आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Comred Vilas Bhai, Marcs Movement, Mao, Lenin, Communist Movement, Dr Iqbal Shaikh Minne, News In Marathi

अभिवादन:विलासभाई.....लाल सलाम!

2 वर्षांपूर्वीलेखक: डॉ. शेख इक्बाल मिन्ने
  • कॉपी लिंक

परिवर्तनवादी चळवळीसाठी आयुष्य समर्पित केलेले, लढाऊ वृत्तीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड विलास सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले. आज मराठी साहित्यात मुस्लिम मराठी साहित्य एक स्वतंत्र मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह म्हणून अधोरेखित झाला आहे याचे श्रेय समस्त मुस्लिम मराठी साहित्यिकांबरोबरच विलास याचेही आहे.

४ ऑगस्टला सकाळीच मेडिकल कॉलेजला जात असताना जयश्रीचा फोन आला. त्या म्हणाल्या- 'डॉक्टर एक वाईट बातमी आहे, विलास गेला.' मी म्हणालो, अहो काय बोलताय? It's unbelievable' त्या म्हणाला, डॉक्टर सकाळी त्याला व्हीलचेअरवर बसवत असताना त्याने डोळे वर फिरवले. आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. परंतु डॉक्टरांनी तपासून तो गेला आहे असे सांगितले. गेल्या ३-४ वर्षांपासून तो पार्किंसोनिजम या व्याधीने ग्रस्त होता. आधी हातांना कापरे, मग हळूहळू त्यांचे चालणे फिरणे बंद झाले आणि मग कालांतराने त्याला बोलता येईना. आपल्या प्रखर आणि तितक्याच परखड विचारांनी समाजाला विचार करायला भाग पाडणारा कॉम्रेड विलास सोनवणे हा विचारवंत आज आपल्यातून निघून गेला.

परिवर्तनवादी चळवळीसाठी आपले आयुष्य वेचताना त्याने कुशल संघटकाची वैशिष्टे अधोरेखित केली. धडाडी लढाऊवृत्ती आणि समर्पण म्हणजे नेमके काय हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. कॉम्रेड विलास सोनवणे आणि माझी मैत्री गेल्या ३५ वर्षापासून घट्ट होती. आयुष्यातील अनेक चढ-उतार तसेच चांगल्या-वाईट प्रसंगाचे साक्षीदार राहून आम्ही निखळ मैत्री निभावली. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ संघटित करण्यात कोणाचा मोठा वाटा असेल तर तो विलासचाच आहे. त्याचा वैचारिक प्रवास अत्यंत थक्क करणारा होता. तो बोलू लागला की त्याचे विचार पाण्यासारखे प्रवाही व्हायचे. एखाद्या विषयावर अत्यंत सखोल आणि तितकेच ज्ञानवर्धक बोलण्याची त्याची हातोटी होती. विषय कोणताही असो मग तो राजकारणाचा असो, समाजकारणाचा असो, शिक्षणाचा असो, चळवळीचा असो, साहित्याचा असो, नाटकाचा असो, जागतिक प्रवासाचा असो, अगदी संगीतातल्या बारकाव्यांचा असो की खेळाचा कोणत्याही विषयावर अधिकार वाणीने आणि नेमके बोलण्याची कला विलासला चांगलीच अवगत होती. तास न तास तो बोलत असायचा.

कॉम्रेड विलास जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी या छोट्या गावचा. वडिल नोकरीनिमित्त मुंबईत असताना विद्यार्थी दशेपासूनच त्याने अनेक चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे तो महाराष्ट्राचा संस्थापक सचिव होता. १९७३ मध्ये त्याने याच संघटनेद्वारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. १९७३-७५ साली मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना तो विद्यार्थी संघटनेचा पहिला कम्युनिस्ट जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आला.पण १९७८ साली त्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण त्याने लगेचच कॉम्रेड शरद पाटील यांच्यासोबत मिळून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. १९७९ साली त्याने नक्षलवादी चळवळीत प्रवेश केला. तर १९८१ साली बाबा आमटे यांच्या आनंदवनात पारधी समाजाची बळकावलेली जमीन सोडवण्यासाठी लढा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील इतर अनेक लढे- चळवळी- आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यापैकी अनेक चळवळी आणि लढ्याचे नेतृत्वही केले.

मुस्लिम मराठी साहित्य चळवळ
१९८८ साली मी जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझ्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सिस्टर कॉम्रेड कमल वायकोळे यांच्याकडे विलास यायचा. त्यावेळी त्याची आणि माझी मैत्री घट्ट झाली. तेव्हा मी नवकवी होतो. त्याच्या मदतीने मी, विलास, कवी ए. के. शेख (पनवेल) , प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर (सोलापूर), अजीज नदाफ (सोलापूर), अॅड. उदय टिळक (महाड), प्रा. मीर इसाक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू (सोलापूर) आणि मुबारक शेख (सोलापूर) यांनी मिळून मुस्लिम मराठी साहित्य चळवळ संघटित केली. १९८९ मध्ये अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना सोलापूर येथे केली. याच संस्थेमार्फत १९९० साली विलासच्या पुढाकाराने पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न झाले. तेव्हापासून नागपूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, पनवेल-नवी मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी १२ अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यात कॉम्रेड विलास सोनवणेचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा होता.

