आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:चर्चा तिसऱ्या पर्यायाची...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी पक्षत्याग करून थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अनेक दशके राष्ट्रीय पक्षात राहिल्यावर त्यांनी हा पर्याय का निवडला असेल? सव्वा वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यात शरद पवार यांनी करून दाखवलेला ‘चमत्कार’ यांनी हे चाको महाशय चकित झालेले दिसतात. हाच एक नेता आहे, जो देशात भाजपसारख्या पक्षाला पर्याय देणारी तिसरी आघाडी उभी करू शकेल, हे त्यांनी परवा बोलूनही दाखवले. अशा आघाडीची आवश्यकता पवारांनीही मान्य केल्यामुळे पुन्हा तिसऱ्या पर्यायाविषयी चर्चा सुरू झाली आहे. खरे तर भारतात ही चर्चा आणि त्या दिशेने होणारे प्रयत्न नवे नाहीत. आणीबाणीनंतर देशातील डाव्या आणि उजव्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी तयार केलेले कडबोळे ही एक पर्यायी आघाडीच होती. १९८९ ते ९१ या काळातही एनटी रामाराव यांनी पुढाकार घेऊन प्रादेशिक पक्षांंची राष्ट्रीय आघाडी तयार केली होती. त्या वेळी या आघाडीच्या व्ही. पी. सिंग सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त आघाडी नावाने प्रयोग झाला आणि दोन वर्षांत दोन पंतप्रधान देऊन तोही थांबला. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही म्हणून २०१९ च्या जानेवारी महिन्यात असाच प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला. पण, त्या कोणत्याही प्रयत्नांपेक्षा शरद पवार यांनी महाराष्ट्रात तयार करून दाखवलेली आघाडी अधिक यशस्वी झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे तेच देशात असा चमत्कार घडवून आणू शकतील, असे चाको आणि त्यांच्यासारख्या अनेकांना वाटत असेल. अर्थात, सध्या सुरू असलेल्या पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल काय लागतात, यावर या चर्चेचे भवितव्य अवलंबून असेल. ही तीच राज्ये आहेत जिथे अशा आघाडीचा अनुभव अन् गरज असलेले प्रादेशिक पक्ष आजही प्रबळ आहेत. पवारांच्या पुढाकाराने भविष्यात तिसऱ्या पर्यायाची बांधणी झाली, तर अर्थातच त्यात असे प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावतील.

बातम्या आणखी आहेत...