आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:भाजपची ‘आपत्ती’ अन् संघाची दक्षता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती काळात मदतीसाठी पुढे सरसावतो, हे अनेक वेळा दिसले आहे. एका अर्थाने संघ सदैव ‘दक्ष’ असतो, म्हणून आपत्तीच्या अचूक आकलनाची आणि ती निवारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची क्षमता तो दाखवू शकतो. गेल्या सात वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण, सरकार संघाच्या रिमोटवर चालते, असे चित्र निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. मात्र, देशातील सध्याच्या संकटातून भविष्यात उभ्या राहणाऱ्या मोठ्या आपत्तीचेही संघाला नेमके आकलन झाले आणि तो लगेच सक्रिय झाला आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांच्यासमवेत एक बैठक केल्याचे सांगितले जाते. यावेळी उत्तर प्रदेश भाजपचे महामंत्री सुनील बन्सलही उपस्थित होते. कोरोना स्थितीमुळे देशात आणि विशेषतः उत्तर प्रदेशात सरकारविषयी निर्माण झालेल्या नाराजीवर खल होणे अपेक्षित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला प्रशासकीय; विशेषतः निर्णय व नेतृत्व क्षमतेच्या पातळीवर आलेले अपयश, त्यांचे भविष्यात होणारे परिणाम यांमुळे अस्वस्थ झालेल्या संघाने डॅमेज कंट्रोलसाठी हा पुढाकार घेतला.

त्यातूनच पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने मोदी आणि योगी यांची प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी संघ व भाजपची यंत्रणा काही दिवसांत कामाला लागलेली दिसू शकते. दक्ष असलेला संघ सक्रिय झाला, की भाजपच्या आपत्तीचे निवारण होते, तो आणखी उभारी घेतो, हे या आधीही दिसले आहे. त्यामुळे भाजप आज काहीसा संकटात असला, तरी येणाऱ्या काळात संघशक्तीमुळे तो पुढे सरसावल्यास आश्चर्य वाटायला नको.

बातम्या आणखी आहेत...