आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:काँग्रेस विरुद्ध काँग्रेस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असताना काँग्रेसमधला असंतोष उफाळून आला आहे. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसची कमकुवत होत चाललेली स्थिती, पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात जो राग आळवायला सुरुवात केली होती, त्याचेच पुढचे पाऊल जम्मूमधील शांती संमेलनामध्ये उमटले. आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल आदी नेते संमेलनास उपस्थित होते. अगोदर व्यक्त झालेले मुद्दे आणि संमेलनात झालेली मांडणी यामध्ये फरक फक्त एकाच मुद्द्याचा होता, की जो भाजपच्या सुरात सूर मिसळणारा आहे. विशेष म्हणजे, हे सारे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होते आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात काँग्रेसने डावे पक्ष व मौलाना सिद्दिकी यांच्याशी जोडलेल्या नात्याचे आता निमित्त झाले आहे. काँग्रेस कार्यकारिणीमध्ये निर्णय न होता जाहीर झालेल्या या आघाडीला जी-२३ मधील बहुतांश नेत्यांचा विरोध आहे. ही आघाडी करताना गांधी-नेहरूंना अपेक्षित असलेला निधर्मीपणा डावलल्याचा त्यांचा आक्षेप आहे. केवळ निवडणुकीसाठी जातीयवाद्यांशी हातमिळवणी करणे काँग्रेसच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे निधर्मी शक्तींशी मैत्री करताना काँग्रेसने निवडक सोयीच्या, पण मुळातल्या जातीयवादी शक्तींशी युती करू नये, असेे आनंद शर्मा आदी मंडळींचे म्हणणे आहे. खरे तर काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर अशी आघाडी केली आहेच. तेव्हा कुणी हा मुद्दा उपस्थित केला नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो मांडणे काँग्रेसला प्रतिकूल व भाजपला अनुकूल ठरेल; आणि अधीर रंजन यांचा हाच आक्षेप आहे. त्यात पुन्हा राहुल गांधी तामिळनाडूत प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसमधली उफाळती दुफळी जम्मूमध्ये व्यक्त होते. राहुल व प्रियंका हे दोघेही पक्षीय निर्णय घेताना ज्येष्ठांना डावलतात, ही पण खदखद त्यात आहेच. जी-२३ मधील राज्यसभा सदस्य कुरियन यांच्यासारख्यांची भूमिका नेमस्तांची आहे. काँग्रेसमध्ये सद्य:स्थितीत मुद्दे उपस्थित करताना लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असे ते म्हणतात. शांती संमेलनातील अशांतीपासून सुरू झालेला काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हा पक्षांतर्गत वाद संघटन कमकुवत करणारा आहे.

बातम्या आणखी आहेत...