आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:भाजप पुन्हा ‘मिशन मोड’वर...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘युक्तीशिवाय रणनीती म्हणजे विजयाचा धिमा मार्ग, तर रणनीतीशिवाय युक्ती म्हणजे पराभवापूर्वीचा कोलाहल’... चिनी युद्धनीतीतज्ज्ञ सून त्झू यांचे हे विधान युद्धातील युक्ती आणि रणनीतीचे महत्त्व स्पष्ट करते. भारतीय राजकारणात आजच्या घडीला या दोन्ही अस्त्रांचा प्रभावी वापर करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. बंगालमधील नामुष्की आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या व्यवस्थापनातील अपयशामुळे झालेल्या प्रतिमाहननातून हा पक्ष सावरतो आहे. सत्ता आणि संघटनेतील धैर्य खचल्यासारखे दिसत असताना या दोन्ही ठिकाणी पक्षाने पुन्हा बळ एकवटले आहे. आता तो पुढच्या वर्षी होणाऱ्या काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

विरोधकांच्या खेम्यात २०२४ साठीच्या शक्यतांची जुळवाजुळव सुरू असताना भाजपने मात्र ‘दिल्ली’च्या सत्तेचा राजमार्ग जेथून जातो, त्या उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने या राज्यांसाठी निवडणूक प्रभारीही जाहीर केले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे उत्तराखंडची, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या या राज्यांमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीवर अजून मोठी हालचाल दिसत नसताना भाजपने मात्र आपली यंत्रणा सज्ज केली आहे.

भाजप कायम ‘इलेक्शन मोड’वर असतो, असे म्हटले जाते. पण, त्यासाठी तो आधी ‘मिशन मोड’वर कामाला लागतो, हेही मान्य करावे लागेल. युद्ध जिंकण्यासाठी युक्ती आणि रणनीतीने परिपूर्ण अशी व्यूहरचना तयार हवी, हे या पक्षाने ओळखले आहे. खरे तर विरोधकांनीही हे तंत्र आत्मसात केले पाहिजे. अंतिम परिणाम काहीही होवो; वेळेआधी केलेली तयारी अर्धी लढाई जिंकून देते, हे खरे असेल तर भाजपने किमान त्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे, असे म्हणता येईल.

बातम्या आणखी आहेत...