आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:समाज माध्यमे : व्यसन अन् वेसण

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अ तिशहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. अलीकडे समाज माध्यमांच्या बाबतीत या म्हणीचा प्रत्यय सातत्याने येत आहे. समाज माध्यमांवर दिसणारा पोस्ट किंवा मेसेजरूपी बैल नुसता रिकामाच नाही, तर तो चौखूर उधळला आहे. भारतासारख्या विपुल विविधतेच्या असलेल्या देशांत हे धोक्याचे ठरेल, याची जाणीव समाजातील विचारवंत आणि सरकारला झाली. त्यानुसार विविध समाज माध्यमांवर नैतिक मूल्यसंहिता लागू करण्याचे सरकारने ठरवले. समाज माध्यमे, न्यूज पोर्टल, ओटीटी माध्यमांवरील आशयाबाबतच्या तक्रारींचे निवारण आणि कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची तयारी केली.

माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फेब्रुवारीत डिजिटल माध्यमांसाठी नैतिक मूल्यसंहिता जारी करण्यात आली. २५ मे रोजी त्यासाठीची मुदत संपली तरी संबंधित कंपन्यांनी काहीच हालचाल केली नाही. याबाबतचे नियम आम्ही पाळत आहोत, मात्र काही मुद्द्यांबाबत चर्चा होणे आ‌वश्यक असल्याचा सूर काही कंपन्यांनी लावला. तर, काही कंपन्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या माध्यम कंपन्यांना आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट यांना आळा बसवण्यासाठी, आशयाची शहानिशा करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे या नियमांमुळे बंधनकारक आहे.

पोस्ट किंवा मेसेजचा मूळ निर्माता कोण, याचा माग काढण्याची सक्ती या नियमावलीत आहे. मात्र, यास सुरुवातीपासूनच या कंपन्यांनी आक्षेप घेतला. ओटीटी प्लॅटफॉर्म, पोर्टल व विविध समाज माध्यमांचे व्यसनच जणू सध्या सर्वांना लागले आहे. त्यातून अश्लीलता, समाज-जात-पंथ, विशिष्ट व्यक्ती, समूह यासंबंधी आक्षेपार्ह, प्रक्षोभक मजकुराचा पूरच समाज माध्यमांतून वाहतो आहे. याला वेसण घालणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपन्या व सरकार यांनी तत्काळ योग्य तोडगा काढावा. निकोप समाजासाठी ते आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...