आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘स्वत्व’ अबाधित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालाचा गुलाल एव्हाना उधळून झाला असला तरी त्याच्या अनेक छटा राजकीय पटलावर उमटल्या आहेत. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील सत्ताधारी आणि विरोधकांची ताकद जोखणारी होती. पण, काहीच गमावावे लागणार नसलेल्या भाजपने तिथे बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसची ही जागा हिसकावून घेतली. अर्थात यामध्ये कमळाच्या चिन्हाइतकीच परिचारक व मोहिते-पाटील गटाची हातमिळवणी आणि विजयी उमेदवार समाधान आवताडेंचे बळही महत्त्वाचे ठरले. एका प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना उद्देशून, ‘तुम्ही इकडं आवताडेंना निवडून द्या, मी तिकडं त्यांचा (आघाडी सरकारचा) करेक्ट कार्यक्रम करतो,’ असे म्हटले होते.

एक आमदार निवडून आल्याने हे सरकार पडणार नाही, हे त्यांना कळत का नव्हते? तरीही ते असे बोलले, कारण त्यांच्यासह भाजपच्या बहुतेक नेत्यांनी आपला पक्ष पश्चिम बंगालची सत्ता मिळवणार, हे गृहीतच धरले होते. एकदा बंगाल हातात आला की महाराष्ट्रात सत्तापालट फारसा अवघड नाही, असे आडाखे बांधले जात होते. पण, बंगवासीयांच्या अस्मितेने भाजपचे मनसुबे उधळले आणि राजकीय पटलावरील संभाव्य बदलांच्या छटा बदलल्या. बंंगाल हा महाराष्ट्रासारखाच क्रांतिकारकांचा, समाजसुधारकांचा आणि प्रतिभावान, कलासक्त, बुद्धिजीवींचा प्रदेश आहे. तिथल्या मातीने आणि माणसाने महाराष्ट्राप्रमाणेच ‘स्वत्व’ जपले आहे. ते दडपण्याचा प्रयत्न बंगालने उधळला आणि इकडे महाराष्ट्र सुरक्षित झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बातम्या आणखी आहेत...