आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:हे दायित्व सर्वांचेच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात सध्या पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून त्यात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात जिथे कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने आटोक्यात होती त्या विदर्भ भागात आजमितीस रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. त्याखालोखाल औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव या ठिकाणीही दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यातसुद्धा वेगळी स्थिती नाही. गतवर्षी कोरोनाची लाट ऐन भरात असताना जसे रुग्ण वाढत होते त्याच पातळीवर सध्या जवळपास रुग्णवाढीचा दर येऊन पोहोचला असल्याने पुन्हा एकवार कडक निर्बंध, लॉकडाऊन वगैरे मुद्दे चर्चेत आले आहेत. सरकारने लगोलग अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लावावा असा एक मतप्रवाह आहे, तर गेल्या लॉकडाऊनचा अनुभव विशेषतः आर्थिक आघाडीवर रोगापेक्षा इलाज भयंकर असा असल्याने त्या प्रकारचा लॉकडाऊन लावू नये असा दुसरा सूर आहे. पहिल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता हे म्हणणेही अवास्तव म्हणता येणार नाही. कारण लॉकडाऊन हा यावरील एकमेव उपाय नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत प्रत्येकाने त्याचे दायित्व स्वतःहून स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. केवळ सरकारने हे करावे, ते करावे असे म्हणणे सोपे आहे. पण, प्रत्यक्षात सरकार जो निर्णय घेईल तो निभावणे ही तुमची-आमची सर्वांची जबाबदारी आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे. सरकारने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास काही ना काही कारण काढून आपण घराबाहेर पडणार, शिवाय लॉकडाऊनमुळे ज्या आर्थिक समस्या निर्माण होतील त्यालाही सरकारलाच जबाबदार धरणार, असे कसे चालेल? सरकारने कडक निर्बंध लावले तर त्याला त्रास म्हणायचे आणि थोडी सूट दिली तर सरकार काही करत नाही म्हणायचे, याला काय अर्थ आहे? आपण सर्वांनी मिळून कोरोनाचे निर्बंध काटेकोरपणे पाळणे हाच यावरचा एकमेव आणि प्रभावी उपाय आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कोरोनाचा ‘प्रोटोकॉल’ कटाक्षाने पाळायची ही वेळ आहे. तेव्हा एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपणही आपली जबाबदारी ओळखून कोरोनाला पराभूत करण्यासाठी हातात हात घालून शासन आणि प्रशासनाला साथ दिली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...