आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:तेलाचा भडका, महागाईचा तडका

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पितृपक्ष सुरू आहे. तो संपताच नवरात्रोत्सव, दसरा, नंतर दिवाळी असा सणांचा हंगाम सुरू होतो. या काळात सर्वत्र खरेदीला उधाण आलेले असते. मात्र, यंदा सर्वसामान्य माणूस सणांच्या खरेदीसाठी बाहेर पडेल तेव्हा त्याच्या खिशाला महागाईचे चटके बसतील. याला कारण आहे ते कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती आता पिंपामागे ८० डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच कच्चे तेल एवढे भडकले आहे. कोरोनाकाळात प्रचंड घटलेली कच्च्या तेलाची मागणी आता सुरळीत होत असताना तेल उत्पादक देशांची पुरवठा करताना दमछाक होत आहे. या वर्षअखेरीस कच्चे तेल पिंपामागे ९० डॉलरपर्यंत मजल मारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी आदी पुन्हा महागणार आहे. या इंधनावरील अधिभार हा राज्याच्या महसुलाचा चांगला आधार आहे. त्यामुळे अधिभार कमी होण्याची शक्यता नाही. पेट्रोल आणि डिझेलने केव्हाच लिटरमागे शंभरी पार केली आहे. आता त्यात आणखी भर पडणार आहे. हॉटेल व इतर व्यवसायांसाठी लागणाऱ्या १९ लिटरच्या एलपीजी गॅसच्या किमती सिलिंडरमागे ४३.५ रुपयांनी वाढल्या आहेत. महागडे पेट्रोल, डिझेल, गॅस यामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत भर पडणार आहे. त्यातच अतिवृष्टी, पूर यामुळे बहुतांश राज्यांतील खरीप पाण्यात गेला आहे. त्याचाही फटका बसू शकतो. बाजारात अधिक पैसा खेळता राहण्यासाठी प्रमुख व्याज दरवाढीचे संकेत रिझर्व्ह बँकेकडून मिळताहेत. असे झाले तर स्वस्त कर्जाचा काळ संपून चलनवाढीचा काळ सुरू होईल. हे चक्र टाळण्यासाठी सरकार, अशा वित्तीय संस्था यांनी एकत्रित आणि एकमताने उपाय योजले तर सर्वसामान्यांची दसरा-दिवाळी गोड होईल.

बातम्या आणखी आहेत...