आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आनंद' मरते नहीं...:​​​​​​​अद्वितीय आणि अनुपम...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण खूप आशा अपेक्षा घेऊन जगतो. खरं तर सतत जगायचा प्रयत्न करतो. खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते “खूप काही” मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो. यश, ध्येय, साध्य अशा संज्ञा आपण आपल्यापुरत्या तयार करतो; मग सगळी कामं दशकानुदशकं ह्या संज्ञा मिळवण्यासाठी खर्ची घालतो. आणि मग खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर “अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं की’’, ही जाणीव व्हायला सुरुवात होते. हृषिकेश मुखर्जींचा ‘आनंद’ नेमका याच भौतिक गोष्टींच्या आनंदातून बाहेर पडून स्वत:वर प्रेम करायला आणि इतरांना प्रेम द्यायला शिकवतो. ‘आनंद’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘दिव्य मराठी रसिक’चा हा खास नजरणा... “आनंद मरते नही’’!

चांगल्या कथानकाच्या बीजाला कधी कधी मूर्तरूप धारण करून मोठ्या पडद्यावर अवतीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते; त्यातून हिन्दी चित्रपटसृष्टी म्हणजे वेळ, पैसा, मनुष्यबळ आणि इतर अनेक बाबतींत जगड्व्याळ बाब! शिवाय जे धंदेवाईक निर्माते नाहीत त्यांना तर ते अफाट भांडवल उभे करणे ही महाकठीण गोष्ट! पण आंतरिक तळमळ असलेली व्यक्ती या सर्व अडचणींतून मार्ग काढते आणि चित्रपट निर्मितीचे आपले स्वप्न पुरे करते. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत सकस, आशयघन आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्माण होत राहतात. शांताराम, मेहबूब, देवकी बोस, बिमल रॉय यांच्या परंपरेत ‘फिट्ट’ बसणारे निर्माते दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी ऊर्फ हृषीदा हे अशाच दुर्मिळ निर्मात्यांपैकी एक. त्यांनी निर्मिती केलेला ‘आनंद’ हा त्यांच्या मते त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. १९५१-५२ च्या सुमारास राज कपूर हा राजा नवाथे दिग्दर्शित ‘आह’ ह्या चित्रपटाची निर्मिती करत होता. चित्रपटाचा नायक अर्थात तोच होता. या चित्रपटाचे संकलक होते हृषीदा. हे चित्रीकरण चालू असतांना एक दिवस ध्यानीमनी नसतांना राज कपूरला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे उपचार करून घेण्यासाठी त्याने काही दिवस विश्रांती घेतली. पण उपचार करून घेऊन आलेला राज कपूर हा पूर्वीप्रमाणेच हसरा, खेळकर, चेष्टेखोर, आणि उत्साही होता. जणू काही झालेच नाही अशा थाटात त्याने परत आपल्या कामाला सुरुवात केली. हे बघून पंचविशीतील हृषीदा कमालीचे आश्चर्यचकित झाले! जवळजवळ मृत्यूच्या भोज्ज्याला शिवून आलेल्या राज कपूरचे हे रूप बघून त्यांच्या मनात, ‘जीवघेणा आजार झालेला रुग्ण शेवटपर्यंत स्वत: आनंदी राहून इतरांनाही कायम आनंदी ठेवतो आणि स्वत: हसत हसत मृत्यूला कवटाळतो,’ या कथानकाचा जन्म झाला! पुढे-मागे आपण निर्माते झालो तर या कथानकावर खुद्द राज कपूरलाच घेऊन चित्रपट निर्मिती करण्याचे त्यांनी त्याच क्षणी मनात ठरवले; इतकेच नव्हे तर राज कपूरला कथा ऐकवून त्याचा होकारही घेऊन ठेवला. शिवाय, हा आपला पहिलाच चित्रपट असल्याने तो लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण व्हावा म्हणून दिलीपकुमार आणि देव आनंदलाही या चित्रपटात भूमिका देण्याचे त्यांनी मनात पक्के केले.

