आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:...इंजेक्शन पखालीला !

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि एकूणच कोरोना व्यवस्थापनावरून सरकार व यंत्रणेतील गोंधळ रोज नव्याने समोर येत आहे. गेला महिनाभर राज्यात रेमडेसिविरची वानवा आहे. त्यातूनच काळाबाजार अन् साठेबाजीला ऊत आला. तो रोखण्यात ठाकरे सरकार कमी पडले. पण, ‘एफडीए’ अर्थात अन्न व औषध प्रशासन मात्र थंड राहिले. त्यांना कुठे साठा दिसला नाही की काळ्याबाजाराची कुणकुण लागली नाही. या विभागाचे मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे आणि आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ना जबाबदारी घेतली ना कठोर पावले उचलली. गरजू रुग्णांना इंजेक्शनचा एक डोस मिळत नसताना सत्ताधारी आणि विरोधी नेते त्याच्या कुप्या मोफत वाटत होते. त्यातच एका कंपनीने दीड लाख कुप्या राज्याला पुरवण्याची तयारी दाखवली.

एफडीएने तीन कंपन्यांना निर्यातीच्या साठ्याची राज्यात विक्री करण्यास परवानगी दिली. पण, त्या कंपन्यांनी राज्याला साठा दिलाच नाही. अन्न-औैषध प्रशासन गाफील राहिले. सरकारलाही या प्रकरणात भाजपचा कावा ओळखता आला नाही. भाजपने ज्या कंपनीकडून साठा घेण्याची तयारी केली, त्या कंपनीच्या प्रमुखाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्याला सोडवले आणि एफडीएनेच या कंपनीला विक्रीची परवानगी दिल्याचे पत्र दाखवले. त्यामुळे अन्न-औषध विभाग आणि गृह विभागात समन्वय नसल्याचे उघड झाले. ही दोन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या मुद्द्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली.

शेवटी आयुक्त काळेंची तडकाफडकी उचलबांगडी झाली. वास्तविक रेमडेसिविरच्या गैरव्यवस्थापनाला शिंगणे आणि काळे जबाबदार आहेत. पण, सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे सिद्ध करणाऱ्या अशा अनेक गोष्टी अलीकडे घडत आहेत. परवापर्यंत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संसर्ग वाढताच जनभावनेच्या विरोधात जायला नको म्हणून त्याचा आग्रह धरला. हे प्रकार सरकारमधील विसंवादाच्या रोगावर इलाज करण्याऐवजी प्रशासनाला पुढे करून पखालीला इंजेक्शन देण्यासारखे आहेत. कोरोनाच्या तडाख्यात सापडलेली जनता मात्र यामुळे हकनाक होरपळून निघते आहे.

बातम्या आणखी आहेत...