आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:जेल, बेल आणि खेळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर राज्यातील आगामी राजकारणाच्या दिशा पुरेशा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे संघटन आणि गृह खाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुत्सद्देगिरीमुळे भाजपचा आशीर्वाद रथ रोखला गेला. मात्र त्याच वेळी राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेचा वेध घेण्याची भाजपची खेळी काही प्रमाणात यशस्वी झाली, काही प्रमाणात उलटली. राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळाला तो त्यांच्या “नेतृत्व’ गुणांपेक्षा सेनेविरोधातील उपद्रवमू्ल्यामुळे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिपद मिळताच मुंबईहून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व राणेंकडे आले आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे सेनेच्या विरोधात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. पण, महाविकास आघाडी सरकारने त्यांना लगाम घालत भाजपच्या विरोधात महत्त्वाचा संदेश देशभर दिला.

आपल्या चाणक्यनीतीवर कमालीचा भरवसा असलेल्या भाजपला अन्य पक्षांतही “चाणक्य’ असू शकतात, याचे भान राणेंच्या अनपेक्षित अटक नाट्यावरून आले असावे. तथापि, या प्रकारामुळे निवडणुकांतील राडेबाज राजकारणाची लांच्छनास्पद परंपरा महाराष्ट्राच्या दुर्दैवाने पुन्हा सुरू झाली. राणे विरुद्ध सेना या खेळात सेनेने बाजी मारली असली तरी राणेंचे “प्यादे’ खेळवण्यात भाजपलाही यश आले आहे. आता मुंबई, नाशिकसह राज्यातील सात महत्त्वाच्या महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत राणे विरुद्ध सेना या नाट्याचे अनेक अंक पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

मुंबईसारखे जागतिक महानगर, राज्यातील निम्मी लोकसंख्या व्यापणाऱ्या विकसनशील शहरांचे प्रश्न, बहुतांश ठिकाणी अक्षरश: खड्ड्यांत गेलेला “स्मार्ट सिटी’ प्रकल्प, शहरांतील पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा, जीएसटीचा परतावा थकल्याने महापालिकांची झालेली कोंडी आदी कळीचे मुद्दे मागे पडतील. रस्त्यावरचे “राडे’ आणि हिणकस आरोप-प्रत्यारोपांमध्येच निवडणुका रंगतील. परिणामी जनहितासाठी करावयाच्या राजकारणाचा ‘खेळ’ झाल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...