मात्र, कसलेही आर्थिक बळ नसणाऱ्या एका नवशिक्या तंत्रज्ञाला हिन्दी चित्रपटसृष्टीत निर्माता बनणे इतके सोपे असते काय? परंतु, ४-५ वर्षांत हृषीदा ‘मुसाफिर’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माते- दिग्दर्शक झालेही; पण या चित्रपटाचा योग काही येत नव्हता. मात्र, जेव्हा त्यांनी या कथानकावर चित्रपटनिर्मिती करण्याचे ठरवले तेव्हा एक-दीड तपाचा काळ उलटून गेला होता. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी कमालीच्या बदलल्या होत्या. मुख्य म्हणजे राज कपूरचे वय आणि शरीरयष्टी तरुण नायकाला साजेशी राहिलेली नव्हती. म्हणून मग नव्या आणि योग्य नायकाचा शोध सुरू झाला. हा चित्रपट तसा विनोदी नसला तरी नायक हा खेळकर स्वभावाचा असल्याने किशोरकुमार आणि त्या वेळेस नुकतेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला आणि आपल्यात अभिनय गुण आहेत, याची झलक दाखवणाऱ्या संजीवकुमार यांची निवड पक्की करून चित्रीकरणाला सुरुवातही झाली. चित्रीकरणाचा एखादा हप्ता पुरा झाला नाही तोच, किशोरकुमारने या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले. मग तरुण, देखण्या आणि अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या शशी कपूरला विचारले, पण आर्थिकदृष्ट्या आपले बस्तान न बसलेल्या शशी कपूरने पारिश्रमिकाचा आकडा ऐकून नकार दिला.

कुठलेही योग्य नाव डोळ्यासमोर येईना. अखेरीस, ‘राज’, ‘बहारोंके सपने’, ‘आराधना’, ‘दो रास्ते’, अशा चित्रपटांतून चमकलेल्या आणि लोकप्रिय होत असलेल्या राजेश खन्ना या होतकरू नायकाशी संपर्क साधण्याचे ठरले. तोपर्यंत ‘मुसाफिर’, ‘अनाडी’, ‘अनुपमा’, ‘आशीर्वाद’ अशा जाणकारांनी दखल घेतलेल्या आणि अमाप लोकप्रिय झालेल्या चित्रपटामुंळे त्याने हृषीदा यांच्यासारख्या प्रथम श्रेणीच्या नामवंत दिग्दर्शकाकडे प्रमुख भूमिका मिळते आहे म्हटल्यावर क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. ही भूमिका करण्यासाठी फक्त रु.६०,००० मिळतील; आणि चित्रपट शक्य तितक्या लवकर पूर्ण करावयाचा असल्याने चित्रीकरणासाठी सलग तारखा द्यावयास लागतील; हेही बजावले गेले. राजेश खन्नाने या सर्व गोष्टी काहीही खळखळ न करता मान्य केल्या. या चित्रपटाला रूढ अर्थाने नायिका नव्हती; म्हणून त्या भूमिकेसाठी कोणाला निवडायचे हा प्रश्न नव्हता. कथेत मोजकीच पात्रे असल्याने अन्य भूमिकांत अमिताभ बच्चन (याचा हा दुसराच चित्रपट), सुमिता सन्याल, रमेश देव, सीमा (देव) यांची निवड केली. ललिता पवार, असित सेन, दुर्गा खोटे, दारासिंह, ब्रह्म भारद्वाज आणि जॉनी वॉकर यांची पाहुणे कलाकार म्हणून निवड झाली. स्वत: हृषीदांनी गुलजारच्या साहाय्याने पटकथा लेखन केले. गेली अनेक वर्षे या कथेवर चिंतन-मनन झालेले असल्याने संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्यामुळे पटकथा आटोपशीर आणि बांधेसूद झाली. सर्वसाधारणपणे व्यावसायिक गरज म्हणून नायिकेचे पात्र निर्माण करण्याचा आणि त्या भूमिकेत तत्कालीन लोकप्रिय अभिनेत्रीला चमकावण्याचा मोह कुठल्याही दिग्दर्शकाला झाला असता, पण हृषीदांनी तो मोह टाळला. प्रत्येक प्रसंग विचारपूर्वक घालून, त्याचे ताकदीने चित्रीकरण करण्यात त्यांनी कसूर केली नाही.

