आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘सत्य’प्रयोगाचा गौरव

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाकडे मानवतावादाच्या वेगळ्या भूमिकेतून पाहण्याची ‘नजर’ देणाऱ्या शरणकुमार लिंबाळे लिखित ‘सनातन’ या कादंबरीला राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सरस्वती सन्मान’जाहीर होणे, ही मराठी साहित्य आणि भाषेच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. लेखकाला पंधरा लाखांची घसघशीत रक्कम देणारा हा पुरस्कार त्याचा सर्वार्थाने सन्मान करणारा आहे. अशा पुरस्काराच्या निमित्ताने देशाच्या इतिहासातील दलित आणि आदिवासी बांधवांचे योगदान नव्याने अधोरेखित झाले, हे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी साहित्य क्षेत्रात दलित साहित्याचा प्रवाह सुरू होऊनही अनेक दशके उलटली. खुद्द शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन दलित साहित्य प्रांतातला एक मैलाचा टप्पा मानले जाते. लिंबाळे यांनी ऐन पंचविशीत हे आत्मकथन लिहिले, ही बाब विशेष लक्षणीय आहे. साहित्यातील कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता, निबंध, समीक्षा, लघुकथा असे विविध लेखनप्रकार लिंबाळे यांनी आपलेसे केले आहेत. त्यांच्या पन्नासहून अधिक पुस्तकांनी हे सिद्ध केले आहे.

तरीही कादंबरी हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा लेखनप्रकार आहे, हेही जाणवते. व्यापक समाजहिताची जाणीव त्यांचे लेखन समोर ठेवते. दुर्लक्षित, उपेक्षित समाजघटकांविषयी, त्यांच्या संघर्षाविषयी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयीची पोटतिडीक त्यांच्या लेखनातून प्रत्ययाला येते. दलित पँथर चळवळीवरची त्यांची ‘उपल्या’ कादंबरी, दलितांचे भारतीय राजकीय क्षेत्रातले वास्तव टिपणारी ‘हिंदू’ कादंबरी, तळागाळातील भारतीय लोकशाहीचे वास्तव सांगणारी ‘बहुजन’ कादंबरी… या साऱ्यातून लिंबाळे यांचा हा जिव्हाळा प्रकट होतो. मात्र, यात कल्पिताचा भाग थोडा आणि अनुभवांचे चटके अधिक असल्याचेही दिसते. ‘सनातन’ हे अर्ध्या-अधिक भारताचे आणि नाकारलेल्या इतिहासाचे उत्खनन आहे. कल्पना आणि इतिहासाच्या सरमिसळीतून तयार झालेला एक सत्याचा प्रयोग आहे, हे विधान म्हणूनच यथार्थ वाटते. लिंबाळे यांच्या साहित्यसंभाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बरेच साहित्य अनेक भारतीय तसेच इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन अमराठी तसेच जगातील अन्य भाषिक वाचकांच्या संवेदनशीलतेपर्यंत पोहोचले आहे. लिंबाळे यांचा सन्मान अशा विस्तारलेल्या आधुनिक संवेदनशील भूमिकेचाही गौरव आहे.

बातम्या आणखी आहेत...