आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मतपेढीच्या लुटीसाठी ‘लोजप’मध्ये फूट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये काका-पुतण्यातील संघर्ष रंगतो आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या पश्चात भाऊ पशुपतीकुमार व मुलगा चिराग यांच्यातील संघर्षामुळे लोकजनशक्ती पक्षात फूट पडली. फोडाफोडीमागे नितीशकुमार आहेत असे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त जनता दलाला विधानसभा निवडणुकीत ‘लोजप’मुळे जबर फटका बसला. भाजपच्या जागा २१ वरून ७४ पर्यंत वाढल्या. पण ‘जदयु’ ४३ पर्यंत खाली आला. चिराग पासवान यांनी आघाडी करण्यास नकार दिल्याचा फटका नितीशकुमारांना बसला.

सलग तीन वेळा मुख्यमंत्री होऊनही भाजपपेक्षा घटत्या जागांचा कमीपणा त्यांंना झोंबला. त्यामुळे बदला घेण्याची व पक्षाची खुंटी बळकट करण्याची त्यांची खटपट आहे. पासवानांंची मागासवर्गीय मतांवर चांगलीच पकड असल्याने ती सैल करण्याचे त्यांचे डावपेच होते. ‘लोजप’चे माजी खासदार सूरजसिंहांना जवळ करत नितीशकुमारांनी पासवान कुटुंबात फूट पाडली. काका-पुतण्यांना विरोधात उभे केले. पशुपतीकुमार व त्यांच्या समर्थकांना आमदारकीची लालूच दाखवली. हा सगळा खेळ मागासवर्गीयांची मते आपल्या बाजूला वळवण्यासाठी. या खेळात चिराग पासवान एकटे पडले आहेत. बहुतांश कार्यकारिणी त्यांच्या विरोधात आहे.

रामविलास पासवान यांचे नाव साथीला असल्याने मागासवर्गीयांची मते त्यांच्या बाजूला जातील, असा जाणकारांचा अंदाज आहे. मोदींचे हनुमान म्हणवणाऱ्या चिरागना रामाने मदत केली नाही. ते किनाऱ्यावरून गंमत पाहत आहेत. ज्या राज्यांत प्राबल्य नाही, तिथे प्रादेशिक पक्षांबरोबर निवडणूक लढवत त्यांना छोटे-छोटे करत जायचे, ही मोदी, शहा यांची नीती आहेच. भविष्यात चिराग काय करतात, हे बिहारमधील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. राज्यातील दुसरा तरुण नेता तेजस्वी यादव यांच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव चिरागसमोर आहेच. तसे झाले तर पुढची लढाई आणखी रंगतदार होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...