‘आपल्या आयुष्याचे केवळ काही महिनेच उरले असून त्यानंतर आपला मृत्यू अटळ आहे,’ हे मनोमन ओळखून आनंदाने आणि जिंदादिलाने वागणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्नाने आपल्या सहज सुंदर, उत्स्फूर्त आणि अकृत्रिम अभिनयाने अजरामर करून ठेवली आहे. या भूमिकेचे त्याने सोने केले आहे. येता-जाता सतत स्वत: हसणारा, दुसऱ्यांनाही हसवणारा, जाईल तेथे आपल्या वागण्या-बोलण्याने कायम प्रसन्नतेचा शिडकावा करणारा हा तरुण कर्करोगाचा रुग्ण वाटतच नाही. त्या वेळेस राजेश खन्ना हा लोकप्रिय झालेला, बस्तान बसलेला, आघाडीचा अभिनेता नव्हता. त्यामुळे लोकप्रिय भूमिकेसाठी अनावश्यक असणारे नायकाचे ‘मॅनरिझम्स’ टाळण्यात दिग्दर्शक हृषीदांना 100 टक्के यश आले. त्याच्या खास शैलीत, ऋजू आवाजात त्याने मारलेल्या बाबूमोशाय, मुरारीलाल! या हाका त्या वेळेस तरुण-तरुणींत चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. ही राजेश खन्नाची नि:संशय सर्वोत्कृष्ट भूमिका! नंतर पडद्यापेक्षा मोठ्या झालेल्या अमिताभ बच्चनची ही केवळ दुसरीच भूमिका, चित्रपटात नायकानंतर हीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ती अमिताभने पुरेशा मेहनतीने साकारली आहे. गरिबांसाठी कळकळ असणारा, सेवाभावी डॉक्टर भास्कर अमिताभने मनापासून पेश केला आहे. ‘हा उद्याचा महत्त्वपूर्ण अभिनेता असणार आहे’, याची जाणकारांनी दखल घ्यावी, इतक्या ताकदीने त्याने अभिनय केला आहे. त्याच्या दैनंदिनीतून चित्रपटाची कथा उलगडत जाते. चित्रपट फ्लॅश-बॅक तंत्राने सादर केला आहे. मात्र या चित्रपटात सर्वांत सुंदर भूमिका झाली आहे ती जॉनी वॉकरची. खरं तर ही पाहुण्या कलाकाराची भूमिका. फुटेजचा विचार केला तर तशी नगण्यच, पण पटकथेत ही भूमिका छान खुलवली आहे; आणि जॉनी वॉकरने तिचे अचूक मर्म ओळखून हृषीदांना अपेक्षित तऱ्हेने अभिमीत केली आहे. आनंदच्या ‘मुरारीलाल’ला योग्य तऱ्हेने प्रतिसाद देणारा, एका हौशी नाटक मंडळीचा पैशाने गरीब असणारा हा मालक. मात्र, प्रत्येक फुटात त्याने असे काही गहिरे रंग भरले आहेत की ही छोटी भूमिका न वाटता प्रमुख भूमिकांइतकीच लक्षात राहते, महत्त्वाची वाटते. आनंद हा केव्हाही मृत्यू पावेल हे कळताच जॉनी वॉकरने जो हृदयस्पर्शी अभिनय केला आहे त्याने सुबुद्ध प्रेक्षकांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात. जॉनी वॉकरला डोळ्यासमोर ठेवून यापेक्षा मोठ्या भूमिका लिहिल्या गेल्या, पण त्या सर्वांवर कडी करेल अशीच ही भूमिका आहे. त्याला या भूमिकेसाठी ‘फिल्म फेअर’चे नामांकन मिळाले होते. या चित्रपटात अखेरीस ध्वनिमुद्रण यंत्राचा जो उपयोग करून घेतला आहे, त्याचे तर कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे! ही कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला मन:पूर्वक सलाम! तो काळ ‘स्पूल’ पद्धतीच्या मोठ्या ध्वनिमुद्रण यंत्रांचा. कॅसेट, टेपरेकॉर्डर नुकतेच भारतात येऊ लागले होते. या स्पूल यंत्रावर टेप संपल्यावर चक्राचे जे गरगर फिरणे दाखवले आहे तो तर प्रतिभेचा, कल्पकतेचा अनोखा चमत्कारच! आनंद मृत्यू पावला आहे हे कळल्यावर ‘तू बोल, बोल’ असे उद्वेगाने डॉ.