आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:लोकशाहीची "दिशा'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः। देवा नोयथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे॥ कल्याणकारी विचारांना कुणी दाबू शकत नाही किंवा रोखू शकत नाही, हा संदेश देणारा ऋग्वेदातील हा श्लोक भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात लोकशाहीसाठी आशेचा किरणा ठरला आहे. पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला जामीन देताना दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने केलेली विधाने अनेक अर्थाने महत्त्वाची आहेत. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा थट्टेचा आणि “आंदोलन’ हा देशविरोधी कारवायांसाठी पर्यायी शब्द बनवण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या षडयंत्राला त्यामुळे मोठी चपराक बसली आहे. अलीकडच्या काही निर्णयांवरुन कणा गमावल्यासारखी स्थिती आलेल्या न्यायव्यवस्थेने या आदेशातून आपल्या स्वायत्त कर्तव्याचे भान आणि लोकशाही संवर्धनाची बांधिलकी जागृत असल्याचा दाखला दिला आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांइतकेच महत्त्व विरोधकांना असते आणि हुकूमशाहीत सत्ता शाबूत ठेवण्यासाठी सतत “विरोधक’ निर्माण करावे लागतात. कधी ते देशाबाहेरचे दाखवावे लागतात, कधी देशातले. त्यांच्यापासून जनतेचे रक्षण करण्याचा देखावा उभा करावा लागतो. त्यासाठी कधी तपास यंत्रणांकरवी स्क्रिप्ट लिहिली जाते, कधी समाज माध्यमांतून नेपथ्य रचले जाते. या नाट्याची कडी तोडण्याचे काम दिशाला जामीन देताना न्यायालयाने केले. ज्या समाज माध्यमांवर स्वार होत भाजप सरकार सत्तेवर आले, त्या माध्यमातील सरकारविरोधी संदेश हा दिशाचा गुन्हा ठरवला गेला. शेतकरी आंदोलनासाठी जागतिक पाठिंबा मिळवण्यासाठी तिने केलेले प्रयत्न देशद्रोह ठरले. “शेतकऱ्यांबद्दल बोलणं गुन्हा असेल, तर मी जेलमध्ये जाणं पसंत करेन,’ असं या बावीस वर्षांच्या तरुणीने न्यायालयात सांगितलं आणि न्यायालयानेही तिचा जामीन मंजूर करताना, लोकशाही व्यवस्थेतील “विरोधा’चे महत्त्व अधोरेखित करीत सरकारला भानावर आणले. विशेष म्हणजे, “विचारांमधील मतभेद, नापसंती आणि असहमती व्यक्त करणे म्हणजे गुन्हा नाही. किंबहुना, हो मध्ये हो मिळवणाऱ्या उदासीन नागरिकांपेक्षा सरकारी धोरणांविरोधात आवाज उठवणारे नागरिकच लोकशाही सशक्त बनवतात,’ याचे न्या. धमेंद्र राणा यांनी भाजपला कळणाऱ्या ऋग्वेदाच्या भाषेतच स्मरण करुन दिले. लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या भारतीयांसाठी ते नवी ऊर्जा ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...