आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:मराठीच्या दुस्वासाचा अतिरेक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटकातील मराठी भाषिक अधिक असलेल्या भागात अधून-मधून तंटे होतच आहेत. कधी सीमेपलीकडे काही घटना घडली की त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटते. मूळ प्रश्न सुटत नाही तोपर्यंत असे प्रकार होत राहणार. पण त्याची झळ दोन्ही राज्यांच्या सीमा भागातील सामान्यांना लागणार नाही; त्यांचा छळ होणार नाही, याची काळजी त्या-त्या राज्य सरकारने घेतलीच पाहिजे. पण आज बेळगावात अगदी हद्द झाली. एका मराठी भाषिक तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपचे स्टेटस मराठीमध्ये ठेवले. केवळ या छोट्या कारणावरून त्या तरुणाला पोलिसांनी झोडपून काढले. भाषिक दुस्वासाचा हा अतिरेक व हुकूमशाही, दडपशाहीचा प्रकार आहे. लोकशाही परंपरेला हा डाग आहे. भाषा हा कोणत्याही माणसासाठी, समूहासाठी अस्मितेचा, अभिमानाचा मुद्दा असतो. बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला तो भाषेच्या मुद्द्यावरच.भारतातही प्रांतरचना भाषेच्या आधारावर झाली. तेव्हापासून कर्नाटकात राहिलेल्या बेळगाव, कारवार परिसरातील सीमावादाची धग अजूनही पेटलेलीच आहे.अनेकांनी हौतात्म्य पत्करले, पण प्रश्न सुटलेला नाही. लोकांमध्ये मातृभाषेची अस्मिता असतेच. मातृभाषेचा वापर करू दिला पाहिजे. मग राज्य कुठले व कोणाचे का असेना. सीमाप्रश्नाबाबत आजही वेगवेगळ्या स्तरावर तंटे सुरू आहेतच. हा प्रश्न केव्हा का सुटेना, पण तोपर्यंत भाषेचा दुस्वास व त्यावरून लोकांचा छळ का केला जातो? महाराष्ट्रातल्या सोलापूर, कोल्हापूर या सीमेवरील जिल्ह्यांत कन्नड भाषिक राहतात. त्यांचा कधी छळ होत नाही. सोलापूर तर त्याचे आदर्श उदाहरण आहे. येथे मराठी, कन्नड, तेलुगु भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. भाषिक तंटे कधी करत नाहीत. बहुभाषिकतेबद्दल सोलापूरकर अभिमानाने सगळीकडे बोलतात. सोलापुरात कन्नड, तेलुगुची वृत्तपत्रे येतात. चित्रपट लागतात. नाटकांचेही प्रयोग होतात. दोन्ही भाषिकांच्या मोठ्या संस्थाही आहेत. कन्नड व तेलुगु भाषिक महापौर, आमदार, खासदार होतात. सोलापूरच्या विद्यमान महापौर सौ. यन्नम यांची मातृभाषा तेलुगु तर आमदार विजय देशमुख यांची कन्नड आहे. आजही उत्तर कर्नाटकातला कन्नड भाषिक वर्ग वैद्यकीय सेवेसाठी सोलापूरवर अवलंबून असतो. सोलापूर, कोल्हापूर भागातला हा आदर्श कर्नाटकने घ्यायला हवा.

बातम्या आणखी आहेत...