भास्कर म्हणतो, आणि अचानक बाबू मोशाय! ही आनंदची चिरपरिचित हाक अत्यंत अनपेक्षितपणे ऐकू येते! हा मृत्यू पावलेला असूनही बोलतो कसा, या संभ्रात प्रेक्षक असतात; पण त्याचवेळी त्या संबोधनासरशी प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर जो सर्रकन शहारा उठतो, त्याचे समर्पक वर्णन करणे केवळ अशक्यच आहे! हा अनुभव चित्रपट गृहातच घ्यावयास हवा! ‘दो बिघा जमीन’पासूनच हृषीदांशी सूर जुळलेल्या अनोख्या, प्रयोगशील संगीतकार सलील चौधरी यांनीच या चित्रपटाचे संगीत नियोजन केले आहे. यात केवळ चारच गाण्यांना वाव आहे. मुकेश (दोन), मन्ना डे आणि लता मंगेशकर प्रत्येकी एक. ही गीते गुलजार आणि योगेश यांनी लिहिली आहेत. ती अर्थपूर्ण असून सुगम आणि प्रासादिकही आहेत. त्यांना अर्थानुकूल आणि खास सलील चौधरी ढंगाच्या चाली लावल्या आहेत. कथानकात खंड न पडेल अशाच जागा या गीतांसाठी निश्चित केल्या गेल्या आहेत. तरीही एका आठवड्यानंतर लताचे गीत त्यातून कापले गेले. पार्श्वसंगीतावर विशेष मेहनत घेणारे संगीतकार म्हणून सलीलदा यांचा असलेला लौकिक त्यांनी सांभाळला आहे. हा चित्रपट मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्करोग्याची कथा सांगणारा असल्याने तसा तो अंगावर येणारा; हे ओळखून हृषीदांनी कथानकाच्या गांभीर्याला अजिबात धक्का न लावता आवश्यक तेथे नर्मविनोदाची प्रसन्न पखरण केली आहे. दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाने विरंगुळ्यासाठी लोकप्रिय विनोदी अभिनेत्याची योजना केली असती. मात्र, त्यामुळे ते विनोदी प्रसंग मूळ गंभीर कथानकाला ठिगळ लावल्यासारखे दिसण्याचा धोका होता. सुरुवातीलाच ‘डॉ.भास्कर हे फक्त दवाच्या दुनियेत प्रसिद्ध आहेत, दारूच्या नव्हे’; असे आलेले वाक्य. वाढदिवसाच्या दिवशी सीमा ‘हम प्रेझेंट्स वगैरा लेनेवाले नही,’ असे म्हणते, ‘तो क्या सिर्फ तु कॅश लोगी?’ हा आनंदचा सवाल. रमेश देव, सीमाचे मराठी बोलणे; आनंदला ‘साला’ अशी दिलेली शिवी. सदैव हसणारा आनंद एकदा रडतरडत डोळे पुसताना दिसतो, हा विसंगत वाटणारा प्रसंग प्रत्यक्षात तो कांदा कापत असल्यामुळे डोळ्यात अश्रू आलेले असतात. ललिता पवार, असित सेन या आणि अन्य पात्रांबरोबर योजलेल्या सौम्य विनोदी प्रसंगांमुळे प्रेक्षकांना आवश्यक तो विरंगुळा मिळण्याची काळजी घेतली आहे. कथा, पटकथा, संकलन आणि दिग्दर्शन यांत हृषीदा कमालीचे झळाळून उठले आहेत. गुलजार यांचा सहभागही मुद्दाम उल्लेख करावा इतका लक्षणीय आहे. अन्य तांत्रिक अंगे सफाईदार आहेत. आनंदने यथावकाश रौप्यमहोत्सवही साजरा केला. खऱ्या विनोदाच्या खाली अश्रूंचे तळे असते, असे जे म्हणतात, याचे हा चित्रपट हे उत्कृष्ट उदाहरण! हृषीदा या चित्रपटाला आपली सर्वोत्कृष्ट कलाकृती मानत असत.

