आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:गाव ‘कूस’ बदलतेय...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा निश्चित करणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी विरुद्ध भाजप अशी सर्वसाधारण विभागणी होती. त्याशिवाय; स्थानिक आघाड्या, पॅनलही रिंगणात होते. प्रत्येक पक्षाची राजकीय ताकद आणि तळापर्यंत असलेल्या संपर्क, संघटन यांची परीक्षा ग्रामपंचायत निवडणुकीत होते. प्रत्यक्ष मतदान झालेल्या सुमारे पावणेतेरा हजार ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीला एकीचे फळ मिळाले आहे. त्यातही शिवसेनेला सर्वाधिक, तर त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यश मिळवले आहे. एकाकी लढणाऱ्या भाजपला मिळालेले यश निर्विवाद नसले, तरी ते निश्चितच दखलपात्र आहे. सत्ताधारी आघाडीचे यश हे तिन्ही पक्षांच्या एकीचे फळ असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचेही त्यातून स्पष्ट होते आहे. सरकारने कोरोना काळात केलेल्या उपाययोजना आणि अनलॉकनंतर शहरांइतकेच ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष दिले. त्याचा लाभ उठवण्यात शिवसेनेला यश आले. गेल्या काही महिन्यांतील ‘ठाकरे सरकार’च्या निर्णयांची माहिती देणारे ग्रामीण भागात लागलेले फलक, हे त्याचेच उदाहरण. या निवडणुकीने अनेकांना जमिनीवरही आणले. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, उदयनराजे भोसले, राम शिंदे यांच्या समर्थकांना अपयश आले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडमध्ये भाजपने झेंडा रोवला. जिथे वर्षानुवर्षे बिनविरोध निवडणुका व्हायच्या अशा काही गावात परिवर्तन घडले. जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या. उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक लढवली होती. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे अजब फंडेही यावेळी अवलंबले गेले. निवडणूक आयोगाने त्यातील काही ठिकाणची निवडणूकच रद्द केली. मात्र, सामंजस्यानेही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अनेक ठिकाणी नवे, तरुण नेतृत्व उभे राहिले, हे उल्लेखनीय. एकूणच या निवडणुकीतून राज्यातील गावे केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक कूसही बदलत असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...