आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:आता तरी भानावर या..!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दुसरी लाट गेली आणि सारे सुरळीत झाले, असे मानून नव्याने डाव मांडला जात असताना या विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पुन्हा धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळेच सर्वोच्च वेगाने लसीकरण करणाऱ्या इंग्लंडसह अनेक देशांची निर्बंधांकडे वाटचाल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य सरकारनेही सावधानतेचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोविड कृती दलाच्या इशाऱ्यानंतर तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सर्व सज्जता ठेवण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, दुसऱ्या लाटेत सुमारे ४० लाख रुग्णांची नोंद झाली.

डेल्टा प्लस व्हेरिएंट अधिक घातक असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे. त्यासाठी पुरेशा खाटा, औषधे, ऑक्सिजन यांसह रुग्णालये सज्ज ठेवावी लागतील. ऑक्सिजन प्लांट उभारणी वेगाने करणे, औषधांची आगाऊ नोंदणी आणि साठा करून ठेवणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लस शिल्लक असूनही लोक त्याकडे पाठ फिरवत आहेत. लसीच्या उपयुक्ततेला प्राधान्य देण्यापेक्षा ती घेतल्यावर स्टीलच्या वस्तू, नाणी अंगावर चिकटत असल्यासारख्या अशास्त्रीय गोष्टींची चर्चा होणे अधिक लाजिरवाणे आहे. सरकारने वसाहती, वॉर्डस्तरावर केंद्रे उभारून अठरा वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण मोहीम राबवावी.

अर्थचक्र गतिमान ठेवण्यासाठी उद्योग- व्यवहार सुरू ठेवणे आवश्यक आहे. पण, त्यामुळे कोरोना गेल्याच्या भ्रमात न राहता आपणही वर्तन-व्यवहारावर बंधन ठेवत सर्व नियम कसोशीने पाळले पाहिजेत. अन्यथा, वेशीपर्यंत गेलेली महामारी कायमची बाहेर जाण्याऐवजी विनाशाच्या पावलांनी पुन्हा घरात शिरायला वेळ लागणार नाही. तिच्या दुसऱ्या लाटेचा धडा घेऊन शासन-प्रशासन शहाणे झाल्याचे सध्या तरी दिसते आहे. आता आपण भानावर येणार की नाही, हाच प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...