- प्रकाश चांदे

"आनंद' ने आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी दिली

"आनंद’ हा आपल्यासाठी केवळ चित्रपट नाही तर, या चित्रपटाने आपल्या सर्वांना आयुष्य जगण्याची एक अनोखी कला शिकवली आहे. माझ्या आणि सीमाच्या बाबतीत म्हणालं तर, या चित्रपटाने आमच्या करिअरला एक उत्तम दिशा मिळवून दिली. आमची दोघांचीही करिअरची गाडी इथूनच अगदी सुसाट धावायला लागली. ‘आनंद’ हा चित्रपट मला अगदी योगायोगाने मिळाला. ऋषीदांकडे काहीतरी काम द्या म्हणून दोनदा जाऊन भेटून आलो होतो. त्यादरम्यान आनंद चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरु होती. आनंदसाठी प्रमुख कलाकार म्हणून त्याकाळचा सुपरस्टार राजेश खन्नाची निवड झालेली होती. परंतु यामधील डॉक्टर कोण असणार यावर मात्र तर्कवितर्क सुरू होते. यामधील डॉक्टर हा मराठी असायला हवा की पंजाबी याबाबतीत चर्चा सुरू होती. अखेर ऋषीदांनी ठरवले यातील काही शुटींग हे मुंबईत होणार असल्यामुळे डॉक्टर हा मराठीच हवा. त्यामुळेच माझा या चित्रपटात प्रवेश झाला. त्यानंतर मधल्या काळात अशी चर्चा सुरू झाली डॉक्टरसोबत त्याचे कुटूंबही हवे आणि मग सीमाचाही प्रवेश झाला. आम्हा दोघांनाही या चित्रपटात काम मिळाले. आनंदचे शुटींग त्याकाळात तब्बल ३० दिवसांमध्ये झाले होते. साधारणतः त्याकाळी चित्रपटाचे शुटींग ५० ते 60 दिवसांमध्ये व्हायचे. आनंदचे शुटींग दोन शेड्युल्डमध्ये व्हायला सुरुवात झाली. परंतु त्याकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना मात्र सेटवर लवकर येत नसे. त्यामुळे ऋषीदा आणि राजेश खन्ना यांच्यात बरेच खटके उडत. अर्थात ही भांडणे अथवा खटके फार काही मनावर घेण्यासारखे नव्हते. परंतु एक दिवस मात्र राजेश खन्नाने कहर केला सकाळी सातच्या शिफ्टला नऊ वाजता येतो असे सांगून दुपारी १२.३० च्या सुमारास आले. त्यानंतर मात्र त्यादिवशी जे काही झाले ते मात्र सांगण्यासारखे नाही. नेहमी शांत आणि संयत असणारे ऋषीदांचे त्यादिवशी जमदग्नी रुप राजेश खन्ना आणि आम्ही सर्वांनी पाहिले. ऋषीदा राजेश खन्नावर खूप भडकले, परंतु नंतर दोघांनीही आपापले अहंकार बाजूला ठेवले. खास ऋषींदासोबत काम करायला मिळावे म्हणून राजेश खन्नाने चक्क ऋषीदांची माफी मागितली आणि नंतर मात्र निर्विघ्नपणे कामाला सुरूवात झाली. आनंद या चित्रपटाने माणसाला एक उत्तम तत्वज्ञान शिकवले की, माणसाशी बोलण्यासाठी केवळ ओळख असणे गरजेचे नाही. तर प्रेमाने संवाद होणं हे गरजेचं आहे. चित्रपटातील नायक म्हणजेच राजेश खन्ना रस्त्यातील अगदी कुठल्याही व्यक्तीशी बिनदिक्कत संवाद साधताना दाखवलेला आहे. आयुष्य जगण्याची एक वेगळी शैली आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून उमगली. म्हणूनच हा चित्रपट प्रत्येक पिढीला काहीतरी देऊन