आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रेलख:‘जाती बलीयसी’ हेच कर्नाटकी वास्तव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बी. एस. येदियुरप्पा यांची जागा बुधवारी बसवराज बोम्मई घेतील तेव्हा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदी आणखी एक लिंगायत नेता विराजमान झालेला असेल. भारतीय जनता पक्षाने येदियुरप्पांना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून राजीनामा द्यायला सांगितला खरा; पण त्यामुळे कर्नाटकातील लिंगायत समाज प्रचंड नाराज होणार, याची कल्पना पक्षाच्या नेत्यांना होतीच. त्याची भरपाई करण्यासाठी बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात येते आहे. कारण तेही लिंगायत आहेत आणि त्यांच्या नावाला लिंगायत मठाधिपतींनीही मान्यता दिली आहे. खरे तर त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, येदियुरप्पा यांनीच त्यांचे नाव सुचवले आहे.

बसवराज हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे चिरंजीव आहेत. येदियुरप्पांच्या मंत्रिमंडळातही ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि येदियुरप्पा यांच्यात ते दुवा बनले होते. त्यामुळे संघालाही त्यांचे नाव मान्य झाले. अर्थात, संघापुढे अन्य पर्यायही नव्हता. वास्तविक येदियुरप्पांच्याच नावाला संघाचा विरोध होता; पण ते नसतील तर कर्नाटकात भाजपची काय दुरवस्था होते, याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. राज्यात किमान १७ टक्के मतदान लिंगायत समाजाचे आहे. म्हणजे २२४ पैकी किमान १०० जागांवर या समाजाचे प्राबल्य आहे. त्यांना नाराज करणे म्हणजे या जागांवर पाणी सोडण्यासारखे आहे.

भाजपला ते परवडणारे नसल्याने संघानेही तडजोड केली आणि येदी पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा हे दाखवण्यासाठी आता येदींना राजीनामा द्यायला लावला असला, तरी प्रति येदीच मुख्यमंत्री करावे लागत आहेत, ही भाजपची आणि संघाचीही हतबलता आहे. आता येदींचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना उपमुख्यमंत्री व्हायचे आहे. तशी तडजोडही येदींनी करून घेतली आहे का, हे लवकरच कळेल. शेवटी ‘जाती बलीयसी’ हेच कर्नाटकातील वास्तव आहे.

बातम्या आणखी आहेत...