आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:टाळे उघडण्याची “हिशेबी जोखीम’

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाला धैर्याने तोंड देणारा महाराष्ट्र आता काहीसा मोकळा श्वास घेतो आहे. राज्याचा बराचसा भाग अनलॉक झाला आहे. अनेक मोठ्या शहरांतील बाजारपेठांवरचे मळभ हटून त्या पुन्हा गजबजत आहेत. देश अजूनही महामारीशी लढत असताना टाळे उघडण्याचा हा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यासोबत अनेक अटी-शर्ती मात्र लागू आहेत. त्या केवळ अंमलबजावणी करणारे प्रशासन किंवा व्यापारी-उद्योजकांसाठी नव्हे, तर सामान्य नागरिकांवरही बंधनकारक आहेत, याचे भान ठेवावे लागेल. अनलॉकचे टप्पे जाहीर होत असतानाच राज्यातील कोरोनाबळींची संख्या एक लाखाच्या पुढे गेल्याचीही बातमी धडकली.

महामारीतील एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र जगात दहाव्या स्थानावर आहे, तर देशातील २९ टक्के मृत्यू केवळ आपल्या राज्यात झाले आहेत. उपचारांचे गैरव्यवस्थापन, औषधांचा तुटवडा आणि लसीकरणाचा बोजवारा यामुळे दुसऱ्या लाटेत राज्य भयावह स्थितीत गेले, हे खरे असले तरी नागरिक म्हणून आपणही हलगर्जी केली, हे मान्य करायला हवे. मागच्या कटू अनुभवातून बोध घेत स्वत:वर नियंत्रण ठेवले, नियम आणि निर्बंध पाळले तरच आपण तिसरी लाट रोखू शकतो. निर्बंध सैल करून शासनाने “कॅल्क्युलेटेड रिस्क’ म्हणजे हिशेबी जोखीम पत्करली आहे. संसर्ग न वाढता अर्थकारणाचा गाडाही सुरू राहावा, हा त्यामागे हेतू आहे.

अर्थव्यवस्था डगमगली तर स्थिती आणखी भयावह होऊ शकते, याची जाणीव ठेवायला हवी. कोरोनापूर्व काळातील सामान्य दिवस परत यावेत, ते कायम राहावेत, असे वाटत असेल तर संपूर्ण खबरदारी घेत अर्थचक्र फिरते ठेवावे लागेल. शासन, प्रशासनासोबत नागरिक म्हणून आपणही त्यासाठी सज्ज आणि सजग असले पाहिजे. अन्यथा, जीवघेण्या संकटातूनही आपण काही शिकत नाही, असा त्याचा अर्थ होईल.

बातम्या आणखी आहेत...