गेलाय. चित्रपटातील नायक मृत पावला असे दाखवले तरी हा चित्रपट आजही प्रत्येक पिढीच्या मनावर आणि मेंदूवर चांगलाच कोरला गेलेला आहे. आनंद हा चित्रपट पाहताना नकळतपणे डोळ्याच्या कडा पाणावतात, पण किमान तात्पुरते का होईना काहीतरी छान गवसल्याचा भास होतो. आयुष्याचे अंतिम सत्य अतिशय उत्तमपणे मांडतांना ऋषीदांनी कुठेही अधिक भावनिक करण्याचा यत्न केला नाही. म्हणूनच हा चित्रपट अगदी हळुवारपणे मनात खोलवर रुजतो. राजेश खन्ना हा त्याकाळचा सुपरस्टार होता, तरीही ऋषीदांनी धाडस करून त्याला कुठल्याही हिरोईनच्या मागे पळायला न लावता हा चित्रपट बनवला. शुटींगच्या दरम्यान अनेकदा राजेश खन्नाकडून त्याच्या हाताची लकब सतत केली जायची. जी राजेश खन्ना स्टाईल म्हणून ओळखली जाते. पण राजेश खन्नाला ऋषीदा अगदी सर्वांसमोर सांगायचे, ""हे माझे पात्र असे वागणार नाही''. राजेश खन्नाने मुकाट्याने ऋषींदांसमोर स्वतःला सरेंडर केले होते. कारण केवळ एकच होतं, ऋषींदांसोबत काम करण्याची इच्छा. चित्रपट करताना दिग्दर्शकाची आणि संवाद लेखकाची काय ताकद असते हे हा चित्रपट पाहताना म्हणूनच सतत जाणवते. माझ्यासाठी तर अभिनयाचे नवीन आयाम या चित्रपटातून मांडले गेले. मी नाटकांमध्ये काम केल्यामुळे माझा अभिनय हा नाटकाला साजेसा असायचा. जिथे माझा अभिनय लाऊड व्हायचा तिथे ऋषीदा म्हणायचे, ‘’यहा पैं नाटक नहीं करना हैं... ये एक फिल्म हैं ये ध्यान मैं रखो...’’ आनंद चित्रपट आजही बघा हा चित्रपट आपल्याला हमसून रडवतो. पण आपल्याला कुठेही दु:खाच्या दरीत लोटत नाही. हा चित्रपट पाहताना प्रत्येक पात्र आपल्या डोक्यात घट्ट बसते अगदी नावासह.. जीवन जगण्याची एक नवी उमेदच हा चित्रपट आपल्याला देतो. जीवनाचे अंतिम सत्य माणसाच्या हृदद्यापर्यंत आणि मेदूंपर्यंत पोहोचवताना ऋषीदांनी कुठेही उगाचच चढवून -वाढवून एखादा सीन रंगवला नाही. अगदी खरं सांगायचं तर, हा सुपरस्टार या चित्रपटात आपण नंतर मृत दाखवणार आहोत, म्हणून ऋषीदांना भीतीसुद्धा होती. पण ही भीती कुठल्याही सीनमध्ये परावर्तित झालेली नाही हेच या चित्रपटाच्या यशाचे गमक आहे. आनंद हा चित्रपट करताना मला ऋषीदांसोबत काम करायला मिळणे हे जितके भाग्याचे होते. तितकेच महत्त्वाचे म्हणजे राजेश खन्नासारख्या सुपरस्टारबरोबर त्याकाळात स्क्रीन शेअर करणे ही चेष्टा नव्हती. या चित्रपटाने मला आणि सीमाला खूप काही दिले, आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी दिली. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात या चित्रपटाशी खूप रिलेट करतो. आनंदने आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक वेगळाच आनंद मिळवून दिलाय. अर्थात केवळ माझ्याच नाही तर आनंद या चित्रपटाने अनेकांच्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे.

