आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘अंतर’ हवेच; दुरावा नको!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हत्या आणि आत्महत्यांवरून गेले दोन-तीन दिवस विधानसभेत सत्ताधारी व विरोधक आपापल्या सोयीने राजकारण करत होते. अन्य राज्यांतील लोक इथे येऊन आत्महत्या करतात, कारण त्यांचा या सरकारवर, इथल्या व्यवस्थेवर विश्वास असल्याचे कुणी सांगत होते, तर कुणी राज्याला आत्महत्यांचे ‘डेस्टिनेशन’ बनवायचे आहे का, असा सवाल करत होते. पण, याचदरम्यान घडलेल्या आत्महत्येच्या काही घटना त्यांच्या गावीही नव्हत्या. पण, कोरोनामुळे समाजाची मानसिक स्थिती कुठल्या थराला जाते आहे, याचे उदाहरण म्हणून या घटनांची नोंद घ्यावीच लागेल. परभणीच्या धर्मापुरीमध्ये शुभम गंगाधर उगले या वीस वर्षांच्या तरुणाने केलेली आत्महत्या समाजमानसशास्त्रज्ञ आणि एकूणच समाजव्यवस्थेला विचार करायला भाग पाडणारी आहे. कोरोनामुळे वारंवार लॉकडाऊन होतो आहे, परिणामी कॉलेज सतत बंद राहिल्याने आपल्या शिक्षणाचं काय होणार, या चिंतेतून शुभमने आपलं आयुष्य फुलण्याआधीच संपवलं. बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकणारा हा मुलगा आपल्या भवितव्यावर होणाऱ्या परिणामांचा एवढा विचार करत असेल, तर कोरोनाने समाजाच्या मानसिकतेवर केवढा आघात केला आहे, याची कल्पना येऊ शकते. कोरोना आणि महागाई अशा दुहेरी सापळ्यात अडकलेला सामान्य माणूस वाया जाणाऱ्या क्षणा-क्षणाची अन् पै-पैची किती काळजी करतोय, याचा विचार ऊठसूट लॉकडाऊनची तंबी देणाऱ्यांनीही केला पाहिजे. महामारी रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्याऐवजी सरकारी यंत्रणा लोकांपुढे लॉकडाऊनचा बागुलबुवा उभा करते आहे. सामान्यांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत, यात दुमत नाही. पण, सारे जीवनव्यवहार वारंवार कडी-कुलपात बंद करणे, असा त्याचा अर्थ होत नाही. शुभमची आत्महत्या लॉकडाऊनसारख्या उपायांच्या परिणामांची दाहकता दाखवते. त्यामुळे नैराश्य कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी कुटुंब, आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि विद्यार्थी- शिक्षक- पालक अशा पातळ्यांवर संवाद वाढला पाहिजे. कोरोनामुळे शारीरिक अंतर अपरिहार्य असले, तरी अशा वातावरणात मानसिक, भावनिक दुरावा मात्र चालणार नाही. उलटपक्षी अधिक ओलाव्याची गरज आहे. तसे झाले तरच घरोघरचे शुभम चुकूनही त्या अंधारवाटेवर जाणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...