आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:ईशान्येतील धुमसत्या धमन्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमा संघर्ष पुन्हा पेटला आहे. आसामच्या पाच पोलिसांसह सहा जणांचा मिझोरामकडून झालेल्या गोळीबारात बळी गेला आणि आधीच धुमसत असलेल्या वादाचा भडका उडाला. सध्या दोन्ही राज्यांच्या सुमारे १६५ किलोमीटरच्या सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. आसामच्या सीमावर्ती भागातील ग्रामस्थांनी मिझोरामकडे होणारी अन्नधान्य आणि भाजीपाल्याची वाहतूक रोखली आहे. एकूणच या मुद्द्यावरील दोन्ही बाजूंच्या तप्त भावनांमुळे स्थिती अधिकच चिघळते आहे. वास्तविक असा सीमा संघर्ष ब्रिटिशकाळापासून सुरू आहे.

आसामपासून अरुणाचल, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा ही वेगळी राज्ये तयार झाल्यावर यातील प्रत्येक राज्याचा आसामसोबत सीमावाद सुरू झाला. १९५० मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या आसाममधून पुढे ही राज्ये निर्माण झाल्याने स्वाभाविकपणे आसामींमध्ये आपले प्रादेशिक वर्चस्व कमी झाल्याची भावना वाढली. त्यामुळे या मोठ्या भावाचा लहान भावंडांसोबतचा दुरावा वाढत गेला. आसाम आणि मिझोराममधील वाद अधिक तीव्र बनण्यामागची दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे, आसाम १९३३ ची सीमा निश्चिती अधिकृत मानतो, तर मिझोराम १८७५ मध्ये तयार झालेली सीमा प्रमाण मानतो.

दुसरे कारण म्हणजे, आसामच्या सीमावर्ती भागातील स्थलांतरित बांगलादेशींबद्दल मिझोरामच्या आदिवासींमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना. या दोन्हींच्या एकत्रित परिणामातून आपले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक हित धोक्यात आल्याच्या भावनेतून नव्याने वाद उफाळला आहे. भाषिक, प्रांतिक व जाती- धर्माधारित अस्मितांमुळे एकीकडे प्रादेशिक स्वायत्तता आणि संघराज्याची संकल्पना रोज घायाळ होत असताना ईशान्येच्या राज्यांमधील धमन्या धुमसत आहेत. त्यातून देशावर मोठा आघात होऊ नये, यासाठी केंद्र आणि दोन्ही राज्यांच्या सरकारांना आपले राजकीय अजेंडे बाजूला ठेवून लवचिक भूमिका घ्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...