- रमेश देव

(शब्दांकन- प्रभा कुडके)

जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं।

मी पेशाने मानोसोपचारतज्ञ असल्यामुळे "आनंद' या चित्रपटाने माझ्या मनावर अधिकच छाप पाडली आहे. जेव्हा आनंद चित्रपट आठवतो त्यावेळी ही कथा आपल्या आजूबाजूला सुरु असल्याचा भास होतो, इतकं ते कथानक वास्तविक वाटतं. भौतिक गोष्टींच्या आनंदातून बाहेर पडून स्वत:वर प्रेम करा आणि इतरांना प्रेम द्या अशी शिकवण देणारा आनंद प्रेम आणि आनंदाची व्याख्याही वेगळ्या प्रकारे करतो. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या धारणेनुसार मत न बनवता, व्यक्तींवर नियंत्रण न ठेवता, कुणाकडूनही फारशा अपेक्षा न ठेवता त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो तो खरा आनंद... हा मुख्य संदेश या चित्रपटात देण्याचा प्रयत्न केलाय. हा सिनेमा पूर्णपणे रुग्ण आणि त्याचा आजाराशी असलेला मानसिक, भावनिक पातळीवर सुरु असलेला संघर्ष यावर केंद्रित आहे. जागतिक आणि भारतीय साहित्याचा आढावा घेतला तर रुग्णांकडून डॉक्टरांना आणि इतरांना काही शिकता येईल असे साहित्य किंवा सिनेमे क्वचितच असतील. 'आनंद' नंतर मला म्हणूनच'तारे जमीन पर' हा चित्रपट महत्त्वाचा वाटतो. आनंद सिनेमाची दुसरी जमेची बाजू म्हणजे भावनिक व्यवस्थापन. आयुष्य जगत असताना स्वत:ला किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना असा आजाराचा सामना करावा लागतो. पण आजारी असलेला व्यक्ती आणि कुटुंबीय प्रत्येकवेळी हा धक्का पचवू शकतीलच असे नाही. जरी आपली कुटुंबव्यवस्था ही प्रेम आणि भावनेच्या आधारावर असली तरी आजही आपल्याला भावनिक व्यवस्थापन करायला कधीच फारसे जमत नाही. कोणत्याही आजाराचे निदान झाल्यावर आपल्या मानवी वृत्तीनुसार आपण त्या व्यक्तीच्या भूतकाळातील चुकांची आठवण करत बसतो. सतत त्याबद्दल चर्चा करत राहतो. आठवणी उगाळत बसतो. त्यामुळे आजाराला सामोरे जाणे, स्वीकार करणे, आणि आता माझं पुढचं आयुष्य कसे असणार आहे याचे नियोजन करणे ही पद्धत आपल्याकडे अजूनही रुढ झालेली नाहीये. शिवाय एखाद्या व्यक्तीला सकारात्मक शब्दप्रयोग करून कसा आधार दिला जातो याबद्दलही आपल्याला फारशी माहिती नसते आणि ती कधी जाणून घेण्याचा प्रयत्न ही करत नाही. पण अशा खूप महत्वाच्या गोष्टी या चित्रपटातून आधोरेखित करण्यात आल्या आहेत. हा चित्रपट एकप्रकारे वेगवेगळ्या आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना बळ देणारा आहे. शिवाय डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील एक भावनिक नाते उलगडून सांगणारा आहे. हा सिनेमा मला नेहमीच समकालीन वाटतो. एखाद्या व्यक्तीला आजार झाला तर तो वेगवेगळ्या चिंतेने खचून जातो आणि वर्तमान आयुष्य जगण्याचेही विसरुन जातो. याचा परिणाम त्याच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होतोच शिवाय उपचारांवरही होत असतो. त्यामुळे आपल्या आजाराला सामोरे कसे जायचे ही महत्त्वाची बाब यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा शेवट आपल्याला काही सांगू पाहतो. आनंदची आठवण म्हणून त्याने रेकॉर्ड करून ठेवलेला त्याचा आवाज. यातूनही पहिली गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार. मी जाणार आहे ही गोष्ट स्वीकारल्यानंतर आपला भावनिक संघर्ष संपतो. त्यानंतर माझ्याकडे पर्याय उरतो की, त्या वेळेत स्वत:साठी आणि इतरांसाठी काय करू शकतो, आनंदी कसा राहू शकतो. भविष्यासाठी मी केलेले नियोजन आता पूर्ण करता येणार नाहीये त्यामुळे सध्या माझ्या हातात काय आहे, याचा विचार करून जगणे. या सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, माणसाच्या आयुष्यातील खरे सुख आणि आनंद काय आहे? तर तो म्हणजे मी आनंदी आहे आणि तुम्हीही आनंदी राहा. महत्त्वाचे म्हणजे, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं" हा महत्त्वाचा संदेश हा चित्रपट देऊन जातो.

