आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा वेग उरात धडकी भरवणारा असून अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी रविवारी संबंधित ‘टास्क फोर्स’ची तातडीची बैठक घेत नजीकच्या काळात लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले. परिणामी, लवकरच राज्यभरात किंवा मोठ्या शहरांसह जिथे कोरोना फैलाव झपाट्याने होत आहे तिथे लॉकडाऊन लावला जाण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांसह विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश परिसराला बसला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन अगोदरच्या तुलनेत कैकपटीने वेगात फैलावत असल्यामुळे गेल्यावर्षी ऐन भरात असलेला रुग्णांचा आकडासुद्धा त्यापुढे फिका वाटू लागला आहे. जगभरातला अनुभव पाहता आपल्याकडेही दुसरी लाट येणार, हे तज्ज्ञांपासून प्रशासनापर्यंत विविध पातळ्यांवरून वारंवार सूचित केले जात होते.

लोकांना वेळोवेळी त्याविषयी सजग करण्याबरोबरच कोरोनाचे निर्बंध पाळण्यासाठी आवाहनदेखील केले जात होते. मात्र, कुणीचे ते गांभीर्याने घेतले नाही. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी होताच जणू कोरोनाचा धोका हद्दपार झाल्याच्या अाविर्भावात लग्नसोहळे, पार्ट्या, समारंभ आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. रेल्वेस्थानके, बसस्थानके, धार्मिकस्थळे, ठिकठिकाणच्या मंडई, बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे चित्र होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम होऊन हा बेजबाबदारपणा आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेजवळ घेऊन गेला. त्यामुळे या परिस्थितीसाठी केवळ सरकार, प्रशासन यांना दोष देऊन भागणार नाही. सर्वसामान्यांनी भान बाळगले असते तर हे टाळणे शक्य होते. पण, तसे न झाल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या कटू विचाराप्रत सरकारला यावे लागले आहे. परंतु, लॉकडाऊन हा यावरील एकमेव पर्याय नाही.

यापूर्वीचा लॉकडाऊनचा अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून गेला आहे. विशेषत: लॉकडाऊनमुळे विस्कटणारी आर्थिक घडी आणि हातावर पोट असणाऱ्यांची होणारी आबाळ या मुद्द्यांचा विचार करूनच संभाव्य लॉकडाऊनची नवी रूपरेषा आखायला हवी. महत्त्वाचे म्हणजे केवळ कागदावर आखणी करून भागणार नाही तर स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी आणि हे सारे आपल्यासाठीच आहे, हे लक्षात घेऊन लोकांनी त्याला उत्तम साथ द्यायला हवी.

बातम्या आणखी आहेत...