आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:हुंदका मोठा, तोकडा दिलासा नको

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेती म्हणजे मान्सूनचा जुगार असे का म्हणतात, याचे प्रत्यंतर यंदा पुन्हा एकदा यंदाच्या पावसाळ्याने दिले आहे. गेल्या दशकभरात मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. अवेळी पाऊस, कमी वेळेत मुसळधार, पावसात मोठे खंड, दुष्काळग्रस्त भागात अतिवृष्टी, गारपीट असे काहीसे मान्सूनचे नुकसानकारक स्वरूप अलीकडे वारंवार दिसते आहे. या वर्षीही मान्सूनने हेच रूप दाखवले. यंदा जून-जुलैमध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली, तर पर्जन्यछायेत येणाऱ्या मराठवाड्यावर मेहरबानी केली. ऑगस्टमध्ये चांगला पंधरा दिवसांचा ब्रेक घेणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्ये मात्र अक्षरश: कहर केला.

बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रीवादळाने मान्सूनला अधिक गती दिली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील १८२ मंडळांत एकाच दिवशी अतिवृष्टी झाली. पश्चिम विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने थैमान घातले. हाताशी आलेला खरीप डोळ्यादेखत पाण्यात गेला. आता नुकसानीचे पंचनामे होतील. मग त्यानुसार सरकारी गतीने भरपाई दिली जाईल. पावसाच्या या तडाख्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यासाठीचे निकषच निश्चित नसल्यामुळे कागदी घोडे नाचवले जातील.

शेतकरी तसाच पुढच्या हंगामाच्या तयारीला लागेल. हे चित्र बदलायचे असेल तर आपणही बदलले पाहिजे. बदलत्या परिस्थितीनुसार ओल्या आणि कोरड्या दुष्काळाची व्याख्या नव्याने स्पष्ट करायला हवी. जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय हवामानाचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा उभारायला हवी. केवळ एवढेच करून भागणार नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, हेही पाहायला हवे. असे झाले तरच या गुलाब जलसंकटाची काटेरी बोच कमी होण्यास मदत होईल. पावसाने शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या वेदनेचा हुंदका मोठा आहे, त्यामुळे सरकारनेही तोकडा दिलासा देऊन चालणार नाही.

बातम्या आणखी आहेत...