आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘हाउडी’ विसरा, ‘हाऊ डेअर यू’ म्हणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. अमेरिकेने हिंदी महासागरात भारतीय हद्दीत केलेला जलसराव याचे प्रत्यंतर देतो. भारतीय सामुद्रहद्दीत ही अमेरिकेची सरळ सरळ घुसखोरी आहे. गेली चार -पाच वर्षे अमेरिकेची गळाभेट घेण्याचे राजकारण करणाऱ्या भारताला हा सूचक इशारा आहे, असे म्हणावे लागेल. भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अमेरिकेच्या सातव्या आरमाराने सराव तर केलाच, उलट हा आंतरराष्ट्रीय सरावाचा भाग होता, असे ठणकावून सांगण्यास अमेरिका विसरली नाही. अमेरिकेच्या नौदलातील सातवे आरमार ही सर्वात मोठी तुकडी आहे. विशेष म्हणजे, १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या वेळी भारतावर दबाव टाकण्यासाठी हीच तुकडी या भागात अमेरिकेने पाठवली होती. आता नवी दिल्लीला कल्पना, कोणतीही पूर्वसूचना न देता याच तुकडीने भारतीय किनाऱ्यापासून १३० नॉटिकल मैलांवर क्षेपणास्त्रविरोधी ‘यूएस जॉन पॉल जोन्स’ या युद्धनौकेद्वारे हे सराव प्रदर्शन केले. हे आमचे ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन’ असून, याद्वारे कोणत्याही नियमांचा भंग केलेला नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे. इकडे निवडणूक प्रचारात दंग असलेल्या सत्ताधाऱ्यांना हिंदी महासागरात असे काही होत आहे, याची काहीच कल्पना नव्हती. अमेरिकेच्या या आगळिकीमुळे दोन्ही देशांतील संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात मैत्रीच्या नवा अध्यायाला सुरुवात झाली. त्यातून संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांना यामुळे सुरुंग लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अमेरिकेने याच भागात अशी दादागिरी सातत्याने केल्याची उदाहरणे आहेत. दक्षिण चीन समुद्रातही अमेरिका असे उद्योग वर्ष-सहामाहीला करत असतेच. हिंदी-प्रशांत महासागरात अमेरिकेचे हे मुक्त नौकानयन आशिया खंडासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या ताज्या घुसखोरीबाबत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा निषेध नोंदवला पाहिजे. आपण नेहमीप्रमाणे चिंता व्यक्त केली आहे. पण, पुन्हा असे होऊ नये, यासाठी अमेरिकेला जाहीर तंबी द्यावी लागेल. ‘हाउडी’सारख्या गळाभेटीच्या कार्यक्रमांनी हुरळून न जाता अमेरिकेला आता नजर रोखून ‘हाऊ डेअर यू?’ असे विचारण्याची वेळ आली आहे.

बातम्या आणखी आहेत...