आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘वादळ’ घोंघावतेय...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणे नवे नाही. पण, या वेळचे ‘वादळ’ सामान्य नाही. ते अधिवेशनाआधी होणाऱ्या चहापानाच्या प्याल्यात शमणारे तर नव्हतेच. आता तर त्याने चक्रीवादळाचे रूप धारण केले आहे. ‘पेगासस’च्या मुद्द्यावरून उठलेल्या हेरगिरीच्या वावटळीने अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही सरकारभोवती फेर धरला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत संसदेचे कामकाज रेटण्याच्या प्रयत्नात सरकार मात्र आता जागेवरच गोल गोल फिरू लागले आहे. अशातच ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या भेटीगाठींनी सरकारविरोधी मोर्चेबांधणीला बळ मिळाल्याने सभागृहात आणि बाहेरही विरोधकांची एकजूट दिसते आहे.

ममता बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह विरोधी नेत्यांना भेटल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ‘बंगाल मॉडेल’ वापरण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. रणनीतिकार प्रशांत किशोर त्यावर काम करत आहेत. भाजप मजबूत पक्ष आहे, त्यामुळे विरोधकांना त्याहून अधिक शक्तिशाली व्हावे लागेल, असे सोनियांच्या भेटीनंतर ममतांनी सांगितले. त्याच वेळी ‘काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांना एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल’, अशा शब्दांत भाजपसमोर एकसंध विरोधक उभा करण्यासाठीची पूर्वअटही स्पष्ट केली.

एकजुटीच्या या अटीनुसार काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात, याचा प्रत्ययही लगेच आला. राहुल गांधींच्या उपस्थितीत १४ विरोधी पक्षांची बैठक होऊन पेगासस, कृषी कायदे आणि महागाईच्या मुद्द्यावर माघार न घेण्याचा निर्धार करण्यात आला. अनेक विषयांवर धोरणात्मक संदिग्धता कायम ठेवून आपलाच अजेंडा पुढे रेटणाऱ्या भाजपसाठी विरोधकांच्या एकीचे वादळ हा धोक्याचा इशारा आहे. येणाऱ्या काळात ते आणखी तीव्र होऊ शकते. तसे झाल्यास भाजपसमोरचा उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे जाणारा रस्ता धूसर होण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...