आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:तिसरी आघाडी अस्तित्वात येणार?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न, तर मुंबईत सरकार पाच वर्षे टिकण्याच्या, कोसळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार व प्रशांत किशोर यांची दहा दिवसांत दुसऱ्यांदा भेट झाली. त्यामुळे तीन वर्षांनंतरच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला आताच सुरुवात झाली. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या फेरजुळणीच्या शक्यतेने जोर धरला. आठ महिन्यांतच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. पंधरा किंवा अधिक पक्षांच्या आघाडी सरकारचा अनुभव चांगला नाही. पाच वर्षांत दोन पंतप्रधानांचा अनुभव देशाने घेतला.

अनेक पक्षांचे सरकार अनेक तडजोडी करून वाजपेयींना चालवता आले. पण, आता तेवढ्या ताकदीचा नेता तिसऱ्या आघाडीला मिळणार का? पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण काँग्रेसला नाही. पण, भाजपविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा पर्याय काँग्रेससहित कोणत्याही पक्षासमोर नाही. त्यामुळेच तिसऱ्या आघाडीची फेरजुळणी करण्याची चर्चा होत राहणार. निवडणूक जवळ येत जाईल, तशी ती वाढणार. पण, तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का नाही? हे आज खात्रीने सांगणे कठीण आहे. मुंबईतही चर्चेला ऊत आला आहे.

मोदी-ठाकरे, पवार-फडणवीस यांच्या भेटी, सरनाईकांचे पत्र यांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या टिकण्याविषयी जोरात चर्चा होते आहे. सरनाईकांच्या पत्रानंतर भाजपच्या नेत्यांचे ठाकरेंनी भाजपकडे वळण्याचे सल्ले वाढले. सरकार टिकण्याविषयी संशयाचा धूर दिसला की, भाजपमधले ‘शिकार हाकारी नेते’ माध्यमांना सरकार फुटण्याबाबतची निवेदने देत असतात. पण, सध्या तरी तिन्ही पक्षांचे नेते सरकार टिकण्याची ग्वाही देत आहेत. कोरोनाने त्रस्त झालेल्या जनतेवर मात्र ‘तोंड दाबून...’ हा खेळ सहन करण्याची वेळ आली आहे.

बातम्या आणखी आहेत...