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच मैत्रीचा हात पुढे केला आहे. यामध्ये चीनचा सहभाग भारतासाठी अधिक धोकादायक आहे. तालिबान, पाकिस्तान, चीन, इराण, तुर्कस्तान अशी एक आघाडी भविष्यात उभी राहू शकते.

पाक व चीनप्रमाणे कोणकोणते देश अफगाणिस्तान सरकारला मान्यता देतात, हे पुढे स्पष्ट होईल. इस्लामी देशांव्यतिरिक्त अन्य देशांना जी भीती आहे, ती अफगाणिस्तानात अतिरेक्यांचे कारखाने निर्माण होण्याची. त्या भीतीमुळेच अमेरिका आणि सारे युरोपीय देश काळजीत पडले आहेत. भारतासाठी हा मुद्दा अधिक चिंतेचा आहे. कारण पैशाची ताकद असलेला चीन, पाकिस्तान व अफगाणिस्तान ही साखळी भारताला धोकादायक ठरू शकते. पाक लष्कराने तयार केलेल्या जिहादी गटाने तालिबान्यांना साथ दिली. त्यांचे तेथील काम आता संपले. त्यामुळे त्या जिहादी गटांचा वापर भारताविरुद्ध होईल का, ही भारताची चिंता आहे.

या पार्श्वभूमीवर तालिबानच्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिलेली आश्वासने ही आश्चर्यकारक आहेत. महिलांना अधिकार, कोणाचाही सूड नाही, अफगाणी मातीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध अतिरेकी कारवाईसाठी होऊ देणार नाही, खासगी माध्यमांना मुक्तपणे काम करू देणार, ही सगळी त्यांची आश्वासने अमलात येतील तेव्हाच खरे. पण, भारताने मात्र कोणतेही धोरण निश्चित करण्याची घाई न करता आणि अमेरिकेबरोबर वाहवत न जाता शांतपणे व संयमाने स्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...