आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Today Editorial; Nashik Oxygen Tank Leak Case News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष संपादकीय:मारेकरी कोण?

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या एकवीस दिवसांपूर्वी उभारलेल्या ऑक्सिजनच्या टाक्यांना गळती लागते आणि काही मिनिटांतच तडफडून तडफडून तब्बल २४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात! प्रशासकीय अनास्था आणि यंत्रणेच्या संतापजनक हलगर्जीपणाची ही परिसीमा. यंत्रणेतील या बेपर्वाईमुळे प्राणदूत असलेला ऑक्सिजनच प्राणघातक ठरला. नेहमीप्रमाणे या वेळी मृतांच्या नातलगांना मदतीची घोषणा झाली, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, पण गेलेल्या २४ जीवांच्या हत्येच्या पापाचे धनी कोण, हा प्रश्न मृतांच्या कुटुंबीयांच्या वतीने “दिव्य मराठी’ उपस्थित करीत आहे. प्लँटच्या देखभालीची जबाबदारी कोणाची? ठेकेदारासोबत महापालिका प्रशासनाने केलेल्या करारातील अटी कोणत्या होत्या? टाकीचे पुनर्भरण होताना फाटलेल्या पाइपाचे दायित्व कुणाचे? येथील ऑक्सिजन पुरवठ्याबाबतची तांत्रिक जबाबदारी कोणाच्या नावावर होती?

तासभर सुरू असलेल्या त्या धिंगाण्यात रुग्णांच्या बचावासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करून अधिकाधिक जीव वाचवण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासकीय यंत्रणेचे वाली कोण? इन्क्युबेटर्सच्या स्फोटामुळे भंडाऱ्यात राखरांगोळी झालेले चिमुकले जीव असोत वा नाशिकच्या या दुर्घटनेमुळे तडफडत प्राण सोडलेले २४ जण असोत, यामागील प्रशासकीय बेपर्वाईचा, अक्षम्य हलगर्जीचा आणि बेजबाबदार यंत्रणेचा बीभत्स चेहरा बाहेर आणल्याशिवाय “दिव्य मराठी’ शांत बसणार नाही. ही वेळ राजकारणाची नसल्याचे सांगणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने यावरही गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. कोविडच्या प्रश्नावरून एरवी राज्य सरकारविरोधात उच्चस्वरात आगडोंब उठवणाऱ्या भाजपची नाशिक महापालिकेत सत्ता आहे.

त्यामुळे स्थानिक सत्ताधारी असलेल्या भाजपची या जबाबदारीपासून सुटका नाही. चाळीस मिनिटांच्या त्या थैमानात तडफडणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी धावपळ करणाऱ्या, हातपाय चोळून त्या निष्पाण देहांमध्ये चेतना आणण्यासाठी झगडणाऱ्यांसोबत त्या क्षणी ना कोणता पक्ष होता ना नेता. म्हणूनच या हिणकस बेपर्वाईचा जाब “दिव्य मराठी’ विचारण्यासाठी, यातील बळींच्या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत याचा पाठपुरावा करणे ही आमची बांधिलकी आहे. कालची मदत आणि चौकशीची घोषणा हे पुरेसे नाही, किती दिवसात ही चौकशी होणार, जबाबदार नेमक्या व्यक्तीवर दोषारोपण होणार का, दोषींवर काय कारवाई होणार आणि भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करणार, याचा मागोवा आम्ही सातत्याने घेऊ. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे - मारेकरी कोण?

बातम्या आणखी आहेत...