आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:रुपेरी युगान्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीला अल्पायुष्याचा शाप आहे, असे म्हटले जाते. अनेक बाबतीत ते यथातथ्यही आहे. मात्र, अपवादाने नियम सिद्ध व्हावा, तशी काही नावे आठवायची म्हटली तर नि:संशयपणे दिलीपकुमार यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट, असे ज्यांना सार्थपणाने गौरवले जाते त्या दिलीपकुमार यांचे काळाच्या पडद्याआड जाणे, हा रुपेरी चित्रसृष्टीतील एक युगान्त म्हणावा लागेल. क्वालिटी अर्थात गुणवत्ता हा मंत्र जपून दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वनाममुद्रा तर उमटवलीच, पण अभिनयाचे मापदंड त्यांच्या नावाने ओळखले जातील, असा अमीट ठसाही रुपेरी पडद्यावर उमटवला. त्यांची १९४० च्या दशकापासूनची कारकीर्द आणि तब्बल साठ वर्षांचा दीर्घ कालखंड लक्षात घेतला तर पटकन नजरेत भरणारी बाब म्हणजे त्यांच्या चित्रपटांची मोजकी संख्या.

इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीत दिलीपकुमार यांनी अभिनीत केलेल्या चित्रपटांची संख्या जेमतेम ७० च्या आसपास आहे. पण, त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांच्या उत्कट अभिनयशैलीने अजरामर झाली आहे. अगदी उमेदवारीचा काळ वगळता दिलीपकुमार यांच्या प्रत्येक चित्रपटाविषयी, त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी चित्रपट रसिक, समीक्षक सगळ्यांनाच उत्सुकता असे. कुठलाही आक्रस्ताळेपणा, स्टाइलोगिरी, चमकोपणा न करता, आपल्या खर्जातल्या टोनल क्वालिटीचा अप्रतिम वापर करत, संयतपणे त्यांनी म्हटलेले संवाद अभिनय क्षेत्रात आजही माइल स्टोन मानले जातात.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुपेरी पडदा गाजवणाऱ्या दिलीपसाहेबांनी १९८० च्या दशकात चरित्र अभिनेता या रूपातही वेगळी छाप सोडली. ‘कर्मा’, ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘इमानदार’, ‘क्रांती’ आणि ‘मशाल’ ही त्यातील काही उदाहरणे. त्यांच्या अभिनयाच्या शैलीतूनच त्यांची ‘ट्रॅजेडी किंग’ ही प्रतिमा साकारली. दिलीपसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना भारतीय चित्रपटसृष्टीतील राज, देव आणि दिलीप हे युग अस्ताला गेल्याची हुरहूर रसिकांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...