आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:संजय राऊत कोणाचे प्रवक्ते?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत शिवसेनेचे खासदार आहेत, प्रवक्ते आहेत आणि माध्यमातील लढाईचे सेनापतीही आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण, ते शरद पवार यांचे तितकेच खासमखासही आहेत. महाविकास आघाडी जशी भाजपशी लढते आहेत, तसा आघाडीच्या अंतर्गतही मोठा संघर्ष आहे. त्याचे पडसाद अधूनमधून उमटतात. शरद पवारांकडे ‘यूपीए’चे नेतृत्व द्यावे, ही मागणी राऊतांनी पुन्हा ठरवून केली. ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नाहीत. या आघाडीत येण्यास इतर प्रादेशिक पक्ष इच्छुक आहेत. त्यामुळे पवारांच्या हाती तिचे नेतृत्व दिले तर ती आणखी मजबूत होईल, असा राऊतांचा होरा आहे. यापूर्वी अशी मागणी त्यांनी अनेकदा केलीही आहे. पण, त्याचा प्रतिवाद काँग्रेसने केला नव्हता. या वेळी मात्र दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या वर्तुळातूनच नाराजीचा सूर उमटला. त्याचे उपशमन करण्यासाठी स्वत: सुप्रिया सुळे यांनी परवा सोनियांची भेट घेतल्याची चर्चाही राजधानीत होते आहे. इकडे महाराष्ट्रात नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी या विषयावरून राऊतांना सरळसरळ फटकारले.

शिवसेना ‘यूपीए’चा घटक नाही, त्यांनी या आघाडीच्या नेतृत्वाबाबत बोलू नये, असे त्यांनी ठणकावले आहे. शिवसेनेला देशाचे नेतृत्व करायचे नाही, पण मराठी माणूस पंतप्रधान होण्याला पाठिंबा आहे. त्या नथीतूनच राऊत तीर मारत आहेत. खुद्द पवार मात्र राऊतांच्या वक्तव्यावर चकार शब्द काढत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे, तो म्हणजे पवारांना ‘यूपीए’च्या अध्यक्षपदाची मनीषा आहे. एकदा अध्यक्ष झाले की त्यांचा देशाच्या नेतृत्वाचा मार्ग सुकर होईल. ‘यूपीए’चे नेतृत्व करण्याची क्षमता पवारांकडे आहे. भाजपविरोधात ते छोट्या पक्षांची मोट बांधू शकतात. त्यामुळेच कदाचित ते काँग्रेसचा विरोध असतानाही प. बंगालमध्ये जाऊन ममतांसाठी प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. पण, मुळात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘यूपीए’मध्ये टक्का किती? पवारांनी लालूप्रसाद, चिदंबरम यांच्याप्रमाणे मोदी-शहांना टक्कर दिली का? पवारांच्या राजकीय वाटचालीतील विश्वासार्हता किती? अशा सर्व बाबींचा विचार ‘यूपीए’चे नेतृत्व हाती देताना होणारच. त्यामुळे राऊतांची इच्छा फलद्रूप होणे तूर्तास अवघड दिसते.

बातम्या आणखी आहेत...