आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:चला, साखळी तोडूया!

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अखेर राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकार तीन पक्षांचे असल्याने याबाबतचा निर्णय सर्वसंमतीने आणि विरोधकांसह अन्य घटकांच्या सहमतीने घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. त्यात काही वेळ गेला, कणखरपणाऐवजी धरसोडही दिसली. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसला ‘लॉकडाऊन’ हा शब्दच नको होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कडक निर्बंध’ लावावेत, असे वाटत होते. त्यातच व्यापाऱ्यांपासून बलुतेदारांपर्यंत अनेक घटकांना पुढे करत विरोधक भीती आणि संभ्रमात भर टाकत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करत ‘संचारबंदी’ नावाचा मधला मार्ग काढावा लागला असावा. आधीच्या निर्बंधांत आणखी काहींचा समावेश करून व काही सवलती तशाच ठेवून सामान्य नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास बंदी, असे नव्या निर्णयाचे स्वरूप आहे. मधल्या काळात अत्यावश्यक सेवेत अनेक व्यवसायांचा झालेला समावेश व सार्वजनिक वाहतुकीला असलेली परवानगी या वेळीही कायम ठेवली आहे. आवश्यक कारणाशिवाय लोकांना बाहेर पडता येणार नसेल तर असे व्यवसाय, वाहतूक सुरू असून उपयोग काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यातून निर्णयातील विसंगती समोर येते. मात्र, काही त्रुटी, उणिवा असल्या तरी आजच्या घडीला संसर्ग थोपवण्यासाठी अशा उपायाशिवाय पर्याय नाही, हेही तितकेच खरे. सरकारने हा निर्णय घेताना गरीब, गरजू वर्गाचा विचार केला आहे. अशा घटकांना अन्नधान्य तसेच साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत एका अर्थाने आपली जबाबदारी व निर्धार दाखवून दिला आहे. आता वेळ आपली आहे. महामारीची ही दुसरी लाट दिवसेंदिवस भयावह रूप धारण करते आहे व या स्थितीतही नागरिक म्हणून आपण भान बाळगले नाही, तर ती कोणत्या थराला जाईल, याचा अंदाज तज्ज्ञांनाही लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिवावर उठलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी आपणही जबाबदारीने आणि तितक्याच ठाम निर्धाराने सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. एकीच्या वज्रमुठीने अनेक मोठी संकटे परतवून लावता येतात. आपण अशी मूठ आवळली तर कोरोनाचा विळखा सैल झाल्याशिवाय, त्याच्या संसर्गाची साखळी तुटल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...