- डॉ. संदीप शिसोदे (मानसोपचारतज्ज्ञ)

... और मन में गीत जनम ले रहा था!

हृषिकेश मुखर्जींच्या आग्रहाखातर रेकॉर्ड कंपन्या आणि निर्मात्याचा विरोध डावलून नव्या दमाचा म्हणून सलीलदांनी योगेश यांच्यावर ‘आनंद’मधल्या एका गाण्याची जबाबदारी सोपवली होती. पण गाणे लिहून सलील चौधरींकडे सोपवण्याची वेळ आली, तरीही सांगितलेल्या सिच्युएशनवर त्यांच्याकडून गाणे लिहून होत नव्हते. डोक्यात असंख्य कल्पना, प्रतिमांचा गोंधळ माजलेला होता, पण सलीलदांच्या ट्यूनला साजेसे शब्द कागदावर उतरत नव्हते. मनावर उदासी होती, निराशा होती… गीतकार योगेश सांगत होते, ती अशीच एक उदास संध्याकाळ होती. ते अस्वस्थपणे घराच्या खिडकीपाशी येऊन उभे होते, दूरवर सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. मनात उदासी, अधीरपणा दाटलेला आणि समोर दिवस मावळून संध्याकाळ हलकेच डोकावत होती. आणि याच क्षणात डोक्यात प्रतिमा-प्रतिमांचा योग्य मेळ जुळला आणि त्यातून ‘कही दूर जब दिन ढल जाए, सांज की दुल्हन बदन चुराए, छुपके से आए’ हे शब्द झरझर कागदावर उतरले आणि पुढच्या काही क्षणात रसिकांच्या हृदयाला भिडणारे गीत जन्माला आले… ‘‘मै यही, इसी जगह खडा था, इसी तरह शाम का वक्त था.. इसी तरह सूरज डूब रहा था और मन में गीत जनम ले रहा था..’’ हे त्यावेळचे त्यांचे शब्द. आजही योगेश यांचा तो चेहरा असाच डोळ्यांपुढे आहे. अर्थात, गाणे तर लिहून झाले. पण ते सलीलदांना ऐकण्यासाठीसुद्धा त्यांना प्रचंड हिंमत गोळा करावी लागली. ही सुद्धा आठवण त्यांनी एका भेटीत सांगितली. सलील चौधरी राहायचे दक्षिण मुंबईत. बहुधा नेपियन सी रोडवर त्यांचे घर होते. योगेश लिहिलेले गाणे ऐकवण्यासाठी म्हणून बसने त्यांच्या घराजवळ पोहोचले. बसमधून उतरून सलीलदांच्या घराच्या दिशेने जाऊ लागले, तसे त्यांना दरदरून घाम फुटला. आपण लिहिलेय ते त्यांना पसंत पडेल का, गीत ऐकून सलीलदा आपल्याला घरातून हाकलून तर देणार नाही ना, या भीतीने ते गारठले, आणि आलो तसे परत जावे म्हणून माघारीही वळले. म्हणजे, जे गाणे पुढे जाऊन अजरामर झाले, ते संगीतकाराला ऐकवायचीदेखील या गीतकाराची हिंमत त्या वेळी होत नव्हती. पण तोही क्षण मागे पडला. योगेश यांनी लिहिलेल्या गाण्याला सलीलदासारख्या प्रतिभावंताने अमरत्व दिले. हे खरेच, ‘आनंद’ हा गीतकार योगेश यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार होता, त्यानंतरही त्यांची अनेक गाणी गाजली, पण ‘आनंद’ची सर त्यांना आली नाही. योगेश यांची ओळख, लोकप्रियता ‘आनंद’च्याही पुढे फारशी गेली नाही. गंमत म्हणजे, रुढार्थाने ते साहित्य विश्व गाजवणारे कवी नव्हते. पण ‘आनंद’ आणि इतर गीतांच्या दर्जाने त्यांना कवी ही ओळखही मोठ्या सन्मानाने लाभली.

- शेखर देशमुख

बातम्या आणखी आहेत...