आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:भडकते इंधन, खिशाला चंदन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘वड्याचे तेल वांग्यावर’ अशी एक म्हण प्रचलित आहे. एखाद्यावरचा राग दुसऱ्यावर काढणे, असा याचा अर्थ. मात्र, सध्या देशात इंधनाच्या किमतीचा एवढा भडका उडाला आहे की, ही म्हणही वापरता येत नाही. सामान्य माणूस राग काढणार कोणावर? तेल कंपन्यांकडून सुरू असलेली लूट केंद्र सरकार चुपचाप पाहते आहे. राज्य सरकार मूल्यवर्धित करातून येणाऱ्या महसुलावर डोळा ठेवून आहे. कोरोनामुळे राज्यांचे अर्थचक्र रुतले आहे. केंद्राची तिजोरी जर्जर झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चंदन लावण्याचे काम सुरू आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर भागात तर प्रीमियम पेट्रोलने शंभरी पार केली आहे. केंद्र आणि तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीकडे बोट दाखवताहेत. आंतरराष्ट्रीय म्हटले की हे काही तरी भयंकर प्रकरण आहे, असे समजून सर्वसामान्य लोक काहीही सहन करतात, अशी सरकार आणि तेल कंपन्यांची समजूत आहे. मात्र, केंद्राने लावलेले आयात शुल्क आणि राज्यांचा मूल्यवर्धित कर यांमुळे इंधनाच्या किमती भडकल्या आहेत. कोरोना काळात केंद्राने मे २०२० मध्ये पेट्रोलवर लिटरमागे १० रुपये, तर डिझेलवर लिटरला १३ रुपये आयात शुल्क वाढवले होते. या वाढीची झळ सर्वसामान्यांना बसणार नाही, हे सांगण्यास त्या वेळी केंद्र सरकार विसरले नव्हते. पण, नव्या वर्षात केंद्राला याचा विसर पडला की काय, अशी स्थिती आहे. या जानेवारीतच आतापर्यंत पेट्रोल लिटरमागे २.५९ रुपये, तर डिझेल २.६१ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल शंभरीपार गेले तरी केंद्राकडून कर कपातीबाबत हालचाल दिसत नाही. राज्यांच्या तिजोरीत मूल्यवर्धित कराच्या रूपाने चांगला पैसा येत आहे. राजस्थानात पेट्रोलवर हा कर ३८ टक्के इतका सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात तो २५ टक्के आहे. एक लिटर पेट्रोलमागे केंद्राला आयात शुल्कापोटी ३२.९८ रुपये मिळतात. केंद्र आणि राज्याने हे कर कमी केले, तरच इंधन भडक्याची झळ कमी होईल. लोक अशा सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारत आहेत, अशा भ्रमात सरकार आहे. त्यातून ते लवकर बाहेर आले नाही, तर हा भडका खुर्चीपर्यंतही पोहोचू शकतो.

बातम्या आणखी आहेत...