आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:उद्धव यांची नवी कोंडी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना एक नवे आंदोलन उभे राहते आहे. ते म्हणजे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचे. मुंबईच्या या जुळ्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. विमानतळ बांधणाऱ्या ‘सिडको’ने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. स्थानिकांची मागणी दि. बा. पाटील यांच्या नावाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर मौन धारण केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला हा सेनेचा प्रश्न वाटतो.

भाजप बाळासाहेबांच्या नावाला थेट विरोध करू शकत नाही, म्हणून स्थानिक आगरी, कोळी समाजाला छुपा पाठिंबा देत आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. तिकडे सिंधुदुर्गात चिपी विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याचे घाटत आहे. मग, नवी मुंबईचा अट्टहास का, असे आगरी समाजाचे म्हणणे आहे. १९७० मध्ये नवी मुंबई वसवण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील ३४४ किमी क्षेत्र संपादित केले. त्यात ९५ गावे विस्थापित झाली. लाखो आगरी, कोळी भूमिहीन झाले. त्यांना विकसित जमिनीतील साडेबारा टक्के जमीन दि. बा. पाटील या लढवय्या नेत्याने मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे नाव देण्याबाबत आगरी समाजाच्या भावना तीव्र आहेत.

त्यासाठी कोविडकाळात लाखांचा मोर्चा निघणे गंभीर आहे. मात्र, उद्धव यांनी आंदोलन गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. बाळासाहेबांचे नाव देण्याचा ठराव ‘सिडको’चा कारभार पाहणारे सेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्धव या नव्या कोंडीत सापडले. त्यातून मोठ्या मनाने माघार घेणे वा उग्र आंदोलनाला तोंड देणे, हे दोनच पर्याय आहेत. सरकार आणि शिवसेनेचे नेतृत्व करणारे उद्धव यापैकी काय निवडतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...