उदघाटक, वक्ते ठरवण्यापासून परिसंवाद आणि चर्चासत्राचे विषय सुचवण्याचे श्रेय विलासला जाते. महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीतून अभिव्यक्त होणे हाच मोठा विद्रोह आहे असे तो मानत असे. मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचा माध्यमातून आपण देशातील मुस्लिमांना उपरे ठरवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हे सांस्कृतिक राजकारण करतोय असे त्याने मला पटवून दिले होते. महाराष्ट्रातील मुस्लिमांना मराठीतून अभिव्यक्त होण्याचा आग्रह गेल्या ३०-३२ वर्षापासून आम्ही सातत्याने करीत आहोत. आज मुस्लिम मराठी साहित्य चळवळ नावारुपास आलेली आहे. मराठी साहित्यात मुस्लिम मराठी साहित्य एक स्वतंत्र मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह म्हणून अधोरेखित झाला आहे याचे श्रेय समस्त मुस्लिम मराठी साहित्यिकांबरोबरच विलास याचेही आहे.

मुस्लिम मराठी साहित्य चळवळ सुरू होऊन काही काळ झाल्यानंतर १९९२ साली अॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत मुस्लिम ओबीसी चळवळीची सुरुवात विलासने केली. यासाठी त्याने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्या मदतीला प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, हसीब नदाफ, शब्बीर अन्सारी, जावेद पाशा कुरेशी ही मंडळी होतीच. या साऱ्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील मुस्लीम समाजातील सुजाण मंडळींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. विलासने मुस्लीम समाज हा एकजिन्सी (Monolith) नसून त्याच्यातही विविध जाती आहेत हे मांडले. मुस्लीम समाजातल्या विविध जाती, पंथांचा सखोल अभ्यास आणि संशोधन केले. अनेक जातीच्या मुस्लिम लोकांना ते घरी जाऊन भेटायचा. खरे पाहता विलास म्हणजे मुस्लिम ओबीसीचे एन्सायक्लोपीडिया होता. भारतातील मुस्लिमांचे जे प्रश्न आहेत त्याची अचूक जाण, राजकीय आकलन त्याला होती. खरेतर मुस्लिम प्रश्न आणि त्या प्रश्नांची इत्यंभूत माहिती आणि नेमकी जाण असणारी व्यक्ती म्हणजेच कॉ. विलास. त्याचप्रमाणे समकालीन भारतीय राजकीय परिस्थितीचे अत्यंत सखोल आकलन त्याला होते. त्याची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबतीतले विचार अत्यंत प्रगल्भ होते.

यानंतरच्या काळात इतर आंदोलने आणि फुलेवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, जयप्रकाशवादी, लोहियावादी चळवळीतून कार्यकर्त्यांची संवाद प्रक्रिया सुरू करण्यात त्याने पुढाकार घेतला. त्या सर्व प्रक्रियेतून पुढे २००१ साली विलासने युवकांसाठी युवा भारत या देशव्यापी संघटनेची स्थापना केली. न्यायमूर्ती पी. बी.सावंत, न्याय. बी. जी .कोळसे-पाटील, अॅड. दत्ता पाटील यांच्यासोबत २००५ ते २००८ पर्यंतच्या काळात त्याने रायगड जिल्ह्यातील उरण येथील सेझ विरोधी लढा दिला. रिलायन्सचा हा सेझप्रकल्प रद्द करवून अंबानी विरुद्धचा हा लढा यशस्वी केला. पुढे हभप बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात वारकऱ्यांच्या सहकार्याने २००८ मध्ये पुण्याजवळील दाऊ केमिकल्स या अमेरिका कंपनीच्या विरोधात लढा उभारण्याचे काम त्याने केले. हे आंदोलन यशस्वी करून त्याने भारतामध्ये आणखी एक भोपाल गॅसकांड होण्यापासून जनतेला वाचवले. याच वर्षी रायगडच्या सेझ विरोधी लढ्याच्या आधाराने देशभरातील सर्व सेझविरोधी लढायांच्या समितीची स्थापना केली. गोरगरीब, आदिवासी, दलित, ओबीसी आणि अल्पसंख्यांकाच्या भल्यासाठी आपले सर्व आयुष्य वाहणाऱ्या लढवय्या कॉम्रेड विलासला अखेरचा सलाम!

ग्रंथसंपदा
'लढता लढता केलेल्या चिंतनातील काही', 'बहुजन स्रीवाद', 'मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत' ही त्याची ग्रंथसंपदा असून विविध नियतकालिकांमधूनही विपुल लेखन केले. प्रचंड वाचन, खोल अभ्यास, अचूक आकलन, धडाडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृती करण्यासाठी देशभर निष्ठावंत, कृतिशील आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी याद्वारे विलासने आयुष्यभर कृती केली. चळवळी, आंदोलने, धरणे यामध्ये कॉम्रेडचे असणेच ऊर्जेचे स्रोत असायचे. आयुष्यभर कोणतीही नोकरी न करता चळवळीचा मार्ग स्वीकारून आपल्या अखंड प्रवासाद्वारे देशाला अन्यायाविरुद्ध संघर्षाचा मार्ग दाखवला. यात त्याच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई यांचा महत्वाचा सहभाग आहे. घर, संसार सांभाळण्याची जबाबदारी जयशरिताईंनी खुशीने स्वीकारल्याने विलासभाई हे करू शकला.

डॉ. शेख इक्बाल मिन्ने
dr.sheikhiqbal@gmail.com

बातम्या आणखी आहेत...